Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०२ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यातल्या २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान सुरु आहे. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान सुरु
राहील. या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असून, एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक
अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जालन्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी शांततेत
मतदान सुरु आहे. भोकरदन इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच
मतदारांची गर्दी पहायला मिळत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती तयारी केली
असून प्रशासन निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज आहे. भोकरदन इथं माजी केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदान केलं. जालना जिल्ह्यात साडे नऊ वाजेपर्यंत नऊ पूर्णांक ८९ टक्के तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ पूर्णांक २७ मतदान झालं.
नांदेड जिल्ह्यात १० नगरपरिषदा आणि
एका नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. पहिल्या दोन तासात सात पूर्णांक ६९ टक्के मतदान
झालं आहे. या निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
यांनी केलं.
नाशिक जिल्ह्यातल्या ११ नगरपालिकांसाठी
शांततेत मतदान सुरू आहे. पहिल्या दोन तासांत सर्वाधिक १३ पूर्णांक ३५ टक्के मतदान त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत, तर सर्वात कमी तीन पूर्णांक ८२ टक्के मतदान नांदगाव
नगरपरिषदेत झालं.
****
चौथ्या काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाची
सुरुवात आजपासून उत्तर प्रदेशात काशीमध्ये होत आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक
एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जातो. यंदा या
कार्यक्रमाची संकल्पना 'एक भारत श्रेष्ठ भारत' असून तमिळनाडू मधून सुमारे पंधराशे
प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सांस्कृतिक परंपरा आणि भाषिक देवाण-घेवाणीला
नवी दिशा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला जाईल.
****
देशभरातलं वस्तू आणि सेवा कर संकलन
गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या तुलनेने यंदा सात दशांश टक्क्यांनी वाढून १ लाख ७० हजार
कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात जीएसटी महसूल १ कोटी
६९ लाख कोटी रुपये इतका होता.
****
देशभरातल्या डिजिटल अटक प्रकरणांचा
तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला आहे. देशात डिजिटल अटक घोटाळे, गुंतवणूक घोटाळे आणि अंशकालीन कामासंबंधीचे घोटाळे या तीन
प्रकारचे सायबर घोटाळे होत असल्याची माहिती, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य
बागची यांच्या पीठाला ॲमिकस क्युरिए अर्थात न्यायमित्रांनी दिली.
****
भारताची सागरी शक्ती, आत्मनिर्भरता आणि विकसित भारताच्या
उभारणीत नौदलाची निर्णायक भूमिका असेल, असं प्रतिपादन नौदलप्रमुख
ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केलं. सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागानं आयोजित केलेल्या जनरल बी.सी. जोशी स्मृति व्याख्यानात ते काल बोलत होते.
भारताला लाभलेली मोठी किनारपट्टी, तसंच भारताचं सागरी क्षेत्रातील
सामरिक आणि आर्थिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. युद्धनौका बांधणीच्या क्षेत्रात
देश स्वावलंबी होणं महत्त्वाचं असून, या माध्यमातून नवीन रोजगार
निर्मितीही होणार असल्याचं ते म्हणाले.
****
समरसता, बंधुभाव, एकता राखणं ही वेदांची शिकवण असून, संघटन ही एक ताकद असल्याचा वेदांचा
उपदेश, आपल्या जीवनात अंगीकारण्याची गरज
आहे, असं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत
यांनी केलं. पुण्याजवळ मोशी इथल्या वेदश्री तपोवन इथं आयोजित गीता जयंती महोत्सवात
ते काल बोलत होते. मानवाची आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी आपल्याला वेद, गीता, उपनिषदांकडे पुन्हा जावं लागेल, असंही ते म्हणाले. अयोध्येतील श्रीराम
मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज यांच्यासह अन्य मान्यवर
यावेळी उपस्थित होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काल आळंदीलाही भेट दिली.
****
राजस्थानमध्ये विद्यापीठ स्तरावरील
पाचवी खेलो इंडिया स्पर्धा सुरू आहे. काल कुस्तीमध्ये पुरुष गटात ग्रीको रोमन प्रकारात
५५ किलो वजनी गटात पुण्याच्या अजय निंबाळकरने रौप्यपदक पटकावलं. महिला गटात शिवाजी
विद्यापीठाच्या समृद्धी घोरपडे हिने ५३ किलो वजनी गटात, तर सृष्टी भोसले हिने ६५ किलो वजनी गटात कांस्य पदकाची
कमाई केली. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठानं ६ सुवर्ण, ११ रौप्य आणि ९ कांस्य
अशा २६ पदकांची कमाई केली असून, पदक तालिकेत विद्यापीठ
सहाव्या स्थानावर आहे.
****
ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत दित्वा
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला भारतानं ५३ टन मदत साहित्य पोहोचवलं आहे. याशिवाय, तंबू, पांघरुणं, तयार अन्नपदार्थ, औषधं, वैद्यकीय साहित्य यासह आणखी साडे एकतीस टन मदत साहित्य, भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांद्वारे
पाठवण्यात येणार आहे. तसंच एनडीआरएफसह विविध पथकांकडून मदत आणि बचावकार्य देखिल सुरू आहे.
****
No comments:
Post a Comment