Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
देशभरात आज महाशिवरात्र भक्तिभावाने साजरी होत आहे. यानिमित्त राज्यातल्या ठीकठिकाणच्या शिव मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. राज्यातल्या भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा आहेत. विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून, मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. सर्व मंदीरात भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनानं विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
****
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महादेवांचा आशीर्वाद सर्वांवर रहावा आणि भारताची प्रगतिपथावर आगेकूच सुरू रहावी, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.तर, हा सण म्हणजे आत्ममंथन आणि आध्यामिक जागृतिचा सण असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सण, विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत करेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
****
प्रयागराज इथं गेले सहा आठवडे सुरू असलेल्या सौहार्दाच्या महाकुंभमेळ्याचा आज समारोप होत आहे. तेरा जानेवारीला सुरू झालेल्या महाकुंभमेळा देशविदेशातून लाखो भाविकांनी पवित्र स्नानाचा अनुभव घेतला. आतापर्यंत ६४ कोटी ६० लाखांहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केलं आहे. जगातला सर्वात मानवतावादी मेळा म्हणून याची ओळख होईल अशा सोहळ्यात काल एका दिवसात एकंदर सव्वा कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं. महाकुंभमेळ्याचा समारोप सुरळीत पार पडावा यासाठी अधिकाऱ्यांनी मेळा परिसर आणि प्रयागराजमध्ये नो व्हेईकल झोन लागू केला आहे, तसंच गर्दी नियंत्रणाचे कडक उपाय आणि वाहतुकीचीही व्यवस्था केली आहे.
दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रयागराजहून साडेतीनशे पेक्षा अधिक रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. महाशिवरात्रीच्या स्नानानंतर अतिरिक्त गाड्या सोडण्याची व्यवस्था केल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं.
****
महान क्रांतिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्य लढ्यामधलं बलिदान, साहस आणि संघर्षपूर्ण योगदान देश कधीही विसरणार नाही, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर यासंदर्भातलं परिपत्रक पोस्ट करत ही माहिती दिली.
****
हत्तीरोग दूरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातल्या पाच जिल्ह्यांत राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधोपचारांचा लाभ घेऊन हत्तीरोगापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करावा, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. नांदेड, पालघर, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ही मोहिम राबवण्यात येत असून, याअंतर्गत डीईसी, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधी गोळ्या देण्यात येत आहेत.
****
राज्यात तूर खरेदीची मुदत आणखी ३० दिवसांनी वाढवण्यात आली आहे. हमीभावाने तूर खरेदीसाठी २४ जानेवारी पासून पुढे ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळवण्यात आलं होतं, आता ही मुदत आणखी ३० दिवस वाढवण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. २४ फेब्रुवारी पर्यंत राज्यात २९ हजार २५४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.
****
नांदेड इथं सुरु असलेल्या २१ व्या संगीत शंकर दरबार महोत्सवात आज शास्रीय गायिका गौरी पाठारे आणि प्रख्यात गायक डॉ. शशांक मक्तेदार यांचं गायन होईल. जागतिक कीर्तीचे सतार वादक आणि पद्मभूषण पंडित बुधादित्य मुखर्जी तसंच सुप्रसिद्ध तबला वादक सोमेन नंदी यांचं सादरीकरणही आज होणार आहे.
****
मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमधे पुढचे दोन-तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या परिसरात तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.
****
No comments:
Post a Comment