Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प
आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार दुपारी
दोन वाजता विधानसभेत आणि त्यानंतर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. महायुती सरकार
पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच, तर अर्थमंत्री अजित पवार यांचा ११वा अर्थसंकल्प
आहे.
****
कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क
कमी करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून, एक निश्चित धोरण आखू, आणि याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असं आश्वासन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. छगन भुजबळ, रोहित पवार यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. कांद्याला दोन हजार २५०
रुपये किमान हमीभाव द्यावा अशी मागणी भुजबळ यांनी केली. यावर या मागणीसाठी केंद्र सरकारकडे
पाठपुरावा करण्यात येईल असं सरकारनं सांगितलं. कांद्याची देशांतर्गत निर्यात वाढवण्याचा
तसंच कांदा चाळी वाढवण्याचा प्रयत्न करू असंही शिंदे यांनी सांगितलं.
अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात ई
पीक पाहणीची योग्य अंमलबजावणी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिलं. ई पीक पाहणीमध्ये सॅटेलाईट जनरेटरी करणार तसंच या प्रक्रियेत ड्रोनचा वापर करण्याचा
प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचं
विजेतेपद मिळवल्याबद्दल भारतीय संघाचं विधानसभेत अभिनंदन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी
मांडलेला हा अभिनंदनाचा ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केला.
****
राज्यातल्या सारथी, बार्टी, महाज्योती
आणि टीआरटीआय या संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिकवणी
संस्था गैरव्यवहार करत असतील तर त्याची चौकशी केली जाईल, असं
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. या स्वायत्त संस्थांमार्फत
प्रशिक्षण देण्यासाठी निविदा मिळवण्यासाठी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना तसंच प्रवेशासाठी
देखील उमेदवारांना आमिष दाखवले जात असल्याचं सांगत भाजपाचे निरंजन डावखरे यांनी तारांकित
प्रश्न उपस्थित केला होता. यावर उच्चस्तरीय प्रशासकीय समिती नेमण्यात आल्याचं शिरसाट
यांनी सांगितलं.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं
दुसरं सत्र आजपासून सुरू झालं. लोकसभेत आणि राज्यसभेतही भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन
करण्यात आलं. चार एप्रिलपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनाच्या या दुसऱ्या सत्रात २०२५-२६ च्या
अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल.
****
गंगा नदीचं पाणी स्वच्छ आणि शुद्ध
असल्याचं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. संसद भवनाबाहेर
वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, काही नेते गंगा नदीच्या पाण्याबद्दल गैरसमज पसरवत असल्याचा आरोप
केला.
****
देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक, सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे. महिला सक्षमीकरणासाठी
आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या, महिलांकरता शिक्षणाचा पाया भक्कम करणाऱ्या,
अनाथांना आश्रय देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन,
अशा शब्दात पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड-पिशोर
मार्गावर आज पहाटे ऊसानं भरलेला ट्रक पलटून झालेल्या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले.
हा ट्रक भरधाव वेगानं कन्नडहून पिशोरकडे जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा
अपघात झाला. या ट्रकमध्ये १७ ऊस कामगार प्रवास करत होते. जखमींना तातडीनं रुग्णालयात
दाखल करण्यात आलं असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि
प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आणि प्रबुद्ध भारत यांच्या वतीनं देशातलं पहिलं संविधान
सन्मान संमेलन या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात होणार आहे. या संमेलनाचं उद्घाटन
समाज प्रबोधनकार, स्पर्धा
परीक्षा मार्गदर्शक, माजी सनदी अधिकारी विकास दिव्यकिर्ती यांच्या
हस्ते होणार आहे. संविधानाशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानं,
चर्चासत्र आणि संवाद यात होणार असल्याचं प्रबुद्ध भारत मंडळानं कळवलं
आहे.
****
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या
अंबाजोगाई, केज,
धारूर शाखेच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या रेल्वे आणि आकाशवाणीच्या प्रश्नांच्या
संदर्भात खासदार बजरंग सोनवणे यांना निवेदन देण्यात आलं. विविध मुद्यांवर यावेळी चर्चा
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं होळीनिमित्त
धावणाऱ्या पाटणा-जालना-पाटणा या विशेष रेल्वेच्या वेळेत बदल केला आहे.
नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी जालना इथून आज आणि १५ तारखेला रात्री दहा वाजता सुटेल
आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पावणे दहा वाजता पाटणा इथं पोहोचेल.
तर पाटणा इथून ही गाडी १२ आणि १७ तारखेला दुपारी पावणे चार वाजता
सुटेल आणि जालना इथं तिसऱ्या दिवशी सकाळी साडे पाचच्या दरम्यान पोहोचेल, असं विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या
लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ११ मार्चपर्यंत कोकणपट्ट्यासह मुंबई, ठाणे, पालघर या
जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
No comments:
Post a Comment