Friday, 28 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.02.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 February 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्य सरकारच्या ५०० सेवा व्हाटसअपच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार

·      आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांना मिळणार ५० टक्के सवलत

·      स्वारगेट बस स्थानकातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

·      राष्ट्रीय विज्ञान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

आणि

·      रणजी करंडक स्पर्धेत विदर्भाची केरळवर आघाडी, तर-चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलियादरम्यान लढत

****

राज्य सरकारच्या पाचशे सेवा व्हाटसअपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही माहिती दिली. व्हाटसअप सेवांसाठी मेटा कंपनीसोबत करार करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई टेक वीक २०२५ मध्ये गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी या विषयावर मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले. ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर व्हाटस अपचा वापर करतात. त्यामुळे सरकारी सेवा उपलब्ध करुन देत सेवांचे एका अर्थाने लोकशाहीकरण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

व्हॉटस्‌ॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉटस्‌अपच्या माध्यमातनं आपल्याला मिळू शकतील. मागच्या काळामध्ये मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉटस्‌ॲपवर आणलं, आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकं व्हॉटस्‌ॲप वर तिकीट खरेदी करतायत. आणि म्हणूनच व्हॉटस्‌ॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. पाचशे सर्विसेस यापुढे लोकांना व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातनं अव्हेल करता येतील.

 

एनपीसीआय या जगातील सर्वात मोठ्या युपीआय पेमेंट गेटवे कंपनीचं जागतिक मुख्यालय मुंबईत सुरु केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक जमीन कंपनीला हस्तांतरीत केले जाणार असून, यासंबंधीची कागदपत्रं आज कंपनीला सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

एन पी सी आय ज्यांनी यु पी आय तयार केलेलं आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजीकल गेट वे, हा जो भारतामध्ये तयार झाला, ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा एन पी सी आय चं ग्लोबल हेड क्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्रं हँडओव्‍हर केलेले आहेत. मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउंसमेंट आहे की एन पी सी आयचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे.

****

आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीकडून विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज ही माहिती दिली. एमटीडीसीनं महिलांसाठी समर्पित आईहे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणलं आहे.

****

पुणे लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला रात्री उशीरा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालवला जाईल, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. शिरुर तालुक्यातील गुणाट गावात आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यास मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे आयुक्तांनी आभार मानले.

यामध्ये स्पेशल काऊंसिलरची नियुक्ती होणार आहे. आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होईल यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. ड्रोनच्या सहाय्याने दिशा जी दिसून आली, त्याच्या अनुषंगाने त्याला अटक करण्यात आली. फायनल ज्यांचे ट्रीगर इन्फॉर्मेशन होती, त्यांना एक लाखाचे बक्षीस देणार आहे.

दरम्यान, याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत असल्याचं अध्यक्ष रुपाली पाटील चाकणकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्य महिला आयोगाची आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन, पोलीस, शहर वाहतूक संचालक आणि आगार प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

****

राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा करण्यात आला. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ चा शोध लावल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विज्ञान आणि ज्ञान मिळून प्रत्येक समस्येचं निराकरण शक्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुंबई इथं आज TIFR, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात यानिमित्त विविध प्रयोग, प्रदर्शनं, प्रयोगांची प्रात्यक्षिकं, खेळ, कोडी, प्रश्नमंजूषा, अशा विविध सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर इथं अनंत भालेराव विद्यामंदिरात माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची प्रात्यक्षिकं केली होती.

****

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात करवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायद्यात बदल करणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली आहे. ते आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. काही जण केवळ प्रसिद्धीसाठी महापुरुषांवर वक्तव्य करत असल्याचं, भोसले म्हणाले.

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान, ते के. पी. बी. हिंदुजा महाविद्यालयाच्या वार्षिक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

****

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना धरणातील गाळ घेवून जाण्यासाठी अवनी अॅपच्या माध्यमातून प्रतीहेक्टरी १७ हजार रुपये अनुदान मिळणार आहे, त्यामुळे गाळमुक्त धरण योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असं आवाहन आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं आहे. गेवराई इथं गाळमुक्त धरण योजनेच्या माहीतीसाठी आज चर्चा सत्र घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. गाळमुक्त धरण योजना अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंतिम मान्यतेसाठी तातडीने पाठवण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केल्या.

****

धाराशिव शहरालगत असलेलं हातलाई मंदिर परिसर, तलाव आणि धाराशिव लेणी यांचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची आज धाराशिव इथं बैठक झाली. हातलाई परिसरातल्या तलावात लेझर शो तसच रंगीत कारंजे, नागरिकांसाठी वाकिंग ट्रॅक, बालकांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसासाठी आरोग्य विषयक सुविधांसह पर्यटन दृष्ट्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयी सुविधा देण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी पर्यटन जनजागृती संस्था तसच धाराशिव शहरातील पर्यटन प्रेमींची उपस्थिती होती.

****

अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केल्या. आज परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी गांधी यांच्या हस्ते आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं.

****

बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात ‘बालरोग तज्ञ परिचारिका’ अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज ही माहिती दिली. सध्या राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत २० विध्यार्थी क्षमता असलेला ‘पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग’ हा अभ्यासक्रम केवळ मुंबई इथं जे.जे.रुग्णालय परिचर्या प्रक्षिशण केंद्रात उपलब्ध होता.

****

वारकरी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, अशी अपेक्षा पंडित यादवराज फड यांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात श्रीक्षेत्र चाकरवाडी इथं १७ वं अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन घेण्यात आलं, यावेळी ते बोलत होते. दोन दिवसीय संमेलनात राज्यातील संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली.

****

नागपूर इथं सुरु असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा केरळच्या पहिल्या डावात सर्वबाद ३४२ धावा झाल्या. विदर्भानं पहिल्या डावात ३७९ धावा केल्या आहेत, त्यामुळे विदर्भाला ३७ धावांची आघाडी मिळाली आहे.

****

चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजचा सामना होत आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या अफगाणिस्तान संघानं निर्धारीत ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा केल्या आहेत. अफगाणिस्ताननं इंग्लंडचा पराभव केल्यानंतर ब गटात उपांत्यफेरीसाठी चूरस निर्माण झाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ, स्वातंत्र्यसैनिक जयकृष्ण काशिनाथ भालेराव यांचं २६ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. नांदुर-मधमेश्वर प्रकल्पाच्या उभारणीसाठी त्यांनी पाटपाणी संघर्ष कृती समिती स्थापन करून मोठं जनआंदोलन उभारलं होतं. विनोबा भावेंची भूदान चळवळ आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वैजापूर नगर परिषदेचं उपाध्यक्षपद आणि वकील संघाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. दैनिक मराठवाडाचे संपादक, स्वातंत्र्यसेनानी दिवगंत अनंत भालेराव यांचे ते धाकटे बंधू होत.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या मोरेवाडी इथं मृद आणि जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या साठवण तलावाचं आज आमदार सुरेश धस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. मोरेवाडी ग्रामस्थांचा अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागला असून, या तलावामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहीती यावेळी आमदार धस यांनी दिली.

****

महिला बचत गटांसाठी स्वतंत्र बँक असावी, अशी अपेक्षा जालना तालुक्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली. जालना शहरातल्या कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात महिला बचत गटांसाठीच्या जानकी महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी आज ते बोलत होते.

****

No comments: