Monday, 24 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.02.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 February 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.

****

भारत येणाऱ्या काही वर्षात जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहील, असा विश्वास जागतिक बँकेनं व्यक्त केल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं आज जागतिक गुंतवणुकदार शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. संपूर्ण जगाचा भारताच्या विकासावर विश्वास असून, अनेक अपेक्षा देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलावरील संघटनेने भारताला सौर ऊर्जेमध्ये महासत्ता म्हणून मान्यता दिली असल्याचं नमूद करुन, देशाची ही वाटलाल कौतुकास्पद असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी आज बिहारमधल्या भागलपूरमध्ये पीएम-किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी करणार आहेत. देशभरातल्या साडे नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २२ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण यावेळी करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोहात नागपूर इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. राज्यातल्या ९२ लाख ८९ हजार शेतकरी कुटुंबांना एक हजार ९६७ कोटीहून अधिक रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातल्या प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र तसंच जिल्हा, तालुका आणि ग्राम पंचायत स्तरावर हा समारोह आयोजित करण्यात आला आहे.

****

पीएम-किसान योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशभरातल्या शेतकरी बंधू आणि भगिनींचं अभिनंदन केलं आहे. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या संदेशात त्यांनी, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास साडे तीन लाख कोटी रुपये पोहोचले असून, ही आपल्यासाठी खूप समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. गेल्या १० वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात कृषी क्षेत्राचा झपाट्यानं विकास झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आपल्या लाखो लहान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे बाजारपेठेतली त्यांची उपलब्धता वाढली असून, शेतीचा खर्चही कमी झाला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. 

****

आयकर विधेयक २०२५ चा आढावा घेण्यासाठी लोकसभेच्या निवड समितीची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे. ३१ सदस्यीय समितीचं अध्यक्षपद भाजप खासदार बैजयंत पांडा भूषवत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करेल.

****

प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्याचा आज ४३ वा दिवस असून, परवा २६ तारखेला, महाशिवरात्रीला या भव्य कुंभमेळ्याची सांगता होणार आहे. महाकुंभमेळ्यात आज आणि उद्या तीन जागतिक रेकॉर्ड केले जाणार आहेत. आज १५ हजार स्वच्छता कर्मचारी गंगाघाटावर सुमारे १० किलोमीटरच्या अंतरावर स्वच्छता मोहिम राबवणार आहेत. तर उद्या १० हजार हातकाम तसंच ५५० शटल बसच्या संचालनाचा इतिहास रचला जाईल. महाकुंभमेळ्याच्या परेड मैदानावर त्रिवेणी मार्गावर १ हजार ई रिक्षाच्या संचालनाऐवजी ५५० शटल बसचं संचालन केलं जाईल. महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास ६३ कोटी अधिक भाविकांनी संगम स्थळी पवित्र स्नान केलं आहे.

****

दिल्ली विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं. नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी भाजप आमदार अरविंदर सिंग लवली यांना हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. त्यानंतर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यास सुरुवात झाली. हे अधिवेशन २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

****

महाशिवरात्र परवा बुधवारी साजरी होत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदिरात उद्यापासून तीन मार्च पर्यंत यात्रा भरणार आहे. या कालावधीत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता धुळे - सोलापूर महामार्ग आणि खुलताबाद ते फुलंब्री मार्गावर जड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जारी केले आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यानाथाच्या मंदीरात यात्रा महोत्सव सुरु होत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना लवकर दर्शन घेता यावं, यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अभिषेक करणाऱ्यांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात येत आहे. उत्तर घाटावरील पायऱ्यांवर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. 

****

अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड-बीड रस्त्यावर एका धावत्या कारला आग लागल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला. आज पहाटे ही घटना घडली. मृत दोघे जण जामखेडचे रहीवाशी असून, यातले एक जण पोलिस विभागात कार्यरत होते. 

****

धुळे महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर वसुली मोहिमेत थकबाकीदारांच्या दारात ढोल वाजवून कारवाई केली जात आहे. या मोहिमेत सातत्य ठेवून कडकपणे कारवाई करावी, येत्या दोन दिवसात थकीत कर वसुली झाली नाही, तर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी वसुली पथक प्रमुखांना दिल्या आहेत.

****

परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार  होत आहे. जनतेच्या विविध समस्यांचं निराकरण यात करण्यात येतं. 

****

छत्रपती संभाजीनगर इथं उद्या सार्वजनिक संस्थांच्या विश्वस्तांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. धर्मदाय सहआयुक्त आणि सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय यांच्यातर्फे संयुक्तपणे हे आयोजन करण्यात आलं असून, जिल्ह्यातल्या संस्था, मंदिर, न्यास, यांच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****


No comments: