Friday, 15 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 06.40 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 August 2025

Time 6.40 AM to 6.50 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ ऑगस्ट २०२ सकाळी ६.४० मि.

****

आमच्या सर्व श्रोत्यांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

****

·      देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचा सर्वत्र उत्साह-ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      शिक्षण आणि आरोग्य सेवेची सर्वांना समान संधी असायला हवी-राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      हर घर तिरंगा मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद-नागरिकांकडून साडे चार कोटींहून अधिक सेल्फी अपलोड

आणि

·      सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

****

देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन आज साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते राष्ट्राला संबोधित करतील. यावर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची संकल्पना 'नवा भारत' अशी आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून पाच हजारावर विशेष पाहुणे आमंत्रित आहेत, राज्यातल्या लखपती दीदी, बचत गटाच्या प्रमुख आणि आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन पुरस्कार विजेत्या दीदी अशा एकूण २० महिलांनाही या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.

**

राज्यात स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईत मंत्रालयात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते, तर बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, परभणी- पालकमंत्री मेघना बोर्डीकर, हिंगोली- पालकमंत्री नरहरी झिरवाळ, नांदेड- पालकमंत्री अतुल सावे, लातूर- पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनार्इक यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे.

राज्यभरात ध्वजारोहणासह वाहनफेऱ्या, तिरंगा फेऱ्या, यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे.

****

शिक्षण आणि आरोग्य सेवेची सर्वांना समान संधी असायला हवी, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात राष्ट्रपतींनी ही बाब नमूद केली. त्या म्हणाल्या..

बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशाची वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था, नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजना, आत्मनिर्भर भारत, अंतराळवीर शुभांशू शुक्ला, राष्ट्रीय हातमाग दिवस, यासह विविध मुद्यांवर भाष्य करत राष्ट्रपतींनी पर्यावरण संवर्धनात सर्वांच्या सहभागाच्या आवाहनाने आपल्या संबोधनाचा समारोप केला. त्या म्हणाल्या...

बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

****

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्य दलं आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना १२७ शौर्य पुरस्कार जाहीर केले आणि २९० जणांचा विशेष गौरव केला. यात चार किर्ती चक्रं, १५ वीर चक्रं, १६ शौर्य चक्रं, ६० सेना पदकं, सहा नौसेना पदकं, २६ वायू सेना पदकं, सात सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, नऊ उत्तम युद्ध सेवा पदकं आणि २४ युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे.

नक्षलवाद्यांविरुद्ध शौर्याने लढणाऱ्या गडचिरोली पोलिस दलातल्या सात अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींचं शौर्यपदक जाहीर झालं आहे.

**

एक हजार ९० पोलीस, अग्निशमन कर्मचारी, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनाही सेवा आणि शौर्यपदकं काल जाहीर झाली. यामध्ये महाराष्ट्रातल्या पोलीस सेवेतल्या ४९, अग्निशमन सेवेतल्या आठ, गृहरक्षक दल पाच, तर सुधारात्मक सेवेतल्या आठ कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सीमा सुरक्षा दलानेही १६ सैनिकांना अत्युत्तम वीरतेसाठी शौर्य पदकं जाहीर केली आहेत.

****

हर घर तिरंगा अभियानाचं यंदाचं हे चौथं वर्ष आहे. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या पोर्टलवर आतापर्यंत तिरंग्यासह काढलेल्या सुमारे चार कोटी ६२ लाख सेल्फी अपलोड झाल्या आहेत. या मोहिमेचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत..

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक. आकाशात डौलाने फडकणारा तिरंगा, मनामनातली राष्ट्रभक्तीची भावना जागृत ठेवतो. एकीकडे पाश्चिमात्य देशांतले लोक त्यांचा राष्ट्रध्वज मुक्तपणे मिरवत असतांना, आपल्याकडे मात्र राष्ट्रध्वजाबाबतच्या नियमावलीमुळे, त्याला दुरुन अभिवादन करण्याचीच सर्वसामान्यांना मुभा होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये राष्ट्रध्वजाच्या नियमावलीत सकारात्मक बदल केले, आणि देशभरातल्या नागारिकांना आपल्या घरावर तिरंगा फडवण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेचं हे चौथं वर्ष. आपल्या घरी तिरंग्यासोबत काढलेल्या सेल्फींचा या मोहिमेच्या पोर्टलवर अक्षरश: पाऊस पडतोय.

हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

 

छत्रपती संभाजीनगर इथं “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत स्क्रॅप बँडचं दिमाखदार सादरीकरण करण्यात आलं. बीड शहरात काल तिरंगा फेरी काढण्यात आली. जालना जिल्ह्यातही सर्वांनी हर घर तिरंगा अभियान साजरं करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.

परभणी नजिक श्री क्षेत्र त्रिधारा इथं ओंकारेश्वर विद्यालयाच्या वतीने तिरंगा फेरी आणि “राष्ट्रध्वज सन्मान पथदर्शन” करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात भव्य तिरंगा फेऱ्या काढण्यात आल्या.

नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.

नशा मुक्त भारत; नशा मुक्त धाराशिव, या अभियानांतर्गत धाराशिव इथं येरमाळ्याच्या येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने जनजागृती फेरी काढण्यात आली.

एकल महिलांना सामाजिक प्रतिष्ठा देण्याच्या उद्देशाने लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात चांदेगावच्या जिल्हा परिषद शाळेत एकल महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

राज्यभरात विविध ठिकाणी अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियान साजरं झालं.

****

परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने स्थापन केलेली चौकशी समिती खंडपीठाने रद्द केली. १२ डिसेंबर २०२४ रोजी परभणी इथल्या आंदोलनानांतर सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली होती, तर १३ तारखेला त्यांचा मृत्यू झाला. आठ दिवसात हे विशेष तपास पथक स्थापन करण्यास खंडपीठाने सांगितलं आहे.

****

विकास कामांचं नियोजन करुन त्यानंतर निधीची मागणी करावी, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं श्री गणेश महासंघ उत्सव समिती २०२५-२६ च्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जनतेला उत्तम सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं....

बाईट - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

दरम्यान, एमआयएम पक्षाचे नेते अब्दुल गफार कादरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांनी त्यांचं स्वागत केलं.

शहरातल्या कर्नावट कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते काल झालं. कर्करोगावरील उपचारांबाबत संशोधन होत आहे, मात्र कर्करोग होऊच नये यासाठी आपल्या दैनंदिन जीवनमानात तसंच आहारात बदल करणं आवश्यक असल्याचं मत, त्यांनी व्यक्त केलं.

****

मुला-मुलींमध्ये भेद करणारी मानसिकता बदलण्याचं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर शहरानजीक पंढरपूर इथं कन्या सन्मान दिवस या उपक्रमात ते काल बोलत होते. कन्या जन्माचं स्वागत करुन मुलींचा जन्मदर वृद्धिंगत करण्यास चालना देण्यासाठी ‘कन्या सन्मान दिवस’ काल छत्रपती संभाजीनगरच्या सर्व मंडळ मुख्यालयात साजरा करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शास्ती माफी योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मालमत्ताकर तसंच पाणीपट्टी या दोन्ही करांपोटी नागरिकांनी सुमारे १३ कोटी ८७ लाख ४९ हजार रुपये कर जमा केला आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल आढावा घेतला. शहरातली वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या, तसंच सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा निर्मितीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

****

हवामान

राज्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात लातूर तसंच धाराशिव जिल्हा वगळता, उर्वरित सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...