Wednesday, 19 March 2025

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १९ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

अंतराळात नऊ महिने राहावं लागलेल्या नासाच्या अंतराळवीरांना पृथ्वीवर सुखरूप परत आणण्याच्या, नासाच्या स्पेस एक्स क्रू नाईन या मोहिमेच्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नासाच्या पूर्ण पथकाचं अभिनंदन केलं आहे. भारताची कन्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकारी अंतराळवीरांनी आपल्या दृढता, समर्पण आणि हार न मानण्याच्या भावनेनं सर्वांना प्रेरणा दिली आहे, असं राष्ट्रपतींनी याबाबतच्या संदेशात म्हटलं असून, या अंतराळवीरांचं आरोग्य उत्तम राहो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. अथक आणि चिकाटीनं प्रयत्न करणं म्हणजे काय, हे या मोहिमेतल्या सर्वांनी जगाला दाखवून दिल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठीच्या ४५ दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरु केली जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता.

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नांदेड - पुणे रेल्वेला वंदे भारत मध्ये रुपांतरित करण्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी, देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं. पुणे तसंच हडपसर इथल्या रेल्वे स्थानकांचं अधुनिकीकरण करुन, त्यांची क्षमता वाढवण्याचं काम सुरु आहे, त्यानंतर या स्थानकांवरुन रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. 

****

आज केंद्रीय राखीव पोलीस दल- सीआरपीएफ दिन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दिनानिमित्त या दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. १९५० साली आजच्याच दिवशी या दलाला राष्ट्रपती ध्वजानं सन्मानित केलं गेलं होतं, याचं स्मरण करत, सीआरपीएफचं शौर्य आणि बलिदान राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा नेमका किती आहे, याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमून पुढील पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. सभागृहात याबाबतच्या प्रश्नाला मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांचं समाधान न झाल्यानं, अध्यक्षांनी हे निर्देश दिले.

राज्यात कुष्ठरोग्यांची संख्या देशाच्या तुलनेत अत्यंत कमी असून, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रति रुग्ण मिळणारं अनुदान मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिलं असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

****

नागपूर इथं सोमवारी रात्री झालेल्या दंगलीच्या घटनेनंतर अकरा पोलीस स्थानकांतर्गत लागू करण्यात आलेली संचारबंदी आजही सुरू असून, केंद्रीय राखीव पोलीस दल-सीआरपीएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचं पोलीस उपायुक्त राहूल माखनिकर यांनी सांगितलं आहे.

****

पुण्यात हिंजवडी इथं एका टेंपोला लागलेल्या आगीत व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य काही जण जखमी झाले. आज सकाळी आठ वाजता या टेंपोच्या चालकाच्या केबिनमध्ये आग लागली, त्यावेळी चालक आणि पुढच्या भागात बसलेले कर्मचारी खाली उतरले, मात्र वाहनाचे मागचे दरवाजे उघडू न शकल्याने ही दुर्घटना घडली. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

नाशिकमध्ये आज रंगपंचमी साजरी होत आहे. या उत्सवासाठी नाशिक शहरात सात ठिकाणी पेशवेकालीन रहाडी असून जमिनीखाली असलेल्या या रहाडी म्हणजेच हौद यापूर्वीच खुले करण्यात आले आहेत. प्रथेप्रमाणे महिला आणि मानकऱ्यांच्या हस्ते रहाडीचं पूजन करण्यात येईल आणि त्यानंतर नैसर्गिक रंग खेळला जाईल. नाशिकमधल्या काही मंदिरांमध्येही रंगोत्सव होत आहे.

****

धाराशिव  इथं जलजागृती सप्ताहाअंतर्गत काल कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मागणी आणि पुरवठा आधारित उपाययोजनांची ओळख तसंच जलसंधारणाच्या कामाची देखभाल आणि दुरुस्ती यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आलं.

****

लातूर जिल्ह्यात लातूर-नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातल्या नांदगाव पाटी इथल्या अपघातांच्या ब्लॅक स्पॉटवर प्रशासनाच्या सूचनेवरून लोखंडी बॅरिकेड लावण्यात आले आहेत. या  बॅरिकेडमुळे नांदगावकडे जाणारी वाहनं बंद झाल्याने ग्रामस्थांनी काल रस्ता रोको आंदोलन करत बॅरिकेड काढण्याची मागणी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...