Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 August
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १४ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
विभाजन विभिषिका दिवस आज पाळला जात आहे. स्वातंत्र्याच्या
उंबरठ्यावर देशाची झालेली फाळणी आणि त्यावेळेस झालेल्या भीषण संहाराच्या स्मृत्यर्थ
हा दिवस पाळला जातो. या अनुषंगाने देशभरात आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या छायाचित्र
प्रदर्शनांसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त सामाजिक माध्यमावरच्या
संदेशात, फाळणीच्या काळात आपल्या
प्राणांची आहुती देणाऱ्या लाखो निरपराध नागरिकांना, शूर वीरांना आणि बेघर झालेल्या असंख्य कुटुंबांना आदरांजली
अर्पण केली.
****
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ९० पोलीस, अग्निशमन कर्मचारी, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतल्या
कर्मचार्यांना सेवा आणि शौर्य पदकं जाहिर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या पोलीस
सेवेतल्या ४९, अग्निशमन सेवेतल्या आठ, होमगार्ड पाच, तर सुधारात्मक सेवेतल्या आठ कर्मचार्यांना
सन्मानित करण्यात येणार आहे.
****
अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काचा भारतीय निर्यातीवर
होणारा परिणाम अल्पकाळ असेल आणि तो एक किंवा दोन तिमाहीत कमी होईल, असं मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत
नागेश्वरन यांनी काल मुंबईत सांगितलं. रत्नं आणि दागिने तसंच मासेमारी क्षेत्रातील
कोळंबी व्यापार आणि कापड यासारख्या क्षेत्रांना सुरुवातीचा फटका बसत आहे, परंतू अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन
परिणाम मर्यादित असेल. व्यवसायिकांनी धीर धरावा असं आवाहन त्यांनी केलं.
****
२०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी
भारताकडून अधिकृत प्रस्ताव सादर करायला भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं मंजुरी दिली आहे.
अमदाबाद, दिल्ली किंवा भुवनेश्वरमध्ये
या स्पर्धांच्या आयोजनासाठी पुरेशा सुविधा असल्याचं संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर म्हणाल्या.
३१ ऑगस्टपूर्वी हा प्रस्ताव आयोजकांकडे पाठवला जाईल. त्यावर नोव्हेंबरमध्ये अंतिम निर्णय
होईल.
****
केंद्रीय युवक व्यवहार मंत्रालयाच्या माय भारत उपक्रमानं
स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप फाऊंडेशन सोबत सामंजस्य करार केला आहे. देशभरातल्या १८ ते
२९ वयोगटातल्या एक लाख युवकांना या अंतर्गत प्रशासन, सार्वजनिक धोरण, सामाजिक नवोद्योग, डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता आणि इतर क्षेत्रातलं प्रशिक्षण दिलं जाणार
आहे.
****
धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील पाच किलोमीटर
लांबीचं विहार क्षेत्र, आणि चार पादचारी भुयारी मार्गाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते होणार आहे. वांद्रे इथल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय
इमारतीतून हा सोहळा ऑनलाईन होणार आहे.
दरम्यान, स्वातंत्र्य दिनी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय
जुन्या सरकारचाच आहे, असं सांगत यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी
व्यक्त केली. १९८८ सालापासून हा निर्णय महाराष्ट्रात लागू असल्याचं त्यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केला होता, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत
होते.
****
राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र
शासनाच्या निर्देशानुसार रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी प्रमाणे ऊसदर देण्याबाबत
राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी दिली. काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे
एफआरपी दरानेच ऊसदर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्यातल्या
साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करताना कायद्याने ठरवून दिलेला किमान दर देणं बंधनकारक
असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या
संकल्पनेतून महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन; या विषयांवर विशेष कार्यशाळेचं आयोजन
काल मुंबईत करण्यात आलं. या कार्यशाळेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विशेष
मार्गदर्शन केलं. मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महिला दक्षता समित्यांनी यामध्ये
सहभाग घेतला. महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षिततेसाठी महत्त्वाची असल्याचं
मत, नार्वेकर यांनी व्यक्त
केलं. तर गणेशोत्सव काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावं
अशा सूचना गोऱ्हे यांनी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं, चार हजार ३१ किलो ८७४ ग्रॅम अंमली पदार्थाचा जप्त केलेला
साठा काल जाळून नष्ट करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या
मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
****
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था
महाज्योती तर्फे इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण
मोफत देण्यात येणार आहे. यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर २० ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन अर्ज
करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment