Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 28 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत
आहे. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ चा शोध लावल्याच्या
स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या अभूतपूर्व शोधासाठी सर रामन यांना १९३०
मध्ये नोबेल परितोषिकांनं सन्मानित करण्यात आलं होतं. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान
मंत्री डॉ. जितेंद्र सिंह नवी दिल्लीत आज होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळ्याला
उपस्थित राहणार आहेत. जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना नवोन्मेश आणि विज्ञानात
सक्षम करणं ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विज्ञान आणि ज्ञान मिळून प्रत्येक समस्येचं
निराकरण शक्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागरीकांनी विज्ञान आणि नवोन्मेषाला चालना
द्यावी आणि विकसित भारताच्या निर्माणात विज्ञानाचा उपयोग करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली
काल नवी दिल्लीत आयुष क्षेत्राची आढावा बैठक घेण्यात आली. या क्षेत्रानं प्रतिबंधात्मक
आरोग्य सेवेला चालना देण्यात त्याचबरोबर
औषधी वनस्पती लागवडीच्या माध्यमातून ग्रामीण
अर्थव्यवस्थेच्या वाढीत योगदान दिलं आहे, त्यामुळे जगातल्या पारंपरिक औषध पद्धतींमधला अग्रणी म्हणून
भारताचं स्थान आणखी उंचावल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं.
****
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक
वाढवण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक असल्याचं, केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं
आहे. मुंबईत काल वीज वितरण कंपन्यांच्या आर्थिक
सक्षमता आणि संबंधित विषयाबाबत मंत्रीगट समितीच्या दुसऱ्या बैठकीत ते काल बोलत होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक
वाढवणं, विद्युत ऊर्जा बॅटरी संचय प्रणालीसाठी
निर्णय घेणं, स्मार्ट मीटर बसवणं तसंच
केंद्र शासनाच्या नियंत्रणातल्या अन्य विषयांवर प्राधान्यक्रम ठरवून कालबद्ध उपाययोजना
करण्यात येतील, असं नाईक यांनी सांगितलं.
उदयसारखी योजना केंद्र सरकारने पुन्हा आणावी तसंच वित्त पुरवठा व्याजदर कमी असावेत, व्याजमुक्त बाँड्स जारी करण्याची
परवानगी द्यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवेळी दिल्या. महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी
राज्य शासन उपाययोजना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक
वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक
ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश या धोरणात
करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा
उपयोग करणं सोपं होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग
आणि दक्षिण कोरियाच्या एच एस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या
दरम्यान एक हजार ७४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार काल करण्यात आला. कंपनीने ही गुंतवणूक नागपूरच्या
बुटीबोरी इथं ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादन क्षेत्रात केली असून, यामुळे ४०० स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात
आली.
****
वनहक्क कायद्याची कालबद्धपणे अंमलबजावणी
करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक वन हक्कांचे प्रलंबित दावे तातडीनं निकाली काढण्याचे
निर्देश राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत राजभवनात वनहक्क
कायदा, २००६ च्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत बोलत होते. वन हक्क लाभार्थ्यांची
आधारकार्ड जोडणी, प्रधानमंत्री किसान सन्मान
योजनेत नोंदणी आदी कामंही विशेष शिबिर घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश राज्यपालांनी यावेळी
दिले.
****
गडचिरोली जिल्ह्यात दोन जहाल नक्षलवाद्यांनी
काल जिल्हा पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केलं. कांता उर्फ कांतक्का
उर्फ मांडी गालू पल्लो, आणि सुरेश उर्फ वारलू
ईरपा मज्जी अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यावर एकूण १८ लाख रुपयांचं बक्षीस शासनानं
जाहीर केलं होतं.
****
धनगर समाजातल्या नेत्यांनी 'एस.टी.' प्रवर्गात आरक्षण मागण्यापेक्षा सध्या
अस्तित्वात असलेलं ओबीसी आरक्षण अगोदर टिकवण्याचा सल्ला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी
राज्यातल्या धनगर नेत्यांना दिला आहे. ते लातूर इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारने
बांठिया आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
****
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर इथल्या कार्यालयाचं उद्घाटन
काल महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयात महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या
सर्वांगिण विकासासाठी राबवण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ समाजातल्या अल्पसंख्याक
घटकांपर्यंत पोहचवून त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे
यांची निवड झाल्याबद्दल लातूरच्या लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान आणि समस्त धनगर समाजाच्या
वतीने लातूरमध्ये काल त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment