Wednesday, 26 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.02.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 February 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र साजरा-शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा

·      प्रयागराज इथल्या महाकुंभ पर्वाची सांगता-६५ कोटींहून अधिक भाविकांचं संगमस्नान

·      उद्या मराठी भाषा गौरव दिन-राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

आणि

·      मस्साजोग हत्या प्रकरणी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

****

महाशिवरात्रीचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

महाशिवरात्रीचा सण राज्यभरातही सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. भगवान शंकराच्या एकूण १२ ज्योतिर्लिंगांपैकी राज्यातल्या पुण्याजवळच्या भीमाशंकर, नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर, वेरुळचं घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यात औंढा इथलं नागनाथ आणि बीड जिल्ह्यात परळी इथलं वैजनाथ या पाच ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

 

जेजुरीच्या खंडोबा गडावरची तीनही शिवलिंगं आज भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत, पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगा लावून उत्साही वातावरणात आणि सदानंदाचा येळकोट असा जयघोष करत तीनही शिवलिंगांचं दर्शन घेतलं.

****

नाशिकच्या श्री श्रीत्रंबकेश्वर इथे तीन दिवस सशुल्क दर्शन बंद करण्यात आलं असून सर्वांना प्रवेश खुला असल्यामुळे राज्यभरातून भाविक दाखल झाले आहेत.

****

श्री क्षेत्र भीमाशंकर इथे मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मध्यरात्री शासकीय महापूजा करण्यात आली.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या वैजनाथ मंदिरात भाविकांची विक्रमी गर्दी झाली. काल मध्यरात्रीपासून आज दुपारपर्यंत सुमारे पाच लाखाहून जास्त भाविकांनी दर्शन घेतल्याचं वृत्त आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी पूजा करून दर्शन घेतलं. आज सकाळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनीही अभिषेक करून दर्शन घेतलं.

मंदिर परिसरात शंभर सीसीटीव्हींसह तीनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीड शहराचं ग्रामदैवत कनकालेश्वर मंदिर इथे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

****

वेरुळच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतलं. राज्यातल्या विविध जिल्ह्यांसह परराज्यातूनही हजारो भाविक घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आल्याचं वृत्त आहे.

हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात काल मध्यरात्री आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी भगवान शंकराची सपत्निक दुग्धाभिषेक आणि महापूजा केल्यानंतर पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातील धारसुर तसंच पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर इथं सिद्धेश्वर मंदिरात तर परभणी शहरातील पारदेश्वर मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. मंदिर परिसरात आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातलं केदारनाथ, नांदेड तालुक्यातलं महादेव पिंपळगाव अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.

****

लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेला आज उत्साहात प्रारंभ झाला. मध्यरात्री गवळी समाजाचा दुग्धाभिषेक झाल्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा आणि आरती करण्यात आली, देवस्थानच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. देवस्थान आणि भालचंद्र रक्तपेढीनं संयुक्तपणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांना श्री सिद्धेश्वरांचे थेट दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या सिद्धेश्वर महाराज संस्थानाच्या वार्षिक यात्रेला आजपासून सुरुवात झाली. महाशिवरात्री सुरू होणारी ही यात्रा सतरा दिवस चालते.

****

उत्तराखंडमधल्या गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे येत्या तीस एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उघडण्यात येणार आहेत. आज महाशिवरात्रीला याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. केदारनाथ धामाचे दरवाजे येत्या दोन मे रोजी सकाळी सात वाजता तर बद्रिनाथाचे दरवाजे येत्या चार मे ला उघडतील.

****

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं गंगा-यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर आज भाविकांचा जनसागर लोटला आहे. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वाची आज महाशिवरात्रीला सांगता होत आहे. मकरसंक्रांतीपासून सुरू झालेल्या या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत सुमारे ६५ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केल्याचं वृत्त आहे.

 

****

महाकुंभ पर्वात देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसारभारतीनं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी म्हटलं आहे. या पर्वाचे सर्व ४८ दिवस चाललेल्या कुंभवाणी वाहिनीमार्फत आकाशवाणीने कोट्यवधी लोकांशी संपर्क साधला, असं सेहगल यांनी नमूद केलं, ते म्हणाले

बाईट – नवनीत सेहगल

देशाची सार्वजनिक प्रसारण व्यवस्था म्हणून आकाशवाणीने या उत्सवात चोख कामगिरी बजावली असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. कुंभवाणीमार्फत कमीतकमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आकाशवाणीच्या कामगिरीबद्दल महासंचालक प्रज्ञा पालिवाल - गौर यांनीही प्रशंसा केली आहे.

****

मुंबईत होऊ घातलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट शिखर परिषदेमधे ट्रेलर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्हिडिओ संपादन, चित्रपट निर्मिती याची आवड असणाऱ्यांसाठी ही स्पर्धा आहे. यात कमीत कमी अठरा वर्षं वयाचे स्पर्धक भाग घेऊ शकतात. ट्रेलर पाठवण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट शिखर परिषद मुंबईत १ ते ४ मे या कालावधीत होणार आहे.

****

मराठी भाषा गौरव दिन उद्या साजरा होत आहे. मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथे संध्याकाळी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विजेत्यांना मराठी साहित्यासाठीचे विविध प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनी कविसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात उद्या संध्याकाळी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत देशमुख असणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही मराठी भाषा विभागातर्फे उद्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर यासंदर्भातलं परिपत्रक पोस्ट करत ही माहिती दिली.

****

महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्य लढ्यामधला त्याग, साहस आणि संघर्षपूर्ण योगदान देश कधीही विसरणार नाही, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.

बीड इथेही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्तानं सवरकर शैक्षणिक संकुलात संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवरांनी सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

****

माजी केंद्रीय गृहमंत्री तसंच माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांना आज त्यांच्या स्मृतिदिनी नांदेडमध्ये आदरांजली अर्पण करण्यात आली. नांदेड शहरातल्या त्यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण यांच्यासह चव्हाण कुटुंबीयांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

****

No comments: