Sunday, 7 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून

·      मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

·      सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत योगदान देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

आणि

·      आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा

****

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास उद्यापासून नागपूर इथं सुरुवात होत आहे. १४ तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा सखोल आढावा आज घेण्यात आल्याची माहीती, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज वार्ताहरांना दिली. अत्यावश्यक सुविधा, निवारा, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, वायफाय, टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. विधिमंडळ परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणे मुंबईहून अधिवेशनासाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचंही ते म्हणाले. राज्य विधान मंडळामध्ये दोन्हीही सभागृहात विरोधी नेते पदाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं वार्ताहर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे यांनी सांगितलं.

****

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं निवासस्थानी विधीमंडळ सदस्यांना चहापानासाठी आमंत्रित केलं आहे. या चहापान कार्यक्रमावर, विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना दिली. सत्ताधाऱ्यांनी दोन्हीही सभागृहात विरोधी पक्षनेते पदं रिक्त ठेवली आहेत. ही दोन्हीही पदं संविधानिक पदं आहेत आणि ती रिक्त असल्यामुळं सरकारचा राज्य घटनेवर अविश्वास असल्याचा संशय निर्माण होतो अशी टीका त्यांनी केली. १९८५ मध्ये भाजपचे १६ आमदार असतानाही, त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं होतं. मात्र आज सत्ताधाऱ्यांना विरोधकांची भीती वाटते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी महाविकास आघाडीतले विविध नेते उपस्थित होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सशस्त्र सेना ध्वज दिना निमित्त सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांप्रती आपली मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, सशस्त्र दलाच्या जवानांचे शिस्तबद्ध वर्तन, दृढनिश्चय आणि अदम्य जिद्द हे राष्ट्राचे संरक्षण करतात आणि देशवासीयांना सबळ करतात. त्यांनी नमूद केले की, त्यांची निष्ठा ही कर्तव्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचे उज्ज्वल उदाहरण आहे. सशस्त्र दलाच्या पराक्रम आणि सेवेचा सन्मान म्हणून सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत सर्वांनी योगदान द्यावे, असं आवाहनही पंतप्रधानांनी यानिमित्त केलं आहे.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सीमा रस्ते संघटनेच्यावतीनं उभारल्या जात असलेल्या, धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या १२५ पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं. हे प्रकल्प ७ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये उभारले जात आहेत. हे पायाभूत सुविधा प्रकल्प देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारतीय सैन्यदलाचे सैनिक तसंच सीमा रस्ते संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना समर्पित असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पाअंतर्गत लेह मधील श्योक बोगद्याचाही समावेश आहे. या बोगद्यामुळे लडाखमध्ये कडाक्याच्या थंडीच्या काळासह बारमाही दळणवळणीय जोडणी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग आधारित अनुप्रयोग कुशल, ग्राहक-केंद्रित आणि स्वयं-सुधारणा वितरण प्रणाली विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील, असं केंद्रीय वीज मंत्री मनोहर लाल यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या वीज वितरण क्षेत्रातल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमधील सहभागीना संबोधित करताना ते बोलत होते.

****

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं झाल्यानिमित्त उद्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला सुरुवात करतील. दुपारी बारा वाजता चर्चेला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूक सुधारणा या विषयावर ९ डिसेंबरला चर्चा होणार असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत निश्चित झालं आहे.

****

गोव्यात आरपोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये काल रात्री लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये चार पर्यटकांसह बहुतांश क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही आग गॅस सिलिंडर स्फोटामुळं लागल्याचा अंदाज स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं नसल्याचंही वृत्त आहे. आग लागलेल्या ठिकाणावरून सर्व मृतदेह बाहेर काढले आहेत. या क्लबला योग्य तपासणी न करता परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांसह, प्रत्येक जबाबदार व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांसह अनेकांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

मध्यप्रदेशातील बालाघाट इथं आज १० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यातील प्रमुख कबीर याच्यावर ७७ लाखाचं बक्षीस घोषित केलेलं होतं.

****

इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून २२० पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली आहेत. मात्र, लवकरच आपली सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून पंधराशेहून जास्त उड्डाणं चालवण्याचं आश्वासन इंडिगोने आपल्या निवेदनात दिलं आहे. इंडिगो विमान कंपनीने आपल्या रद्द केलेल्या किंवा व्यत्यय आलेल्या विमानांमुळे नुकसान झालेल्या सर्व प्रवाशांचे पैसे आज रात्री आठ वाजेपर्यंत परत करावेत, असे निर्देश सरकारने दिले आहेत. तसंच, पुढच्या २४ तासांत तिकीट रद्द झाल्यामुळे किंवा विलंबामुळे प्रवाशांपासून विलग झालेलं त्यांचं सर्व सामान शोधून त्यांना परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या तक्रारींसाठी तसंच पैशांच्या परतफेडीसाठी स्वतंत्र सुविधा कक्ष सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या कक्षांमार्फत संबंधित प्रवाशांशी संपर्क साधून परतफेडीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमानसेवेच्या उड्डाणांचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामामुळे भारतीय रेल्वे सेवेने आपल्या विविध विभागांमध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी ८९ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे विभागात पुणे ते बेंगळुरू, पुणे ते दिल्ली आणि मुंबई ते दिल्ली यासह विविध मार्गांवर १४ विशेष गाड्या, पश्चिम रेल्वे विभागात भिवानी ते मुंबई आणि मुंबई ते शकुरबस्ती अशा विविध मार्गांवर ७ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वे विभागात चर्लापल्ली ते शालीमार, सिंकदराबाद ते चेन्नई एगमोर आणि हैदराबाद ते मुंबई अशा तीन विशेष गाड्या चालवल्या जातील.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं सुरू केलेली हैदराबाद – हडपसर ही विशेष गाडी आज सात डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून उद्या हडपसर इथून सुटणारी हडपसर - हैदराबाद ही विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. परिचलन कारणास्तव या गाड्या रद्द केल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज पहाटे एक वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देवून रुग्णालयातील आरोग्य सेवांची पाहणी केली. आपत्कालीन सेवा, स्वच्छता स्थिती, औषधी साठा, विविध विभागांचं कामकाज-यंत्रसामग्रीची कार्यस्थिती याची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रीयाही आरोग्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या आणि त्या संबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

****

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने संदर्भात एक बैठक आज छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्यात आली. या बैठकीत इंडियन मेडिकल असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. जनहिताचा विचार करून डॉक्टर, शुश्रुषा कर्मचारी तसंच रुग्णांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडण्यात आल्या. रुग्णांना वेळेवर आणि अधिक चांगला उपचार मिळावा यासाठी आवश्यक सर्व उपाय योजन्याच्या सूचना यावेळी आबीटकर यांनी केल्या तसंच आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मातोश्री पाणंद रस्ते योजनेच्या कामातील घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी कारवाई केली आहे. यात सात रोजगार सेवकांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले असून दोन सहायक कार्यक्रम अधिकारी, सात अभियंता आणि दोन संगणक कर्मचारी, अशा एकूण अकरा कर्मचाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. फुलंब्री तालुक्यात ३३ गावांमध्ये ९६ कामांसाठी मजुरांचे एकच सामूहिक छायाचित्र, तसंच महिला मजुरांच्या जागेवर पुरुषांचे, तर पुरुषांच्या जागेवर महिलांची छायाचित्रं देऊन पाच कोटी १८ लाख रुपयांची देयकं उचलल्याच्या वृत्तावरुन तत्काळ ही कारवाई करण्यात आली.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 December 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाण...