Friday, 28 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.02.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 February 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत आहे. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ चा शोध लावल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या अभूतपूर्व शोधासाठी सर रामन यांना १९३० मध्ये नोबेल परितोषिकांनं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशभरात विविध वैज्ञानिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. विज्ञानाचं महत्त्व आणि त्याचा वापर लोकांपर्यंत पोहोचवणं हा या दिवसाचा उद्देश आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह नवी दिल्लीत आज होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना नवोन्मेश आणि विज्ञानात सक्षम करणं ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विज्ञान आणि ज्ञान मिळून प्रत्येक समस्येचं निराकरण शक्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागरीकांनी विज्ञान आणि नवोन्मेषाला चालना द्यावी आणि विकसित भारताच्या निर्माणात विज्ञानाचा उपयोग करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

****

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज युरोपियन व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयोगाचे आयुक्त मारोस सेफकोविक यांच्याशी चर्चा केली. उभय नेत्यात झालेल्या या चर्चेदरम्यान भारत-युरोपीय युनियनमधे मुक्त व्यापार करार, व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेवरच्या प्रगतीवर चर्चा झाली, अशी माहीती गोयल यांनी सामाजिक माध्यमावरुन दिली आहे. येणाऱ्या काळात युरोपियन युनियन आणि भारत विश्वासार्ह भागीदार म्हणून व्यापार आणि गुंतवणूक संबंध वाढवण्यासाठी काम करतील, अशी आशा गोयल यांनी व्यक्त केली.

****

पुणे लैंगिक अत्याचार प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जाईल, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. रात्री उशिरा आरोपीला अटक केल्यानंतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे, असं अमितेश कुमार म्हणाले. शिरुर तालुक्यातील गुणाट गावात आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यास मदत करणाऱ्या गावकऱ्यांचं आयुक्तांनी कौतुक केलं. पुणे शहरात पथदिव्यांची संख्या वाढवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत असल्याचं अध्यक्ष रुपाली पाटील चाकणकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्य महिला आयोगाची आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन, पोलीस, शहर वाहतूक संचालक आणि आगार प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

****

वेव्ह्ज परिषदेच्या निमित्तानं केंद्र सरकारनं खादीच्या वापरासंदर्भात एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. खादीला जागतिक पातळीवर फॅशनमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा आहे. डिजिटल, प्रिंट, व्हिड़ीओ आणि इतर प्रायोगिक माध्यमांमध्ये खादीचा प्रयोग करण्याचं आव्हान यात असून, या स्पर्धेसाठी १५ मार्च पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

****

नांदेड इथं आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी ग्रंथदिंडीने या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. पुस्तकांची अनेक दालनं उभारण्यात आले असून, विविध कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे.

****

वाडा संस्कृतीची खऱ्या अर्थाने ओळख करून देणारं पहिलं गावगाडा साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातल्या तादलापूर इथं परवा रविवारी होणार आहे. गांधीवादी साहित्यिक मॅक्सवेल लोपीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन, प्राध्यापक डॉक्टर साहेब खंदारे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक राजेसाहेब कदम यांनी दिली आहे.

****

लातूर कलामंच आणि विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परवा रविवारी प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. अमोल पालेकर यांचे 'ऐवज - एक स्मृतिबंध' हे आत्मकथनपर पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या निमित्ताने अमोल पालेकर यांची मुलाखत होणार आहे.

****

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने परवा रविवार छत्रपती संभाजीनगर शहरात महास्वछता अभियान राबवण्यात येणार आहे. सकाळी साडे नऊ ते साडे आकरा या वेळेत शहरातील बस स्थानकं, रेल्वे स्थानक, शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं आहे.

****

शेअर बाजारतली घसरण सुरुच आहे. आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात एक हजार अंकांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स सुरुवातीला ५०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. मात्र, १००० अंकांनी घसरला आहे. याबरोबरच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी घसरण नोंदवली. बाजार सुरु होताच सेन्सेक्स एक हजार ०९ अंकांनी घसरून ७३ हजार ६०२ वर होता आणि निफ्टी ३१६ अंकांनी घसरून २२ हजार २२८ अंकांवर होता.

****

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होईल. अफगाणिस्तानं इंग्लंडचा पराभव केल्यामुळं ब गटात उपांत्यफेरीसाठी चूरस निर्माण झाली आहे.

****

No comments: