Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १० मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं. चार एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या दुसऱ्या सत्रात २०२५-२६ च्या अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. या काळात एकंदर २० बैठका होतील. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजुरीसाठी चर्चा होईल.
****
राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार दुपारी दोन वाजता विधानसभेत आणि त्यानंतर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच, तर अर्थमंत्री अजित पवार यांचा ११वा अर्थसंकल्प आहे.
****
देशातल्या सर्व नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या ४८ व्या वर्धापनदिन सोहळ्याला दूरदृश्यप्रणालीद्वारे ते संबोधित करत होते. देशातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, संशोधनाला मदत करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था आघाडीवर आहे, असं नड्डा म्हणाले.
****
देशातल्या व्यावसायिक वाहन चालकांसाठी सहकारी संघटना स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केली. अहमदाबादमधे जेतलपूर इथं अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी समारांभात ते काल बोलत होते. पुढच्या पाच वर्षांत दोन लाख सेवा सहकारी संस्था आणि प्राथमिक दूध उत्पादक संस्थांना सहकारी योजनेत समाविष्ट करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले.
****
श्रीलंकेत अविस्सवेल्ला इथं साईबाबांच्या मंदिराचं काल उद्घाटन झालं. भारताचे श्रीलंकेतले उच्चायुक्त संतोष झा, ग्लोबल शिर्डी साई फाउंडेशनचे सी. बी. सत्पथी तसंच मोठ्या संख्येनं भाविक यावेळी उपस्थित होते.
****
माध्यम निरीक्षणविषयी केलेल्या शासन निर्णयाचा उद्देश टीकेला आळा घालणं किंवा माध्यमांवर देखरेख करणं नसून चुकीच्या माहितीचं विश्लेषण करून त्यावर कार्यवाही करणं असल्याचं, राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांना अचूक माहिती पुरवणं हे शासनाचं कर्तव्य आहे, चुकीच्या माहितीचं निराकरण करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत असून घटनात्मक मर्यादांचं पालन करणारी कार्यपद्धती विकसित केली जात असल्याचं सरकारने सांगितलं. शासन विविध माध्यम संस्थांशी संवाद साधून या उपक्रमात आवश्यक त्या सुधारणा करत आहे, असंही सरकारने स्पष्ट केलं.
****
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी येत्या आठ दिवसातच प्राधीकरण तयार होणार असल्याची माहिती, राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नाशिक इथं काल कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. या प्राधिकरणाच्या माध्यमातून एक खिडकी योजनेतून वेगाने कामे करण्यात येतील, असं ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घाटांचं सुशोभीकरण करण्यात येणार असून, सर्व मुलभूत सोयी सुविधांची कामं कायमस्वरूपी करण्यावर भर देण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे कुंभमेळ्यात कायम पाणी प्रवाही राहावं, यासाठी किकवी धरणाच्या कामाला वेग देण्यात येणार असल्याचंही महाजन यांनी सांगितलं.
****
शासनाच्या ई-आफिस प्रणाली वापराच्या उपक्रमात सात मार्चपर्यंत गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत ५१ हजार २३१ ई-ऑफिस फाइल्स तयार करून अकोला जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातले सर्व अधिकारी आणि कर्मचारी ई-ऑफिस प्रणालीत नोंदणी करून कामकाज करत असून, जिल्ह्यातल्या सात पंचायत समित्यांमधल्या १४८ कर्मचाऱ्यांनीही ई-ऑफिस प्रणालीत कामकाज सुरू केलं आहे.
****
पुण्यातल्या रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा प्राध्यापक रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांना काल सांगलीमध्ये प्रदान करण्यात आला. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कृतज्ञता पुरस्कार बुधाजीराव मुळीक यांना देण्यात आला.
****
छत्तीसगड राज्याचं प्रवेशद्वार कवंडे इथं गडचिरोली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत पोलिस ठाणे उभारुन नक्षल्यांना नाकेबंदी केली आहे. गडचिरोली पोलिस दलाच्या सी-60 पथकाचे एक हजार कमांडो, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या २३ चमू, शेकडो नवनियुक्त पोलिस, ५०० पोलिस अधिकारी आणि खासगी कंत्राटदारांच्या मदतीने हे नवे पोलिस ठाणे उभारण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment