Wednesday, 19 March 2025

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १९ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १९ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

अंतराळात नऊ महिने राहावे लागलेले नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठीच्या ४५ दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आज पहाटे हे दोघेही स्पेस एक्सच्या क्रू-9 कॅप्सूलमधून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचं पृथ्वीवर परत आल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात सिंह यांनी, या अंतराळवीरांच्या समर्पणाचं कौतुक करत, हा अवकाश संशोधनासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे. 

****

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं क्षयरोग निर्मूलन उपायांसाठी आयोजित इंडिया इनोव्हेशन समिट - पायोनियरिंग सोल्युशन्स टू एंड टीबी; या कार्यक्रमाचं उद्घाटन काल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं. देशाला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करणं हे या संमेलनाचं उद्दिष्ट आहे. भारतातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध पातळ्यांवर भरीव प्रयत्न सुरू असल्याचं पटेल यांनी सांगितलं. 

****

लोकसभेतील चर्चा आणि कामकाज सर्व भाषांमध्ये उपलब्ध होण्याच्या उद्देशानं कृत्रिम बुद्धीमत्ता अभियानाअंतर्गत काल एक सामंजस्य करार करण्यात आला. नवी दिल्ली इथं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या माध्यमातून एआय कोश नावाचा एक डेटा सेट तयार केला जाणार आहे. एआय कोशमुळे लोकसभेतील व्यापक चर्चा आणि वादविवादांचं कोणत्याही भाषेत भाषांतर केलं जाणार आहे. 

****

भारताने २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दीष्ट  ठेवलं असल्याचं, परराष्ट्र राज्य मंत्री तसंच केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी काल अधोरेखित केलं. भारताच्या हवामान उपक्रमावरील रायसीना संवादात बोलताना सिंह यांनी, २०३० पर्यंत अक्षय ऊर्जेपासून एकूण ऊर्जा क्षमतेच्या ५० टक्के लक्ष्य साध्य करण्यासाठी देश वचनबद्ध असल्याचं सांगितलं. अर्थव्यवस्थेत ऊर्जा कार्यक्षमता साध्य करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे २००५ ते २०२० दरम्यान भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या उत्सर्जन तीव्रतेत ३६ टक्क्यांनी घट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

२०२४-२५ या आर्थिक वर्षातल्या पंधराव्या वित्त आयोग अनुदानाची रक्कम केंद्र सरकारनं राज्यातल्या ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित केली आहे. यामध्ये ६११ कोटी रुपयांचा एकत्रित अनुदानाचा दुसरा हप्ता आणि पहिल्या हप्त्यातील एकत्रित अनुदानाच्या आठ कोटी ४२ लाख रुपयांचा समावेश आहे. राज्यातल्या पात्र ठरलेल्या चार जिल्हा परिषदा, ४० पंचायत समित्या आणि २१ हजार ५५१ ग्रामपंचायतींना हा निधी दिला जाणार आहे.

****

नाशिकमध्ये आज रंगपंचमी साजरी होत आहे. या उत्सवासाठी नाशिक शहरात सात ठिकाणी पेशवेकालीन रहाडी असून जमिनीखाली असलेल्या या रहाडी म्हणजेच हौद यापूर्वीच खुले करण्यात आले आहेत. प्रथेप्रमाणे आज दुपारी महिला आणि मानकऱ्यांच्या हस्ते रहाडीचं पुजन करण्यात येईल आणि त्यानंतर नैसर्गिक रंग खेळला जाईल. नाशिकमधल्या काही मंदिरांमध्येही रंगोत्सव होणार आहे. 

****

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षा स्थगितीला विरोध करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २१ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने शिक्षेला दिलेल्या स्थगितीच्या विरोधात अंजली राठोड यांची याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रशिक्षण आणि रोजगार विभाग, राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि माहिती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'नायलेट'मध्ये काल रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विविध कंपन्यासाठी ४३२ जणांची निवड करण्यात आली. 

****

शासकीय सेवा नागरिकांना वेळेत देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्र आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिले आहेत. काल नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं भेट देत त्यांनी आढावा बैठक घेतली. सर्व शासकीय कार्यालयामध्ये लोकसेवा हक्क अधिनियमाचे नोटीस बोर्ड असणं आवश्यक असून, ते लावण्याच्या सूचना आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिल्या.

****

सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातले ७५० हून अधिक ज्येष्ठ नागरिक अयोध्या धाम इथं प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले. या रेल्वेगाडीला समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवला. 

****

इंग्लंडमधे सुरु असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. ड गटात काल झालेल्या सामन्यात महिला संघानं वेल्स संघावर ८९-१८ असा विजय नोंदवला. भारतीय पुरुष संघांचा दुसरा सामना आज रात्री स्कॉटलंडबरोबर होणार आहे. या स्पर्धेत महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांमधे भारत गतविजेता आहे. 

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...