Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 February 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम-किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी करणार, राज्यातल्या ९२ लाख ८९ हजार शेतकरी कुटुंबांना लाभ
• कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत वेगानं आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचं, पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन
• ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप, विविध १२ ठराव पारित
आणि
• आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय, विराट कोहलीचा एकदिवसीय सामन्यांमध्ये जलद १४ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधल्या भागलपूरमध्ये पीएम-किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी करणार आहेत. देशभरातल्या साडे नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २२ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण यावेळी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोहात नागपूर इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार असून, राज्यातल्या ९२ लाख ८९ हजार शेतकरी कुटुंबांना एक हजार ९६७ कोटीहून अधिक रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातल्या प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र तसंच जिल्हा, तालुका आणि ग्राम पंचायत स्तरावर हा समारोह आयोजित करण्यात आला आहे.
****
दरम्यान, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात काल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, कृत्रिम बुद्धिमत्ता - एआयच्या क्षेत्रात भारत वेगानं आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचं नमूद केलं. अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं ते म्हणाले,
मुझे यह देखकर भी बहुत खुशी होती है कि आज space sector हमारे युवाओं के लिए बहुत favourite बन गया है। कुछ साल पहले तक किसने सोचा होगा कि इस क्षेत्र में Start-Up और private sector की space कंपनियों की संख्या सैकड़ों में हो जाएगी! हमारे जो युवा, जीवन में कुछ thrilling और exciting करना चाहते हैं, उनके लिए space sector, एक बेहतरीन option बन रहा है।
एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल, असं पंतप्रधान म्हणाले. ही समस्या वाढत असल्याची आकडेवारी गंभीर असून, आपण एकत्रितपणे छोट्या -छोट्या प्रयत्नांतून याचा सामना करायला हवा असं ते म्हणाले.
आगामी राष्ट्रीय विज्ञान दिन, महिला दिनाचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. देशातली वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आणि आपल्या स्थानिक संस्कृतीमधलं त्याचं स्थान याबद्दलची माहितीही त्यांनी दिली. या जैवविविधतेच्या जतन संवर्धन आणि संरक्षणासाठी देशभरातला आदिवासी समाज करत असलेल्या प्रयत्नांचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं.
****
नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. नवी दिल्लीत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप काल पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासन अतिशय चांगल्या भावनेने सांस्कृतिक उपक्रमांसाठी मदत करत असतं, ही बाब लक्षात ठेऊन साहित्यिकांनी स्वाभिमानाने साहित्यनिर्मिती करावी, असं आवाहन त्यांनी केलं. मराठी भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही, तर बहुजात आणि बहुज्ञात व्हायला हवी, मराठी भाषेला अपेक्षित वैभव मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असं अजित पवार यावेळी म्हणाले,
मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. मराठीची उपयुक्तता वाढली पाहिजे.
आपली भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही. तर ती बहुजात आणि बहुज्ञातही व्हायला पाहिजे. त्यासाठी आधुनिक विषय, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान विद्या मराठीत शिकवणं आवश्यक आहे. मराठी भाषेला अपेक्षीत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी जे काही करावं लागेलं हे महाराष्ट्राचं राज्यशासन निश्चितपणे करेल.
महाराष्ट्रभूमीसाठी सदैव झटत राहू, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तालकटोरा स्टेडिअमला असलेल्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करून, मराठी सारस्वतांनी आज आपल्या विचारांनी दिल्ली जिंकली असल्याचं, शिंदे म्हणाले.
मराठी भाषा वाढायची असेल तर आपल्या घराघरातली मुलं मराठी शिकायला हवीत, असं संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यावेळी म्हणाल्या. प्राथमिक शिक्षणात मराठी भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे तर मराठी भाषेला उर्जितावस्था येईल, असं सांगताना मराठी भाषा टिकण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न त्यांनी मांडले.
दरम्यान, संमेलनाच्या समारोप सत्रात १२ ठराव मांडण्यात आले. राज्य शासनाने बोली भाषा विकास अकादमी विकसित करावी, विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये बोली भाषांचा समावेश करावा, २३ फेब्रुवारी ही संत गाडगेबाबा यांची जयंती बोली भाषा दिन म्हणून साजरी केली जावी आदी ठरावांचा यात समावेश आहे.
दरम्यान, देशाच्या राजधानीत एक चांगलं संमेलन पार पाडल्याबद्दल अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या...
दिल्लीमध्ये संमेलन ही मराठीसाठी नक्कीच फार मोठी गोष्ट आहे. आणि ही आमंत्रित संस्था आहे ‘सरहद’. त्यांनी पूर्वी घुमान संमेलन घेतलेलं होतं. त्यामुळे त्यांना थोडा अनुभव होता. परंतू दिल्ली म्हणजे आणखी वेगळी गोष्ट आहे, इथे पुष्कळ जास्त राजकीय हालचाल आहे. त्यामुळे हे कसं काय त्यांना जमेल असं वाटत होतं. परंतू त्यांनी फार मनापासून आणि यशस्वीपणे हे आयोजन केलं आहे. विषय आम्ही थोडे बदलेले होते नेहमीपेक्षा. तेही लोकांना अतिशय आवडले आहेत. आम्हाला एक चांगल संमेलन देशाच्या राजधानीमध्ये पार पाडण्याचं समाधान मिळतं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचाही काल समारोप झाला. यावेळी विविध २७ ठराव पारित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिलं जाणारं शासकीय अनुदान तात्काळ बंद करण्यात यावं आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तसंच तासिका तत्त्वावरील सर्व मराठी शाळा आणि महाविद्यालयातल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सदर अनुदान वर्ग करावं, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहितांना धर्मांध शक्तींपासून संरक्षण मिळावं, समन्यायी पाणी वाटप धोरणाची त्वरित अंमलबजावणी करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असा भेद टाळावा, आदी ठरावांचा यात समावेश आहे.
****
विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक काल मुंबईत विधानभवनात झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्च पासून सुरु होणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ वर्ल्ड हेरिटेज समितीसमोर पॅरिस इथं तांत्रिक सादरीकरण करणार आहे. राज्य शासनानं ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत हा प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
****
आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. दुबईत झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारताला २४२ धावांचं आव्हान दिलं. कुलदीप यादवने तीन, हार्दिक पंड्याने दोन, तर हर्षित राणा, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या भारतीय संघाने विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर ४३व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. कोहली प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान, विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये जलद १४ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. तर १५८ झेल घेऊन त्याने भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही केला आहे.
****
नांदेडमध्ये महसूल क्रिडा स्पर्धांचा काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या स्पर्धेत कोकण विभागाने विजेतेपद पटकावलं. छत्रपती संभाजीनगर विभागानं दुसरा, तर पुणे विभागानं तिसरा क्रमांक पटकावला. दरवर्षी ही स्पर्धा घेण्याची आणि त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा बावनकुळे यांनी यावेळी केली.
****
केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी वर्गाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचं, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे. सामान्य जनतेला केंद्रीय अर्थसंकल्प समजण्याच्या दृष्टीकोनातून भाजपनं काल बुलडाणा इथं आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, किसान क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली असल्याचही कराड यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राज्यस्तरीय उत्कर्ष युवा महोत्सवसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत असलेल्या या महोत्सवासाठी मराठवाडा विद्यापीठाचा २० जणांचा संघ काल रवाना झाला.
****
No comments:
Post a Comment