आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Wednesday, 31 December 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 December
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
सोलापूर नाशिक
या सहा पदरी मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी
·
उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ ला राज्य सरकारची मान्यता
·
वरीष्ठ पोलिस
अधिकारी सदानंद दाते यांची पोलिस महासंचालक पदी नियुक्ती
·
‘परीक्षा पे चर्चा’साठी तीन कोटी सहा लाखाहून
अधिक जणांची नोंदणी
आणि
·
सरत्या वर्षाला
निरोप तसंच नववर्ष स्वागतासाठी सर्वत्र उत्साह
****
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सोलापूर नाशिक या
सहा पदरी मार्गिकेला मंजुरी दिली. ३७४ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी १९
हजार १४२ कोटी रुपये खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. अनेक शहरांना जोडणाऱ्या या
मार्गामुळे प्रवासाचा वेळ १७ तासांनी कमी होणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनीकुमार वैष्णव
यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं. ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
अश्विनीकुमार वैष्णव
****
राज्य सरकारनं उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ ला मान्यता दिली आहे. पाच
वर्षांसाठी हे धोरण लागू राहणार असून या कालावधीत ५० लाख रोजगार निर्मितीचं
उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं एक लाख
१८ हजार २७५ कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली आहे. यासंदर्भातला शासन आदेश
उद्योग सचिवांनी आज जारी केला. राज्य मंत्रिमंडळानं ११ डिसेंबरला याला मंजुरी दिली
होती.
****
अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा इथल्या अंबादेवी
संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर आठ आर जमीन विनामूल्य दिली
जाणार आहे. आज झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळानं याला मान्यता दिली. पर्यटन
महामंडळाची ही जमीन वापराविना पडून होती. त्यामुळे संस्थानाने या जमिनीची मागणी
केली होती.
****
राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी
अर्जांची आज छाननी झाली. दोन जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता
येतील. तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल.
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी
प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला भोसले तसंच ज्योत्स्ना पाटील
यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही भाजपाचे
दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
****
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल केले
आहेत. रोख खर्चावर मर्यादा ठेवत बँक व्यवहार आणि खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात
येणार आहे. मनपा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चाची कमाल मर्यादा
मनपाच्या वर्गवारीनुसार निश्चित केली आहे. त्यानुसार अ वर्ग मनपासाठी १५ लाख रुपये, ब वर्गासाठी १३ लाख रुपये, क वर्गासाठी ११ लाख रुपये तर ड वर्ग मनपासाठी ९ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
****
कनिष्ठ न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना मुंबई
महानगरपालिका निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश देणाऱ्या आयुक्तांच्या
पत्रांना आज मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी
ही पत्रं जारी केली होती. मात्र, उच्च न्यायालय
तसंच सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातून सूट देण्याचे
आदेश उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय न्यायाधीश समितीने २००८ मध्येच दिले होते.
****
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा
निवडणूक २०२४ मधील त्यांच्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रावर, करुणा शर्मा यांनी आक्षेप घेत, परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात
फिर्याद दाखल केली होती. परळी न्यायालयाने आज, सदर प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं सांगत ते फेटाळून लावले.
****
वरीष्ठ पोलिस अधिकारी सदानंद दाते यांची
राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस
महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या तीन जानेवारीला सेवानिवृत्त होत असल्याने, त्यांच्या जागी दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचे
दोन वर्ष ते या पदावर कार्यरत असतील.
****
नव्व्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलन उद्यापासून सातारा इथं सुरू होत आहे. उद्या दुपारी ध्वजारोहण, कवी कट्टा, गझल कट्टा आणि
प्रकाशन कट्टा आदी कार्यक्रम होणार असून, तर नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी सातारा शहरातून
ग्रंथ दिंडी निघेल. सायंकाळी ७ वाजता मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या हस्ते
ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार केला जाणार आहे. परवा सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून
राबवण्यात आलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाने ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.
‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून आतापर्यंत तीन कोटी
सहा लाख पंचावन्न हजाराहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. देशभरातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यात सहभाग घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या
मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं तसंच परीक्षांच्या अनुषंगाने त्यांचा सकारात्मक
दृष्टीकोन विकसित करणं, हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईने
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची
परीक्षा पुढच्या वर्षी ११ मार्चपासून तर बारावीची परीक्षा १० एप्रिलपासून सुरू
होईल. यापूर्वी या दोन्ही परीक्षा तीन मार्च रोजी सुरू होणार होत्या.
****
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या
स्वागतासाठी सर्वत्र, विशेषतः तरुणाईमध्ये उत्साह पहायला मिळत आहे.
पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलून गेली आहेत. नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी होणारी
गर्दी लक्षात घेऊन सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नववर्ष
स्वागतासाठी उपाहार गृहं, क्लब्ज आणि मनोरंजन स्थळं रात्रभर चालू ठेवायला
प्रशासनाने परवानगी दिली आहे. विविध देवालयं आणि धार्मिक स्थळांवरही सुविधा आणि
सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीच्या सर्व
बसस्थानकांवर दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या
मोहिमेमुळे बसस्थानकं अधिक स्वच्छ, आरोग्यदायी ठरणार असून प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे.
****
क्षयरोग मुक्त भारत अभियानाअंतर्गत लातूर
जिल्ह्यामध्ये अतिजोखीम गटात नोंदणी झालेल्या चार लाख व्यक्तींची तपासणी करण्यात
येणार आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ८८२ क्षयरुग्ण उपचार घेत आहेत, त्यापैकी ३६५ रुग्णांना पोषण आहार किट पुरवण्यात आले आहेत.
****
श्री क्षेत्र तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात आज शाकंभरी नवरात्रोत्सवात
जलयात्रा काढण्यात आली. पापनाश तीर्थ कुंडातून पवित्र जलाने भरलेले कलश डोक्यावर
घेत, पारंपरिक वेशभूषेत शेकडो महिलांनी या जलयात्रेत
भक्तिभावाने सहभाग नोंदवला. संबळाच्या कडकडाटात, ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिगीतांच्या निनादात आणि ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषात ही मिरवणूक निघाली. या कलशातलं पाणी देवीच्या गाभाऱ्यात विधिवत
अर्पण करण्यात आलं. जलयात्रेतील रथावर विराजमान असलेल्या शाकंभरी देवींच्या
प्रतिमेची विविध प्रकारचा भाज्या आणि फळांचा वापर करून सजावट करण्यात आली होती.
****
मुंबईच्या काम्या कार्तिकेयन या १७ वर्षीय
विद्यार्थिनीने दक्षिण ध्रुवावर स्कीईंग करणारी सर्वात तरुण भारतीय होण्याचा
विक्रम केला आहे. जागतिक पातळीवर ती दुसरी सर्वात कमी वयाची तरुणी आहे. उणे ३०
डिग्री सेल्सियस तापमानात तिने दक्षिण ध्रुवावर सुमारे ११५ किलोमीटर स्कीईंग केलं.
मुंबईतल्या नौदलाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या काम्याचे वडील नौदलात अधिकारी म्हणून
कार्यरत आहेत.
****
केंद्र सरकारच्या क्रीडा आणि युवा
मंत्रालयाच्या मेरा युवा भारत आणि हिंदयान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
परभणी इथं जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १५ ते १७
वयोगटातील मुलांमुलींसाठी धावणे, गोळाफेक, खो खो, कबड्डी अशा स्पर्धा घेण्यात आल्या.
****
दक्षिण मध्य रेल्वेने आपल्या वेळापत्रकात उद्या एक जानेवारीपासून बदल केले आहेत. प्रवाशांनी आपल्या रेल्वेच्या वेळेविषयी माहिती घेवून प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
देशाच्या उत्तर भागात थंडीचा कडाका वाढला आहे.
दृष्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते, रेल्वे आणि
हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्ली विमानतळावरची १४८ उड्डाणं आज रद्द करण्यात
आली. उत्तर भारतातली बहुतांश राज्यं थंडीने
गारठली असून महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे.
राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक दोन दशांश
सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल नागपुरात साडे आठ अंश, जळगाव इथं नऊ पूर्णांक तीन, तर अहिल्यानगर इथं सुमारे साडे नऊ अंश तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात परभणी इथं ११ पूर्णांक तीन, बीड इथं ११ पूर्णांक चार तर छत्रपती संभाजीनगर इथं ११
पूर्णांक सात अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 31
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण
राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचं आज
दिल्ली इथं प्रकाशन करण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह
वरिष्ठ अधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती. सरकारनं केलेल्या ऐतिहासिक सुधारणा या
दिनदर्शिकेतून प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण
मंडळ-सीबीएसईने दहावी आणि बारावी परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची
परीक्षा येत्या ११ मार्चपासून, तर बारावीची परीक्षा १० एप्रिलपासून सुरु होणार आहे. या
दोन्ही परीक्षा आधी ३ मार्चपासून सुरु होणार होत्या, प्रशासकीय कारणांमुळे तारखांमध्ये
बदल करण्यात आल्याचे सीबीएसईकडून सांगण्यात आलं आहे.
****
महानगरपालिका निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांच्या
प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. खर्चाची मर्यादा वाढवली असली
तरी त्यावर कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार
उमेदवारांनी केलेल्या प्रत्येक प्रचार सभा, मेळावा आणि कार्यक्रमाचे छायाचित्र, खर्चाचा तपशील, खर्चाची अधिकृत
बिलं जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. रोख खर्चावर मर्यादा ठेवत बँक व्यवहार आणि खर्चाचे
लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. मनपा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चाची कमाल
मर्यादा मनपाच्या वर्गवारीनुसार निश्चित केली आहे. त्यानुसार अ वर्ग मनपेसाठी १५ लाख
रुपये, ब वर्गासाठी १३ लाख रुपये, क वर्गासाठी ११ लाख रुपये तर ड वर्ग मनपेसाठी ९ लाख रुपयांची
मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खर्चाच्या नोंदीत उशीर झाला किंवा तफावत आढळल्यास
उमेदवारांना नोटीस बजावली जाणार असून, गंभीर उल्लंघन झाल्यास कठोर
कारवाईचा इशारा आयोगानं दिला आहे.
****
राज्यातल्या महानगरपालिकांच्या
निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. सकाळी ११ वाजेपासून छाननीला
सुरुवात झाली. आज छाननी झाल्यानंतर दोन जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, तीन जानेवारीला
निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला
मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होईल. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी ८७ जागांसाठी
१ हजार २१ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. काल रात्री उशिरा पर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया
सुरु होती.
****
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी
१२२ जागांसाठी २ हजार ३५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक ११८ जागांवर भारतीय
जनता पक्षाचे उमेदवार आहेत. त्या खालोखाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ८२ जागांवर, शिवसेनेचे
८० जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ जागांवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ३४ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने
३१ जागांवर उमेदवार दिले आहेत.
****
उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे
रेल्वे आणि विमानसेवा विस्कळित झाली आहे. दिल्लीसाठीच्या जवळपास ३०० हून अधिक विमान
उड्डाणांवर परिणाम झाल्याचं वृत्त आहे. १४८ उड्डाणं रद्द करण्यात आली असून २०० उड्डाणं
उशिराने होत आहेत तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. खराब दृश्यमानतेमुळे काही रेल्वेगाड्या
संथ गतीनं धावत आहेत, त्यामुळं त्यांच्या वेळांमध्ये बदल करत आल्याचं रेल्वे
प्रशासनानं कळवलं आहे.
****
समाजमाध्यमांवर एआय-निर्मित
छायाचित्र आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीतून राष्ट्रीय जल पुरस्कार मिळवण्यात आल्याचा
दावा करण्यात येत आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट
केलं आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय ‘जल संचय – जन भागीदारी’ पुरस्कारांचं मूल्यांकन
केवळ जेएसजेबी डॅशबोर्डवरील अधिकृत नोंदींवर आधारित करते. या प्रक्रियेत जीआयएस निर्देशांक, जिओ-टॅग छायाचित्रं
आणि आर्थिक तपशील यांच्या माध्यमातून प्रत्येक जल पुनर्भरण संरचनेचा मागोवा घेतला जातो.
जिल्हाधिकारी आणि जलशक्ती मंत्रालयामार्फत बहुस्तरीय तपासणी केली जाते. त्यानंतरच पुरस्कारासाठी
शिफारस केली जात असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी
यानं विश्व ब्लिट्ज बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. यापूर्वी नुकत्याच पार पडलेल्या
फिडे रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतही अर्जुननं कांस्यपदक पटकावलं होतं. या उल्लेखनीय
कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन एरिगसीचं अभिनंदन केलं आहे. अर्जुनचं
कौशल्य, संयम आणि बुद्धिबळावरील अपार जिद्द अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधानांनी
समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनी अर्जुनच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
देत, भविष्यातही तो देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
****
राज्यात एक ते 31 जानेवारी दरम्यान
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस
विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग तसंच विविध संस्था आणि संघटनांच्या
सहकार्यानं रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती आणि जनप्रबोधनात्मक
उपक्रम राबविण्यात येणार आहेत. “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” ही यावर्षीच्या राष्ट्रीय
रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 31 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
३१ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी
दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. आज छाननी झाल्यानंतर दोन जानेवारीपर्यंत
उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, तीन जानेवारीला निवडणूक
चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी
प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होईल.
लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी
१८ प्रभागांतून एकूण ७५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज या अर्जांची छाननी होणार
आहे. काँग्रेस - वंचित बहुजन आघाडी यांच्या आघाडीत काँग्रेसनं ६५ तर वंचितने पाच जागी
उमेदवार दिले आहेत. भाजपने स्वबळावर ७० उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६९, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १० उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि
एमआयएम पक्षानं प्रत्येकी ०९ उमेदवार दिले आहेत.
नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी
काँग्रेसनं ९६ जणांना उमेदवारी दिली आहे.
****
नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठीचा
भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा उद्या इंदूरचे महापौर तथा अखिल भारतीय महापौर परिषदेचे
उपाध्यक्ष पुष्यमित्र भार्गव यांच्या हस्ते प्रसिद्ध केला जाणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारने
सुरु झालेल्या महत्त्वाकांक्षी 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमानं ऐतिहासिक टप्पा गाठला
आहे. कालपर्यंत या उपक्रमात सहभागासाठी तीन कोटींहून अधिक नोंदणी झाली आहे. देशभरातील
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी यात प्रचंड सहभाग
दर्शवला आहे, जो या कार्यक्रमाची वाढती
लोकप्रियता दर्शवतो. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो
आणि परीक्षांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढवतो, असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
ध्रुव-एनजी-Next Generation या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक कमी वजनाच्या हेलिकॉप्टरच्या
पहिल्या उड्डाणाला केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी बंगळूरू इथं हिरवा झेंडा दाखवला. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड
द्वारे विकसित केलेलं हे हेलिकॉप्टर ६ ते १४ प्रवाशांच्या आसन क्षमतेचं असून ते एरो
इंडिया शोमध्ये प्रथम सादर करण्यात आले होते. पर्यटन, महत्त्वाच्या व्यक्तींची ने-आण करणे, दुर्गम भागातील सेवा, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य, पूर आणि नैसर्गिक आपत्तीतील मदत यासाठी
या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार आहे.
****
केंद्र सरकारनं आणलेल्या ‘विकसित
भारत जी-राम-जी’ कायद्यामुळे देशातील राज्यांना सुमारे १७ हजार कोटी रुपयांचा आर्थिक
लाभ मिळू शकतो, असं भारतीय स्टेट बँकेचे
समूह प्रमुख वित्तीय सल्लागार सौम्यकांती घोष यांनी म्हटलं आहे. मनरेगाच्या तुलनेत
अधिक कुशल, गरजेनुसार आणि डिजिटल माध्यमातून
निधी वितरणाची व्यवस्था या कायद्यात करण्यात आली असून, त्यामुळे राज्यांना थेट फायदा होणार असल्याचं घोष म्हणाले.
****
राज्यस्तरीय युवा महोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये
सुरू झाला आहे. राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शितल तेली उगले
यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन
झालं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात राज्यातील ३१२ युवक-युवती सहभागी झाले आहेत. या महोत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धांतील विजेते संघ येत्या १०
ते १२ जानेवारी दरम्यान दिल्लीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र
राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
****
युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी, पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या
विजेत्यांची घोषणा काल करण्यात आली. इंग्रजीसह एकंदर २२ भारतीय भाषांमधल्या ४३
विजेत्यांचा यात समावेश आहे. मराठीसाठी
दिव्यांशू सिंग, अंबादास मेव्हाणकर आणि प्रसाद जाधव या लेखकांचा विजेत्यांमध्ये
समावेश आहे. सर्व विजेत्यांच्या संकल्पनांचं पुस्तकात रुपांतर करण्यासाठी या लेखकांना
सहा महिन्यांचं मार्गदर्शन आणि दर महिन्याला ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
याशिवाय पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर आयुष्यभर १० टक्के रॉयल्टीही दिली जाणार आहे.
****
आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी
आणि नवीन वर्षाच्या सवागतासाठी सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
यानिमित्त शेगाव इथं संत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता
आज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. आनंद विहार, आनंद विसावा या भक्तनिवासांमध्ये पर्यटकांना राहण्याची
सोय संस्थानच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा
जोर कायम आहे. काल अहिल्यानगरमध्ये राज्यातल्या सर्वात कमी, म्हणजे 8 पूर्णांक 4 अंश सेलसीयस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. छत्रपती
संभाजीनगर इथं १० पूर्णांक ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र कोरडं हवामान
राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 31 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज
छाननी, दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
·
राज्यासह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी महायुती आणि महाविकास
आघाडीतील पक्षांचा स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर भर
·
२०२५ हे देशात सुधारणांचं वर्ष म्हणून ओळखलं जाईल, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
·
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह, हॉटेल-रेस्टॉरंट
पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
आणि
·
श्रीलंकेविरुद्धच्या टी-ट्वेन्टी क्रिकेट मालिकेत भारतीय
महिला संघाचं निर्भेळ यश, मालिकेत ५-० ने विजय
****
राज्यातल्या
महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. अनेक ठिकाणी
युती आणि आघाडीचा निर्णय होऊन, काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या
दिवशी उमेदवार जाहीर झाले. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी सगळीकडेच मोठी गर्दी पाहायला
मिळाली.
आज छाननी
झाल्यानंतर दोन जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, तीन जानेवारीला
निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध
होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
**
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरसह
एकूण १४ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना युती तुटली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड,
अमरावती, मालेगाव, अकोला,
मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली आणि जालना
या महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये
तिरंगी किंवा बहुरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.
मुंबईसह
कोल्हापूर, इचलकरंजी, ठाणे, कल्याण-डोंबिवली
आणि पनवेल इथं शिवसेना–भाजप युती अधिकृतपणे झाली आहे.
**
छत्रपती
संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याची माहिती, शिवसेना नेते
तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. युतीसंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये
नऊ बैठका झाल्या, मात्र भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमुळे
युती तुटल्याचा आरोप शिरसाठ यांनी केला. तर, भारतीय जनता पक्ष
युतीसाठी तयार होता. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या निरापोची वाट पाहिल्याचं
भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
महापालिकेत एकूण एक हजार ८७० उमेदवारी अर्ज दाखल झाले.
**
जागा वाटपावर
एकमत न झाल्यानं जालन्यातही भाजप – शिवसेना युती अखेर तुटली. भाजपा नेते माजी आमदार
कैलास गोरंट्याल यांनी काल याबाबत माहिती दिली. भाजप ३५ आणि शिवसेना ३० या सूत्रानुसार
जागा वाटपावर एकमत न झाल्यानं युती तुटल्याचं त्यांनी सांगितलं.
**
लातूर महानगरपालिकेतही
भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस युती होऊ शकली नाही. सर्व ७० जागांवर भाजपच्या उमेदवारांनी
अर्ज दाखल केले.
**
नांदेडमध्ये
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र
येत असल्याची घोषणा काँग्रेसचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी केली.
महापालिकेतल्या २० प्रभागातल्या ८१ जागांसाठी ९०१ उमेदवारांनी एक हजार २०३ अर्ज दाखल
केले.
**
मुंबई महानगरपालिका
निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित होऊन १३७ जागी भारतीय जनता पक्षाचे
उमेदवार तर ९० जागी शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. रिपब्लिकन पक्षाला जागावाटपातून
वगळल्याबद्दल पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त करत
३९ जागांवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी उमेदवार जाहीर केले. त्यानंतर भाजप नेते प्रविण दरेकर
यांनी आठवले यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाच्या स्वबळावर
लढणा-या ३८ उमेदवारांपैकी मेरीटच्या १५ जागांना महायुतीतुन पाठिंबा देण्याचा निर्णय
घेण्यात आला. रिपब्लिकन पक्षाला निवडक जागा सोडण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत घेण्यात येणार असल्याची माहिती
दरेकर यांनी दिली.
दुसरीकडे
काँग्रेससोबत आघाडीमधे लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला वीस जागांसाठी उमेदवार कमी पडले.
आघाडीमधे त्यांच्या वाट्याला ६२ जागा आल्या होत्या. उमेदवार न मिळाल्यामुळे वीस फॉर्म
त्यांनी परत पाठवल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीस
उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली.
****
२०२५ हे
वर्ष देशात सुधारणांचं वर्ष म्हणून ओळखलं जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. वर्षअखेरीस लिहिलेल्या विशेष लेखातून त्यांनी भारताच्या वेगवान प्रगतीचा आढावा
घेतला. भारत आज जगाच्या आकर्षणाचं केंद्र बनला असून, जग आशा आणि
विश्वासानं भारताकडे पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. पुढच्या पिढीच्या सुधारणांना
गती मिळाली असून, युवा पिढी आणि देशबांधवांची दुर्दम्य इच्छाशक्ती
ही या विकासाची खरी ताकद असल्याचं ते म्हणाले. या लेखात त्यांनी २०२५ मध्ये राबवलेल्या
जीएसटीसह विविध क्षेत्रांतील सुधारणांचा उल्लेख केला. कामगार कायदे आणि व्यापारी करारांमुळे
उद्योग, ऊर्जा आणि आर्थिक क्षेत्राला मोठा लाभ होणार असून,
यामुळे ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ मिळेल, असंही
त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानांनी परदेशी गुंतवणूकदारांना भारतावरचा विश्वास कायम
ठेवून देशात आणि भारतीय जनतेत गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं.
****
ननवर्षाच्या
स्वागतासाठी आज सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून, विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त आज राज्यातल्या खाद्यागृह, हॉटेल, रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बार या आस्थापना उद्या
पहाटे पाच वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरवर्षी या आस्थापनांकडून
येणारी मागणी मंजूर करण्यात आली.
**
नाताळ सुट्या, नववर्ष आणि
शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे चार वाजेपासून
भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. तर, वणी इथलं श्री सप्तशृंगी
देवीचं मंदिर २४ तास खुलं राहणार आहे. चार जानेवारीपर्यंत होणारी गर्दी लक्षात घेऊन
हा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिर देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं.
शिर्डी
इथलं साईबाबा मंदिरही आज रात्रभर खुलं असणार असल्याचं संस्थान प्रशासनाचे मुख्य कार्यकारी
अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं.
**
छत्रपती
संभाजीनगर शहरातही आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात ६७ ठिकाणी
तपासणी नाके उभारण्यात आले असून, ८०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले
आहेत. जागोजागी वाहनांची आणि चालकांची तपासणी केली जाईल, अशी
माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली.
****
राज्यातली
शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला
आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली
हे कामकाज होईल. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील तर परीक्षा
परिषदेचे आयुक्त सदस्य सचिव असतील. याशिवाय इतर ३ सदस्य या समितीत असतील. पवित्र पोर्टलच्या
माध्यमातून ही परीक्षा परिषद हे काम करेल.
****
तुळजापूरमध्ये
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात आज पापनास इथल्या इंद्रायी देवी मंदिरापासून
जलयात्रा काढण्यात येत आहे. दरम्यान, देवीची काल मुरली अलंकार महापूजा बांधण्यात
आली होती.
****
दिव्यांगांसाठी
असलेल्या राज्यातल्या शाळां तसंच कार्यशाळांमधल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी
सर्वसमावेशक आणि कालबद्ध कार्यपद्घती निश्चित केली असल्याची माहिती दिव्यांग कल्याण
विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. अशा कर्मचाऱ्यांना समान वेतनश्रेणीतील समकक्ष
पदावर नियुक्ती देण्यात येईल तसंच प्रथम दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असंही मुंढे
यांनी सांगितलं.
****
महिला क्रिकेटमध्ये, श्रीलंकेला
पाचव्या टी – ट्वेंटी सामन्यातही नमवून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश
मिळवलं आहे. काल तिरुवअनंतपुरम इथं झालेल्या या शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी
१५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाकी करत भारताने १७५ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल
श्रीलंकेचा संघ निर्धारित षटकात १६० धावाच करु शकला.
****
दक्षिण
मध्य रेल्वे उद्या एक जानेवारी पासून नवीन वेळापत्रक लागू करत आहे. यानुसार काही रेल्वेगाड्यांच्या
वेळेत बदल करण्यात आला आहे. दीक्षाभूमि एक्सप्रेस, निझामाबाद – पुणे,
पंढरपूर – निझामाबाद, जन शताब्दी, नांदेड-फिरोजपुर, हिसार, साईनगर
शिर्डी, तपोवन, तिरुपती, नगरसोल, वंदे भारत, नागावली एक्सप्रेस
आदी गाड्यांच्या वेळेविषयी माहिती घेण्याचं आवाहन रेल्वे विभागानं प्रवाशांना केलं
आहे.
****
राज्यभर येत्या एक
ते ३१ जानेवारी
दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने
संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांमध्ये
होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण
करण्याच्या उद्देशाने हा माह साजरा केला जात आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा
महिन्याची संकल्पना “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” अशी असून, रस्ते सुरक्षा
ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडित आहे, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत
पोहोचवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या सगरोळी इथं येत्या दोन आणि तीन जानेवारी रोजी संस्कृती संवर्धन मंडळाचे
संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय
मुख्याध्यापकांचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 December 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 January 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...