Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 26 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
देशभरात आज महाशिवरात्र भक्तिभावाने साजरी होत आहे. यानिमित्त राज्यातल्या ठीकठिकाणच्या शिव मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि त्र्यंबकेश्वर या राज्यातल्या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा आहेत. विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून, मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. सर्व मंदीरात भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनानं विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
****
प्रयागराज इथं गेले सहा आठवडे सुरू असलेल्या सौहार्दाच्या महाकुंभमेळ्याचा आज समारोप होत आहे. तेरा जानेवारीला सुरू झालेल्या महाकुंभमेळ्या देशविदेशातून लाखो भाविकांनी पवित्र स्नानाचा अनुभव घेतला. आतापर्यंत ६४ कोटी ६० लाखांहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केलं आहे. जगातला सर्वात मानवतावादी मेळा म्हणून याची ओळख होईल अशा सोहळ्यात काल एका दिवसात एकंदर सव्वा कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं. महाकुंभमेळ्याचा समारोप सुरळीत पार पडावा यासाठी अधिकाऱ्यांनी मेळा परिसर आणि प्रयागराजमध्ये नो व्हेईकल झोन लागू केला आहे, तसंच गर्दी नियंत्रणाचे कडक उपाय आणि वाहातुकीचीही व्यवस्था केली आहे.
दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रयागराजहून साडेतीनशे पेक्षा अधिक रेल्वेगाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. महाशिवरात्रीच्या स्नानानंतर अतिरिक्त गाड्या सोडण्याची व्यवस्था केल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार संपूर्ण रेल्वे ऑपरेशनवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, एडवोकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर यासंदर्भातलं परिपत्रक पोस्ट करत ही माहिती दिली.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये १६ लाखांहून अधिक सदस्यांची नोंदणी झाली. नोव्हेंबर २०२४मध्ये नोंदणी झालेल्या सदस्यांच्या तुलनेत नऊ पूर्णांक ६९ टक्के आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या माहितीनुसार १८ ते २५ वयोगटातील चार लाख ८५ हजार नवीन सदस्यांनी यामध्ये नोंदणी केली आहे.
****
छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात काल नऊ नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यापैकी चार जणांवर २३ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. आत्मसमर्पण केल्यानंतर, छत्तीसगड राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत या प्रत्येक नक्षलवाद्याला प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपये देण्यात आले.
****
राज्यातल्या ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची तातडीनं पदस्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. काल याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. या अधिकाऱ्यांपैकी २९ अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून पदस्थापना दिली आहे. जात पडताळणी समिती अध्यक्षांची ही २९ पदं काही वर्षापासून रिक्त होती.
****
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-जाफ्राबाद मतदार संघाचे आमदार संतोष दानवे यांची पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी, तर बदनापूर -अंबड मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
****
राज्यसभा सचिवालयाची संशोधन इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातल्या निघोज इथल्या गणेश ढवण यांना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. देशभरातून ३५ युवकांची या इंटर्नशिपसाठी निवड झाली होती, त्यामध्ये गणेश ढवण हे महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करत आहेत. संसदीय कार्यपद्धती आणि धोरणात्मक बाबींच्या सखोल अध्ययनासाठी हा उपक्रम राबवला जातो.
****
पुणे सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर शाखेनं अमेरिकन चलनाचा समावेश असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रकमेचं मूल्य जवळपास साडेतीन कोटी रुपये असून या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. १७ फेब्रुवारी रोजी दुबईहून पुण्याला आलेल्या एका व्यक्तीने तीन प्रवाशांच्या मदतीने परकीय चलन लपवून आणल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर पुण्यातल्या दहा ठिकाणी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
****
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज विदर्भ आणि केरळ यांच्यात होत आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिममधे हा सामना सुरु आहे. या स्पर्धेत विदर्भानं सात पैकी सहा सामने जिंकून ४० गुणांची कमाई केली. तर केरळनं सात पैकी तीन सामने जिंकून २८ गुण मिळवले आहेत.
****
No comments:
Post a Comment