Saturday, 6 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ७० व्या महापरिनिर्वाण दिनी सर्वत्र अभिवादन-मराठवाड्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महामानवास आदरांजली

·      न्यायालयीन निर्णय प्रक्रियेची जागा कोणतंही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

·      विमान रद्द प्रकरणी प्रलंबित प्रवासभाडं विनाविलंब परत देण्याचे इंडिगोला निर्देश

आणि

·      तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर २७१ धावांचं आव्हान

****

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यासह देशभरातून आदरांजली अर्पण केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. संसद भवनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह संसद सदस्यांनी बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.

 

बाबासाहेबांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, न्याय, समता आणि संविधानाच्या तत्वांवरची त्यांची निष्ठा देशाच्या वाटचालीत महत्त्वाची ठरली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

 

नागपूर इथं विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन केलं. दीक्षाभूमी, संविधान चौक, शांतिवन चिचोली आदींसह शहरातील विविध बुद्ध विहारांमध्ये हजारो अनुयायींनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केलं.

****

मुंबईत दादरच्या चैत्यभूमी इथं राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. इंदू मिलच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पुढल्या वर्षी सहा डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, आनंदराज आंबेडकर यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं.

****

मराठवाड्यात विविध कार्यक्रमांतून महामानवाला आदरांजली अर्पण करण्यात आली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रवींद्र केसकर यांचं विशेष व्याख्यान झालं. बाबासाहेबांच्या जीवनातील दोन सुवर्ण पाने-माता रमाई आणि माईसाहेब या विषयावर केसकर यांनी मार्गदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतही बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. विविध पक्ष संघटनांच्या वतीनेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

 

लातूर जिल्ह्यातल्या पानगावात बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन करण्यासाठी शेकडो अनुयायी दाखल झाले आहेत. बाबासाहेब यांच्या अंत्यविधीनंतर पानगावातल्या काही तरुणांनी त्यांच्या अस्थी पानगाव इथं आणल्या होत्या. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशातून हजारो अनुयायांनी बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन केलं.

 

धाराशिव इथं सामाजिक समरसता मंच, केसरीया प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आलं. महिला पुरुषांनी या शिबीरात उत्स्फुर्तपणे रक्तदान केलं.

 

नांदेड इथं महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

आयकर प्रणाली सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार काम करत असून यापुढे ती किचकट राहणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत एका खासगी माध्यम संस्थेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आयकर रचनेचे टप्पे पारदर्शक आणि सुलभ करणं आवश्यक असून सीमाशुल्क चौकटीत फेरबदल करणं हा याचा पुढचा टप्पा असल्याचं, सीतारामन यांनी सांगितलं. गेल्या दोन वर्षांत सीमाशुल्क कमी करण्यात आल्याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधलं. मध्यमवर्गीयांची बचत कमी होत नसून ती गुंतवणुकीत परावर्तीत होत असल्याचंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

कोणतंही तंत्रज्ञान न्यायालयीन निर्णय प्रक्रियेची जागा घेऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयीन प्रक्रियेत एआय आणि मशिन लर्निंगचं नियमन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं हे मत नोंदवलं. न्यायालयीन निर्णय प्रक्रियेला नियंत्रित करण्याची परवानगी एआयला दिली जाणार नाही, असं सरन्यायाधीशांनी नमूद केलं. न्यायाधीशांचं स्वातंत्र्य आणि मानवी विवेकबुद्धीचं भारतीय न्यायव्यवस्थेतलं स्थान अबाधित राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

नागरी हवाई वाहतुक मंत्रालयाने इंडिगो कंपनीला सर्व प्रवाशांच्या तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंब परत देण्याचे निर्देश दिले आहेत. रद्द केलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या सर्व उड्डाणांसाठी परतफेड प्रक्रिया उद्या रविवार ७ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत. उड्डाण रद्द झाल्यामुळे ज्या प्रवाशांचा प्रवास प्रभावित झाला आहे, त्यांच्यासाठी कोणतंही पुनर्निर्धारण शुल्क आकारू नये, असे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसंच परतफेड प्रक्रियेत कोणताही विलंब केल्यास किंवा अनुपालन न केल्यास त्वरित नियामक कारवाई केली जाईल असा इशारा मंत्रालयाने दिला आहे. उड्डाण रद्द झाल्यामुळे किंवा विलंबामुळे दूर गेलेलं प्रवाशांचं सामान शोधून प्रवाशांच्या निवासस्थानी किंवा त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पुढील ४८ तासांच्या आत पोहोचवलं जाईल, याची खातरजमा करण्याचे निर्देशही मंत्रालयाने दिले आहेत.

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असून ते अतिदक्षता विभागात असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज रुग्णालयात जाऊन आढाव यांची भेट घेत त्यांच्या कुटुंबीयांकडे प्रकृतीची विचारपूस केली.

****

कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील तपोवन इथल्या ५४ एकरावरील एक हजार आठशे झाडं तोडण्याचा नाशिक महापालिकेचा प्रस्ताव स्थगित करण्यात आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. वृक्षतोडीच्या या प्रस्तावाला गेल्या १५ दिवसांपासून पर्यावरणप्रेमींसह समाजाच्या सर्वच स्तरातून विरोध होत होता.

****

येत्या १३ डिसेंबर रोजी राज्यभर होणाऱ्या लोकअदालतीमध्ये ई-चलन प्रकरणांची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असं स्पष्टीकरण वाहतुक शाखेचे अपर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलं आहे. काही सामाजिक संपर्क माध्यमांवर लोकअदालतीत ई-चलन दंडात सवलत मिळणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना विशाखापट्टणम इथं सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करतांना दक्षिण आफ्रिका संघ २७० धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं भारतीय संघाने पाच षटकात बिनबाद सोळा धावा केल्या आहेत. या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं प्रत्येकी एक सामना जिंकल्यानं मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

****

भारतीय दिव्यांग महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा कदम आज हिंगोली जिल्ह्यात फुटाणा या गावी आली. पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार नागेश पाटील आष्टीकर, यांच्यासह गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढून गंगा कदमचा सत्कार केला. वसमतचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या वतीने गंगा कदम हिला एक लाखाचे पारितोषिक देण्यात आलं. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी गंगाला तीन खोल्यांचं घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं, तर गंगा कदम हिला शासकीय सेवेत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं, पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितलं.

****

सातारा इथं होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून समारोप सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान सातारा इथं हे संमेलन होणार आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या किल्लारी इथला निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना आजपासून सुरू झाला. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी कारखाना सुरू होण्यापूर्वी, कारखाना ते ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरापर्यंत ३ किलो मीटर दंडवत घालत आपला नवस पूर्ण केला.

****

राज्यात आज सर्वात कमी नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल यवतमाळ इथं १० पूर्णांक दोन तर मालेगाव इथ अकरा पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिव इथं १२ अंश, छत्रपती संभाजीनगर तसंच परभणी इथं साडे १२ अंश, बीड इथं १२ पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: