Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
व्होकल फॉर लोकल हा मंत्र अंगिकारत
फक्त स्वदेशी उत्पादनेच वापरण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज ७९ व्या स्वातंत्र्यदिनी
नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर ते बोलत होते. विक्रेत्यांनी
आपल्या दुकानात स्वदेशी वस्तू विकाव्यात, स्वदेशीचा वापर नाईलजाने नव्हे तर अभिमानाने करण्याचं आवाहनही
पंतप्रधानांनी केलं. ते म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ऑपरेशन
सिंदूरसह विविध मुद्यांचा उल्लेख केला. महात्मा जोतिबा फुले यांच्या दोनशेव्या जयंतीच्या
पार्श्वभूमीवर बोलतांना, मागास घटकांना प्राधान्य
देऊन आपण परिवर्तनाची नवी शिखरं पादाक्रांत करू, असा विश्वास पंतप्रधानांनी
व्यक्त केला. जागतिक पटलावर बदलत्या आर्थिक
समीकरणांच्या पार्श्वभूमीवर बोलतांना, दुसऱ्याची रेषा खोडण्यात
ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा स्वत:ची रेषा मोठी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ते
म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन
आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी दिलेल्या स्वदेशीच्या
मंत्राकडे लक्ष वेधलं. विकसित भारताच्या संकल्पात विकसित महाराष्ट्र समर्थपणे आपलं
योगदान देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
मराठवाड्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या
ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं.
बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सर्वांच्या सहकार्याने बीड जिल्ह्याचा
चेहरामोहरा बदलणार असून, नवा विकसित बीड जिल्हा
घडवण्याचा संकल्प करण्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री
तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते तर जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पंकजा मुंडे
यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण करण्यात आलं. परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे
बोर्डीकर यांच्या हस्ते, धाराशीव इथं पालकमंत्री
प्रताप सरनाईक तर लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी ध्वजारोहण केलं.
****
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील
एका दुर्गम गावात झालेल्या मोठ्या ढगफुटीत आतापर्यंत दोन जवान आणि यात्रेकरूंसह ४५
जणांचा मृत्यू झाला असून १२० हून अधिक लोकांना वाचवण्यात आलं आहे. जखमींपैकी ३८ जणांची
प्रकृती गंभीर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात लातूर तसंच धाराशिव जिल्हा
वगळता, उर्वरित सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट
देण्यात आला आहे.
****
दरम्यान छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात
बहुतांश ठिकाणी काल मध्यरात्रीनंतर पाऊस सुरु झाला. परभणी जिल्ह्यातही वादळी वारे आणि
विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.
****
No comments:
Post a Comment