Tuesday, 9 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      समृद्ध भारताची भावना वंदे मातरम् मुळे फलद्रुप होईल-लोकसभेतल्या चर्चेत पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त

·      हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची केंद्र सरकारची स्पष्टोक्ती

·      राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, पहिल्या दिवशी सरकारकडून ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

·      ज्येष्ठ सामाजिक, कामगार नेते बाबा आढाव यांचं निधन

आणि

·      भारत-दक्षिण आफ्रिका टी-ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात

****

समृद्ध भारताची संकल्पना वंदे मातरम् मुळे फलद्रुप होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. वंदे मातरम् गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त काल लोकसभेत चर्चेला प्रारंभ करतांना पंतप्रधानांनी, देशासमोरच्या अनेक आव्हानांवर मात करण्याचं सामर्थ्य वंदे मातरमने दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले…

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

ज्या वंदे मातरम् मंत्राने स्वातंत्र लढ्यासाठी प्रेरणा दिली, तोच मंत्र समृद्धतेचीही प्रेरणा देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. वंदे मातरम् ही फक्त स्मरण करण्याची बाब नव्हे तर संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी नमूद केलं. आपल्यावर वंदे मातरम् चं ऋण असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अनुरागसिंह ठाकूर, काँग्रेसचे गौरव गोगोई, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, यांच्यासह भास्कर भगरे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, आदी सदस्यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी वंदे मातरम् गीतावर चर्चेच्या आवश्यकतेवर प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या..

बाईट – खासदार प्रियंका गांधी

****

हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. इंडिगो विमानाची उड्डाणं रद्द होण्याच्या कारणांचा सरकार तपास करत असून, याबाबत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यास, कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. सरकारची ही भूमिका म्हणजे सगळ्या विमान सेवा कंपन्यांसाठी एक उदाहरण ठरेल, असंही नायडू यांनी म्हटलं आहे.

**

गेल्या सुमारे आठवडाभराच्या काळात इंडिगो कंपनीच्या रद्द झालेल्या उड्डाणांमुळे पाच लाख ८६ हजार सातशे प्रवाशांची तिकीटं रद्द झाली असून, प्रवास भाड्याचे ८२७ कोटी रुपये परत करण्यात आले आहे. प्रवाशांच्या नऊ हजार बॅगपैकी साडे चार हजार बॅग, नियोजित पत्त्यावर पोहोचवण्यात आल्या असून, उर्वरीत बॅगा पुढच्या ३६ तासांत परत केल्या जातील असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून नागपुरात प्रारंभ झाला. वंदे मातरम् या राष्ट्रगानाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सभागृहांमध्ये   कामकाजाच्या सुरूवातीलाच मानवंदना देण्यात आली. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून..

बाईट – सप्लीमेंटरी डिमांड्स

‘‘या पुरवणी मागण्यांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १५ हजार ६४८ कोटी, लाडकी बहीण योजनेसाठी सहा हजार कोटींहून अधिक तर मनरेगासाठीच्या साडे तीन हजार कोटी रुपयांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटी, एसटी महामंडळासाठी दोन हजार कोटी, आयुष्मान भारत योजनेसाठी सव्वा तीन हजार कोटी, तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन हजार २०० कोटी रुपयांच्या मागणीचा या पुरवणी मागण्यांमध्ये समावेश आहे.’’

****

विधान परिषदेतही विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. दोन्ही सभागृहात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची काल बैठक झाली, या बैठकीत अधिवेशनाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते बाबा आढाव यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, गांधीवादी समाजसेवक, असंघटित मजुरांच्या हक्कासाठी लढणारे बाबा आढाव हे आधुनिक महाराष्ट्राच्या चळवळींच्या केंद्रस्थानी उभे राहिलेले एक लढवय्ये होते. एक गाव एक पाणवठा, कष्टाची भाकर, हमाल पंचायत, अंधश्रद्धाविरोधी लढा, ईव्हीएमविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन यासाठी त्यांना ओळखलं जातं.

कामगार, मजुरांच्या हक्कासाठी बाबा आढाव यांनी १९५५ साली हमाल पंचायतीची स्थापना केली. हा असंघटित कामगारांना संघटित करण्याचा मोठा प्रयोग होता. सन १९५६ साली हमाल पंचायतीच्या माध्यमातून पहिला लढा उभारला गेला. त्यामुळे मजुरांना किमान वेतन मिळालं आणि हमाल पंचायतीला अधिकृत श्रमिक संघ म्हणून मान्यता मिळाली. आढाव यांच्या दोन दशकांच्या संघर्षानंतर १९६९ साली राज्यात ‘महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि असंघटित कामगार कायदा’ लागू झाला. राज्यातल्या जातीय व्यवस्थेवर थेट प्रहार करत बाबा आढाव यांनी 'एक गाव, एक पाणवठा' चळवळ सुरू केली. त्या माध्यमातून सामाजिक समतेचा ठोस पाया रचला गेला.

बाबा आढाव यांच्या निधनाने समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली. विविध सामाजिक कामांसाठी आयुष्य वाहून घेत समाजसेवा करणारे, विशेषतः वंचितांचं सबलीकरण आणि कामगार कल्याणासाठी लढणारे बाबा आढाव, त्यांच्या या कार्यासाठी सदैव स्मरणात राहतील, असं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झालेल्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पटकावलं आहे. काल या महोत्सवाचा समारोप झाला. मुंबई विद्यापीठाने उपविजेतेपद पटकावलं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला तिसरा क्रमांक मिळाला. ॲथलेटिक्स प्रकारात मुलांच्या गटात सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने तर मुलींच्या गटात पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवला.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच टी–ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कटक इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

तिरुपती ते शिर्डी ही नवी साप्ताहिक रेल्वे आजपासून धावणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचा शुभारंभ करणार आहेत. आज ही रेल्वे तिरुपतीहून सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी निघून शिर्डी इथं रात्री १० वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. १४ डिसेंबरपासून तिरुपती इथून सकाळी चार वाजता ही रेल्वे नियमितपणे सुटेल, छत्रपती संभाजीनगर मार्गे ही रेल्वे शिर्डीला रवाना होईल.

****

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचं नाव देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार रूपा चित्रक यांच्या हस्ते तर परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या तुरीच्या शेतात लागवड केलेला साडे सोळा किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. नारायण गजानन आडे असं या शेतकऱ्याचं नाव असून, किनवट तालुक्यात शिवनी शिवारातल्या त्याच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

****

कापूस आणि सोयाबीनच्या दर वाढीसंदर्भात बीड तालुक्यातल्या पाली इथं शिवसंग्राम किसान आघाडीचे जिल्हाप्रमुख राजेंद्र आमटे तसंच आम आदमी पक्षाचे जिल्हाप्रमुख अशोक येडे यांनी काल बैठक घेतली. कापसाला दहा हजार रुपये तर सोयाबीनला सात हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यात “सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग  - सी आय आय आय टी या प्रकल्पाला सुरुवात होत आहे. ११५ कोटी रुपये खर्चाच्या या अत्याधुनिक केंद्रातून दरवर्षी तीन हजार विद्यार्थ्यांना उद्योग जगतातील प्रगत तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे.

****

राज्यात काल सर्वात कमी आठ पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमान यवतमाळ इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल गोंदिया तसंच मालेगाव इथं नऊ, जळगाव इथं नऊ पूर्णांक चार, तर अहिल्यानगर इथं नऊ पूर्णांक पाच अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं १० अंश, बीड इथं साडे दहा अंश तर परभणी इथं १० पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 25 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...