Tuesday, 25 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.02.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 25 February 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

जागतिक अनिश्चिततेच्या काळात जगभरातील तज्ज्ञांना केवळ भारताच्या जलद विकासाची निश्चिती वाटत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते आ गुवाहाटी इथं गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांविषयी आयोजित अ‍ॅडव्हांटेज आसाम शिखर परिषदेचं उद्घाटन झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. भारतानं उद्योग सुलभतेसाठी निरंतर प्रयत्न केले आहेत. उद्योग आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी इकोसिस्टीम तयार केली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या दशकात भारतानं पर्यावरणाप्रतीची जबाबदारी लक्षात घेत धोरणात्मक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. दोन दिवसीय शिखर परिषदेत सात मंत्रीस्तरीय आणि १४ विषयाधारीत सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून पाच दिवस बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रपती बिहारमधील पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभाला उपस्थित राहतील. राष्ट्रपती थोड्याच वेळात या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. उद्या मध्य प्रदेशातील छत्तरपूर मधल्या गाढा इथं बागेश्वर जनसेवा समितीच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर त्या गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं आदरांजली अर्पण करून, केवडिया इथं होणाऱ्या नर्मदा आरतीमध्ये सहभागी होतील. केवडिया इथं एकता कौशल्य विकास केंद्राला राष्ट्रपती मुर्मू भेट देणार आहेत. त्यानंतर अहमदाबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या तसंच गांधीनगर मधल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. यानंतर स्मृतीवन भूकंप स्मारक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या धोलावीराला त्या भेट देणार आहेत.

****

दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज आम आदमी पक्षाच्या पंधरा आमदारांना बेशिस्त वर्तनामुळे निलंबित करण्यात आलं. निलंबित आमदारांमध्ये विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि गोपाल राय यांचा समावेश आहे. नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आज सकाळी सभागृहाला संबोधित करत असताना, मुख्यमंत्र्यांच्या दालनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रं काढून टाकल्याच्या आरोपावरून विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सभापतींनी केलेल्या आवाहनानंतरही गोंधळ सुरु राहिल्याने पंधरा आमदारांना निलंबित करण्यात आलं. दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीतील मद्यपुरवठ्यासंबंधीचा कॅगचा अहवाल सदनाच्या पटलावर ठेवला.

****

हवामान विभागानं मुंबईसह ठाणे आणि शेजारच्या जिल्ह्यांसाठी दोन दिवसांच्या उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील तापमान सदतीस ते अडतीस डिग्री अंश सेल्सिअस एवढं राहिल असं हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितलं आहे. दोन दिवसानंतर म्हणजेच २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनी घट होणार असल्याचं त्या म्हणाल्या.

****

बीड इथले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून दोन दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

****

केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून इनोव्हेट नावाचा डेटा-व्हिज्युअलायझेशन हॅकेथॉन घेण्यात येणार आहे. विकसित भारतासाठी माहिती प्रेरीत अंतर्दृष्टी ही या हॅकेथॉनची संकल्पना असेल. राष्‍ट्रीय सांख्यिकी कार्यालय-एनएसओ द्वारा निर्मित व्‍यापक अधिकृत आकडेवारीचा उपयोग करून नाविन्यपूर्ण डेटा आधारित अंतर्दृष्टी तयार करण्यासाठी विद्यार्थी आणि संशोधकांना प्रेरणा देणं हे हॅकेथॉनचं उद्दिष्ट आहे. आजपासून ३१ मार्चपर्यंत MyGov प्लॅटफॉर्मवर हे हॅकेथॉन होणार आहे. पदवी, पदव्युत्तर किंवा संशोधन करत असलेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.

****

प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याचा उद्या महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप होत आहे. हा सोहळा नेत्रदीपक आणि अविस्मरणीय करण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. प्रयागराज मध्ये नियमित स्वच्छता केली जात असून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात असल्याचं जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मांदर यांनी सांगितलं. दरम्यान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६३ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. काल देशभरातून जवळपास १ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केलं.

****

No comments: