Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 06
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर यांना त्यांच्या सत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी
आज पहाटेपासूनच चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी मोठी रांग लावली आहे.
मुंबईत, राज्य सरकारने चैत्यभूमी, शिवाजी पार्क आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान
असलेल्या राजगृह इथं महापरिनिर्वाण दिनासाठी विस्तृत व्यवस्था केली आहे. यासाठी आठ
हजारांहून अधिक कर्मचारी सध्या तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने चैत्यभूमी
आणि चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरवल्या असून या परिसरात समता सैनिक दलाचे जवान
आणि पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. देशभरातून आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर दाखल
होत असून अनुयायांच्या सुविधेसाठी राज्यभरातून अनेक विशेष रेल्वेगाड्या तसंच अतिरिक्त
लोकल्सही सोडण्यात आल्या आहेत.
****
दरम्यान, मुंबईत चैत्यभूमी इथं आज सकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
अभिवादन केलं.
इंदू मिलच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या स्मारकाचं काम पुढच्या सहा डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिली. हे स्मारक आपणा सर्वांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या देशाचं संविधान हे
सर्वश्रेष्ठ असून या संविधानामुळेच सर्वांना समान संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मंत्री संजय शिरसाट, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार तसंच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी
अभिवादन केलं.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
मध्यरात्री नाशिक शहरातील सीबीएसवरील पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.
या वेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, आदी उपस्थित होते. दरम्यान, आज नाशिक शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
नाशिक इथं २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील
तपोवन इथल्या ५४ एकर वरील एक हजार आठशे झाडं तोडून या जागेवर प्रदर्शन केंद्र साकारण्याचा
नाशिक महापालिकेचा प्रस्ताव स्थगित करण्यात आला असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश
महाजन यांनी दिली. नाशिक शहरातील पर्यावरण वाचवण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून तपोवनमध्ये
विविध प्रकारची आंदोलनं होत असून या पर्यावरणप्रेमींसोबत राजकीय पक्षही सहभागी झाले
आहेत. काल शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रतिकात्मक कुऱ्हाड जाळून आंदोलन करण्यात आलं, तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेच्या
वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे, दरम्यान मनसेचे कार्यकर्ते निखिल पंडित यांनीही वृक्षतोडीच्या
विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे.
****
सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे वेगळे ठरलेल्या ५० मराठी
चित्रपटांना सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे १४ कोटी ६२
लाख रुपयांचं अर्थसहाय्य काल मुंबईतल्या रविंद्र नाट्यमंदिर इथं आयोजित कार्यक्रमात
देण्यात आलं. ही केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक आशय असलेल्या नावीन्यपूर्ण तंत्राचा
वापर करणाऱ्या प्रेक्षकांच्या जाणीव जागृतीला हातभार असल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी
यावेळी सांगितलं. मुंबईतल्या चित्रपट नगरीचा अंतिम आराखडा मंजूर झाला असल्याची माहितीही
त्यांनी दिली. या कार्यक्रमात, गणेशोत्सव रिल्स स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज शौर्य दिनानिमित्त गुलमंडी परिसरातल्या सुपारी
हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय
अर्थ राज्यमंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष
किशोर शितोळे यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषेदेचे माजी विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे आदींची उपस्थिती होती.
****
राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई उपाख्य
मावशी केळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘मावशी तेजोमयी
विचारांची ज्योत’ हे नाटक आज छत्रपती
संभाजीनगर इथं आयोजित करण्यात आलं आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता
होणारं हे नाटक सर्वांसाठी खुलं आहे.
****
जागतिक मृदा दिनानिमित्त काल
जळगांव जिल्ह्यात यंदा रशियन पाहुण्यांकडून माती संवर्धनाची हाक देण्यात आली. वाढत्या
प्रदूषणासह रासायनिक खतं, कीटकनाशकांचा अमर्याद वापर आणि बदलती मानवी जीवनशैली यामुळे
भारतासह जगभरातील मातीचे आरोग्य झपाट्याने खालावत आहे. या पार्श्वभूमीवर, मातीचं महत्त्व
आणि तिचं संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिन
साजरा करण्यात येतो.
****
No comments:
Post a Comment