Thursday, 27 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.02.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 February 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ५१ पुस्तकांचं प्रकाशन

·      नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      आयुष मंत्रालयाच्या देश का प्रकृती परीक्षण अभियानाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

·      पुण्यात स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी बस स्थानकात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

आणि

·      मस्साजोग हत्या प्रकरणी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

****

मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होत आहे. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यविश्वात दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून, २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस, “मराठी भाषा गौरव दिनम्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ, आज मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं संध्याकाळी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विजेत्यांना मराठी साहित्यासाठीचे प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘पुस्तक प्रकाशन’ उपक्रमांतर्गत विविध ५१ पुस्तकांचं प्रकाशनही या कार्यक्रमात होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं नांदापूरकर सभागृहात, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही मराठी भाषा विभागातर्फे कवी संमेलन घेण्यात येणार आहे.

****

राज्यातल्या दिव्यांग युवांना प्रशिक्षण देवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसंच दिव्यांगाचं आर्थिक स्वावलंबन होवून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी, युथ फॉर जॉब्स ही संस्था आणि राज्य शासन लवकरच सामंजस्य करार करणार आहेत. ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ तसंच उत्तर महाराष्ट्रात शासनास सहकार्य करणार आहे. आगामी काळात याची व्याप्ती वाढवण्यात येणार असून, यामुळे दिव्यांग युवकांना रोजगार मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

****

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यंदाचा सिंहस्थ कुंभमेळाडिजिटल टेक्नॉलॉजी कुंभम्हणून ओळखला जावा, यासाठीचं नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची काल सांगता झाली. मकरसंक्रांतीपासून सुरू झालेल्या या महाकुंभमेळ्यात सुमारे ६५ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केल्याचं वृत्त आहे.

****

महाकुंभ पर्वात देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसारभारतीनं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी म्हटलं आहे. या पर्वाचे सर्व ४८ दिवस चाललेल्या कुंभवाणी वाहिनीमार्फत आकाशवाणीने कोट्यवधी लोकांशी संपर्क साधला, असं सेहगल यांनी नमूद केलं, ते म्हणाले,

‘‘इस विशेष चैनल ४८ दिनों की एक छोटी सी यात्रा के दौरान बहोत लोगों को छुवा है, आकाशवाणी सभी से जुडा रहा, आम आदमी से लेकर हमारे जो वहां महात्मा गण थे, हमारे जो वहां अखाडे है, हमारे जो वहां संत गण है आकाशवाणी जुडा रहा. भारतिय संसक्रुती को जन जन तक पहोंचाने मे आकाशवाणी की महत्वपूर्ण भुमिका रही है.’’

 

देशाची सार्वजनिक प्रसारण व्यवस्था म्हणून आकाशवाणीने या उत्सवात चोख कामगिरी बजावली असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. कुंभवाणीमार्फत कमीतकमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आकाशवाणीच्या कामगिरीबद्दल महासंचालक प्रज्ञा पालिवाल - गौर यांनीही प्रशंसा केली आहे.

****

महाशिवरात्रीचा सोहळा काल सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला. पुण्याजवळच्या भीमाशंकर, नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर, वेरुळचं घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यात औंढा इथलं नागनाथ आणि बीड जिल्ह्यात परळी इथलं वैजनाथ या पाच ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

‘‘परळी इथल्या वैजनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर सुमारे पाच लाखाहून जास्त भाविकांनी दर्शन घेतल्याचं वृत्त आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातलं केदारनाथ, नांदेड तालुक्यातलं महादेव पिंपळगाव, परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात धारसूर, पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर तर परभणी शहरातील पारदेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा आणि आरती करण्यात आली, देवस्थानच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. देवस्थान आणि भालचंद्र रक्तपेढीनं संयुक्तपणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांना श्री सिद्धेश्वरांचे थेट दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.’’

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथं घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी केली होती.

नांदेड इथं संत पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमात महाशिवरात्री निमित्ताने आठवडाभर धार्मिक, सामाजिक तसंच आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यात आले. काल पालखी सोहळ्यानंतर ५५ जणांनी रक्तदान केल्याची माहिती आश्रमाचे प्रमुख सुधाकर टाक यांनी दिली.

****

आयुष मंत्रालयाच्या देश का प्रकृती परीक्षण अभियानाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल बुलडाणा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या अभियानांतर्गत मंत्रालयानं पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचं जाधव यांनी सांगितलं, ते म्हणाले..

‘‘बरेचसे जे मोठे आजार आहेत, त्याचं मूळ हे छोट्या आजारात असतं. छोट्या आजारातूनच मोठे आजार जन्म घेतात. आणि म्हणून हे छोटे आजारच लोकांना होऊ नयेत, म्हणून हे अभियान आपण राबवलं. आणि खरोखर जो आमचा आत्मविश्वास होता त्याप्रमाणे याच्यामध्ये काही आम्ही नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले.आणि काही जे जुने जगामधले रेकॉर्ड होते, ते रेकॉर्डसुद्धा आपण तोडलेत. आणि पाच रेकॉर्ड आपण प्रस्थापित केलेत. आणि ते रेकॉर्ड देण्यासाठी रिचर्डस्‌ विल्यम टेडी हे गिनीज बुकचे परीक्षक जे होते, पोर्तुगालहून आपल्या मुंबईला आले, त्यांनी त्याची घोषणा केली. आणि ते पाच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तोडल्याचे प्रमाणपत्र एका कार्यक्रमामध्ये मुंबईमध्य आम्हाला त्यांनी दिले.’’

****

पुण्यात स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनेच्या वेळी स्वारगेट स्थानकात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना काल पहाटे घडल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातल्या आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आपण पुणे पोलीस आयुक्तांना व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका करत, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं म्हटलं आहे. इतरही अनेक घटनांवरून त्यांनी सरकारवर टीका केली.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या मौजे ढोकी परिसरात अचानक कावळे मरून पडण्याच्या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा सावध झाली असून, जिल्हास्तरीय शीघ्र प्रतिसाद दलानं या भागाची पाहणी केली. प्रशासनानं ढोकीच्या आजूबाजूच्या दहा किलोमीटर त्रिज्येतला भाग सतर्क, तर तीन किलोमीटर त्रिज्येतला भाग संक्रमित भाग म्हणून घोषित केला असून, नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचं आवाहन, धाराशिवचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ एस एल हरिदास यांनी केलं आहे.

‘‘संक्रमित भागात दररोज सर्वेक्षण करण्यात येणार असून आरोग्य विभागानं आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून दिला आहे, तसंच संक्रमित भाग निर्जंतुक करण्यात येत आहे. नागरिकांनी बाजारात किंवा खुल्या ठिकाणी पक्ष्यांच्या संपर्कात येणं टाळावं, कोंबड्या किंवा अन्य पक्ष्यांच्या मृत्यूची माहिती त्वरित प्रशासनाला कळवावी, पक्ष्यांचं मांस तसंच अंडी पूर्णपणे शिजवून खावीत, बर्ड फ्लूबाबत कोणतीही शंका असल्यास किंवा प्राथमिक लक्षणं आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा डॉक्टरांशी तत्काळ संपर्क साधावा.’’

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

दरम्यान, उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी मान्य झाल्यामुळे देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांनी दोन दिवसांपासूनचं अन्नत्याग आंदोलन काल स्थगित केलं. खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबीयांना पाणी पाजून हे आंदोलन सोडलं. उर्वरित ज्या मागण्या आहेत त्या देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराचा, पुरातत्व खात्याने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला आहे. मंदिराचं शिखर ज्या तुळईवर उभं आहे त्याच्या चार पैकी दोन दगडी शिळांना तडे गेल्याचं या अहवालातून निष्पन्न झालं आहे. त्यामुळे प्राचीन काळी ज्या प्रकारचं शिखर होतं, तसं मूळ शिखर साकारून त्याला सोन्याने मढवण्यात येणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

****

No comments: