Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
प्रयागराज इथला महाकुंभ म्हणजे एकतेचा महान यज्ञ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. महाकुंभमेळ्याच्या यशस्वी समारोपाबद्दल सामाजिक माध्यमांवरील संदेशात त्यांनी समाधान व्यक्त केलं. महाकुंभात भाविकांची प्रचंड गर्दी हा केवळ एक विक्रम नाही तर भारतीय संस्कृती आणि वारशाची अनेक शतके भरभराट होत राहण्यासाठी एक मजबूत पाया रचला असल्याचं त्यांनी नमूद केलं. १४० कोटी नागरिकांची श्रद्धा या उत्सवावर केंद्रीत राहिली, समाजाच्या प्रत्येक वर्गातले आणि क्षेत्रातले लोक एकत्र आल्याचा आनंद पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
दरम्यान, महाकुंभमेळ्यासाठी १६ हजाराहून अधिक रेल्वे चालवण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज प्रयागराज रेल्वे स्थानकावर वार्ताहरांशी बोलत होते. प्रयागराजहून जवळपास साडे चार कोटी भाविकांनी रेल्वेनं प्रवास केल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या अडीच वर्षापासून रेल्वे विभाग याचं नियोजन करत होता, आणि या सोहळ्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं त्यांनी सांगितलं. या आयोजनातून रेल्वे विभागाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, आम्ही त्याचं परिक्षण करुन रेल्वेच्या कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
‘‘रेल्वे का जो कोऑर्डनेशन रहा उसका भी बहोत लाभ मिला, इस सब से जो सीखने को मिला है, टीम पूरा उसका एक अनैलिसिस भी करेगी, और किस तरह से रेल्वे के जो ऑपरेशंस मॅन्युअलस हैं, उनके अंदर एक पर्मनन्ट चेंज लाने के लिये भी व्यवस्था करेंगे, इस महाकुंभ से जो लर्निंग आयी है, उस लर्निंग को हम देश के हर जगह क्राउड जहां पर भी अचानक पसेंजर का जाता है, उसको हम संभाल सकें, उसको ढंग से मनेज कर सकें.’’
****
कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती आज “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरी करण्यात येत आहे. यानिमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन केलं असून, राज्यातल्या जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नाशिकच्या शिरवाडे वणी इथं "कवितेचे गाव" या उपक्रमाचं उद्घाटन आज मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं. याठिकाणी कुसुमाग्रजांचं साहित्य, कविता आणि अन्य थोर साहित्यिकांचं लेखन संग्रहित केलं जाणार आहे.
मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ, आज मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं संध्याकाळी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विजेत्यांना मराठी साहित्यासाठीचे प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘पुस्तक प्रकाशन’ उपक्रमांतर्गत विविध ५१ पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी होणार आहे.
****
केंद्रीय पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इथेनॉल मिश्रणाचं ध्येय २० टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे. गुवाहाटी इथं ॲडव्हांटेज आसाम द्वितीय गुंतवणूक शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात १९ पूर्णांक सहा टक्के इथेनॉल मिश्रणाचा दर आधीच गाठला आहे. विकासात्मक आव्हानं असली तरी, भारतातल्या सर्व जीवाश्म इंधन उत्पादन कंपन्या २०४५ पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करतील, अशी अपेक्षा पुरी यांनी व्यक्त केली.
****
केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना आता एकाच नावाने आणि एकाच संलग्नता नोंदणी क्रमांकावर वेगळ्या शाखा सुरु करता येतील. याकरता नियमांत आवश्यक बदल केले असल्याची माहिती मंडळाचे सचिव हिमांशु गुप्ता यांनी काल दिली. दोन्ही शाळांची साधनसामुग्री आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे वेगळ्या ठेवाव्या लागतील, मुख्य शाळेचं एकच संकेतस्थळ असेल आणि त्यावर शाखांसाठी जागा ठेवलेली असेल, तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वेगवेगळे असले तरी त्यांचं वेतन मुख्य शाळेच्या खात्यातूनच दिलं जाईल, असं गुप्ता यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र गुजरातच्या सीमावर्ती भाग असलेल्या नंदुरबार नजिक गुजरात राज्यातल्या डेडीयापाडा मधल्या देवमोगरा गावात, आदिवासी समाजाची आराध्य दैवत असलेल्या यहामोगी मातेच्या यात्रेला सुरवात झाली. महाशिवरात्रीपासून ही यात्रा भरत असते. याठिकाणी आदिवासी बांधवांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्याचे माजी आदिवासी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी सहकुटुंब देवमोगरा मातेचं दर्शन घेतलं.
****
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणामुळे मध्य रेल्वे वर लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दोन मार्च पर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. एक मार्च रोजी नांदेड - मुंबई आणि दोन मार्चला मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. बल्लारशा - मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस आज, उद्या आणि एक मार्च रोजी, तर लिंगमपल्ली - मुंबई देवगिरी एक्स्प्रेस एक मार्च रोजी दादर पर्यंत धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment