Sunday, 7 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 07 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राष्ट्राचं संरक्षण अविचल धैर्यानं करणाऱ्या सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांप्रती आपली मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

सशस्त्र दलाच्या जवानांचं शिस्तबद्ध वर्तन, दृढनिश्चय आणि अदम्य जिद्द हे राष्ट्राच्या संरक्षणासह देशवासीयांना सबळ करतात असं पंतप्रधान म्हणाले. सामाजिक संपर्क माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नमूद केलं की, जवानांचं समर्पण हे कर्तव्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं उज्ज्वल उदाहरण आहे. सशस्त्र दलाच्या पराक्रम आणि सेवेचा सन्मान म्हणून सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत सर्वांनी योगदान देण्याचं  आवाहनही पंतप्रधानांनी केलं.

****

गोव्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यात अर्पोरा इथं एका नाईट क्लबमध्ये रात्री उशिरा,गॅस सिलेंडरच्या स्फोटातील आगीत मृत झालेल्यांची संख्या पंचवीस झाली आहे. तर, सहा जण जखमी झाले. क्लबच्या स्वयंपाकघरात काम करत असलेले कर्मचारी आणि चार पर्यटकांचा मृतांमध्ये समावेश असून काही जळून तर बरेच जण गुदमरुन दगावले. आवश्यक अग्नि प्रतिरोधक यंत्रणा क्लबमध्ये नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबाबत सामाजिक माध्यमावर शोक संदेश जारी केला आहे. पंतप्रधानांनी या दूर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाद्वारे मदतनिधीची घोषणाही करण्यात आली.

****

इंडिगो विमान सेवा कंपनीच्या विस्कळीत झालेल्या सेवेमुळे विमान प्रवाशांची झालेली गैरसोय – मन:स्तापाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्सबर्स तसंच व्यवस्थापक इसीड्रो पोरकेरास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना,येत्याचोवीस तासात स्पष्टीकरण देण्याचंही सांगण्यात आलं आहे. इंडिगो कंपनीला रद्द केलेल्या किंवा विस्कळीत सर्व उड्डाणांसाठी परतफेड प्रक्रिया आज रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत. प्रवास प्रभावित झालेल्यांना पुनर्निर्धारण शुल्क न आकारण्याचं आणि प्रवाशांचं सामान शोधून प्रवाशांकडे ४८ तासांत पोहोचवण्याबबत कारवाईचेनिर्देशही देण्यात आले. दरम्यान, विमान उड्डाणं रद्द झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागानं सुलभ प्रवास आणि पुरेशी निवास व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत उपाययोजना केल्या. इंडीगो कंपनीनं नव्यानं जारी केलेल्या माहितीनुसार कंपनीतर्फे आज दीड हजारांहून जास्त विमान उड्डाणांचं नियोजन करण्यात आलं आहे.

****

रेल्वेतर्फे वाढती थंडी- रद्द झालेली विमानं आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेत कालपासूनच येत्या दोन दिवसांसाठी विविध विभागात ८९ विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत.मध्य रेल्वेनं पुण्याहून बंगरुळू आणि दिल्लीकडे तसंच मुंबईहूनही दिल्लीसह विविध मार्गांवर चौदा विशेष रेल्वेंचं नियोजन केलं. पश्चिम रेल्वेतर्फे भिवानीहून मुंबई, मुंबई- शकूरबस्तीसह अन्य मार्गोंसाठी सात विशेष रेल्वे सुरु केल्या. तर, दक्षिण मध्य रेल्वेतर्फे  चेरलापल्ली - शालीमार, सिकंदराबाद - चेन्नई एग्मोर आणि हैदराबाद-मुंबई विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं आहे.

****

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज पहाटे एक वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देवून रुग्णालयातील आरोग्य सेवांची सविस्तर पाहणी केली. आपत्कालीन सेवा, स्वच्छता स्थिती, औषधी साठा, विविध विभागांचं कामकाज-यंत्रसामग्रीची कार्यस्थिती यांचा त्यांनी प्रत्यक्ष तपास केला. तसंच रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रीयाही जाणून घेतल्या. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी आरोग्यसेवेबाबत संबंधितांना आवश्यक सूचना यावेळी दिल्या.

****

बीड जिल्ह्याच्या वडवणी इथं येत्या दहा आणि अकरा डीसेंबर दरम्यान अती जलद रेल्वेगाडीद्वारे चाचणी होणार असल्याची माहिती रेल्वे विभागातील अधिकारी श्रीकेश मीना यांनी दिली आहे. रेल्वेला कोणत्याही मोठ्या पुलावर धोका होऊ नये तसंच रेल्वेमुळे पुलाला तडे जाऊ नये म्हणून इंजिनची पहीली चाचणी बीड-वडवणी लोहमार्गादरम्यान घेण्यात येत असल्याचं वृत्त आहे.

****

बीड जिल्ह्यातून जाणा-या धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर याप्रकरणाची गंभीर दखल घेण्याच्या मागणीचं निवेदन खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना सादर केलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड न करता, पोलिस गस्त वाढवनं, रात्री विशेष पथकं नियुक्ती, सी.सी.टी.व्ही. प्रणाली बळकटीकरण आदी मुद्द्यांचा यात समावेश आहे.

****

अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटात माता-बालमृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे राज्याच्या तीन प्रधान सचिवांचा समावेश असलेल्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विविध पथकांनी संयुक्त पाहणी दौरा पूर्ण केला. यातील निरीक्षणं १८ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सादर होणार आहेत. याच दिवशी मेळघाटसंबंधी याचिकेची सुनावणीही होणार आहे. याबाबत काल अमरावती इथं बैठकही घेण्यात आली. मेळघाटातील समस्यांवर मुंबई उच्च न्यायालयात दाखल विविध जनहित याचिका एकत्रित करून सुनावणी सुरू ठेवत याभागात सरकारी यंत्रणेतील कामकाजाच्या अनुषंगानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष संयुक्त पाहणीचे निर्देश दिले होते.

****

No comments: