Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 25 February 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्षं पूर्ण-पंतप्रधानांच्या
हस्ते १९वा हप्ता जारी
·
‘नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या
निधीत तीन हजार रुपयांनी वाढ करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
·
महाराष्ट्र लवकरच देशाच्या एआय क्रांतीचे नेतृत्व करेल-
मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त
·
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा बालस्नेही पुरस्कार जाहीर
आणि
·
आयसीसी अजिंक्यपद स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडचा उपांत्यफेरीतील
प्रवेश निश्चित
****
शेतकऱ्यांना
निधी आणि सन्मान देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला काल सहा वर्षं पूर्ण
झाली. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांचं अभिनंदन
केलं. या योजनेतून आतापर्यंत साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याबद्दल
पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात समाधान व्यक्त केलं आहे.
दरम्यान, बिहारमध्ये
भागलपूर इथं या योजनेचा १९वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते काल जारी करण्यात आला. यावेळी
शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले...
‘‘साथीयों, बीतें
वर्षों मे सरकार के प्रयासों से भारत का कृषी निर्यात बहोत अधिक बढा है। इससे किसानों
को उनकी उपज की ज्यादा किमत मिलने लगी है। कई कृषी उत्पाद ऐसे है, जिनका पहली बार निर्यात
शुरू हुआ है। अब बारी बिहार के मखाना की है।’’
पंतप्रधानांच्या
हस्ते नऊ कोटी ८० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक
रक्कम काल जमा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातल्या ९२ लाख ८९ हजार शेतकऱ्यांचा समावेश
आहे. राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना देण्यात
येणाऱ्या निधीत तीन हजार रुपयांनी वाढ करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी नागपूर इथल्या
कार्यक्रमात केली. यामुळे शेतकऱ्यांच्या निधीत वाढ होऊन, राज्यशासनातर्फे
नऊ हजार आणि केंद्रशासनातर्फे सहा हजार असे पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार
आहे. केंद्र तसंच राज्य सरकार शेतकऱ्यांप्रति पूर्णपणे समर्पित असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातल्या दुष्काळी भागातली जमीन मोठ्याप्रमाणावर
ओलिताखाली आणणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘विदर्भातलं
संपूर्ण चित्र बदलणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपलं जे गोसीखूर्दचं धरण आहे, या
धरणाच्या खालून शंभर टी एम सी पाणी हे वाहून समुद्रात जातं. ते कोणाच्याच कामी येत
नाही. आपण आता ठरवलंय, की त्याचा एक नदीजोड प्रकल्प आपण करतोय. वैनगंगेचं हे पाणी बुलडाणाच्या
नळगंगेपर्यंत आपण नेणार आहोत. म्हणजे पाचशे साडेपाचशे किलोमीटरची एक नवीन नदी आपण तयार
करतो आहोत. सगळा दुष्काळी भाग आपण याच्यामध्ये कव्हर करतो आहोत. जवळपास दहा लाख एकर
जमीन ही पूर्णपणे त्याठिकाणी ओलिताखाली येणार आहे. ज्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन याच्यामाध्यमातून
होणार आहे.’’
****
तंत्रज्ञान
आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-एआयच्या माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन आणि अर्थव्यवस्थेला
गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे
नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिटमध्ये ते काल बोलत होते. देशातील ६० टक्के
डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. नवी मुंबईत डेटा सेंटर पार्क उभारण्यात येत असून,
२०३० पर्यंत राज्यातील ५० टक्के वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल,
असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ‘ॲग्री-स्टॅट’ उपक्रमाअंतर्गत संपूर्ण
शेती प्रक्रियेचं डिजिटायझेशन करण्यात येत आहे. 'ड्रोन शक्ती'
कार्यक्रमांतर्गत ड्रोन प्रशिक्षण देऊन कृषी फवारणी खर्च कमी करण्याचा
मानस असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री
सूर्यघर- मोफत वीज योजनेतून आतापर्यंत साडेनऊ लाखांहून जास्त सौर उर्जा संयत्र बसवण्यात
आली आहेत. केंद्रीय नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल ही माहिती दिली.
ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नवीकरणीय उर्जा मंत्रालयानं घेतलेल्या कार्यशाळेतून
देशातल्या नवीकरणीय उर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूक आव्हानांवर लक्ष केंद्रीत झाल्याचं
जोशी यांनी सांगितलं.
****
नवीन शैक्षणिक
वर्षापासून "स्कूल बसेस" साठी नियमावली लागू केली जाणार आहे. त्यासाठी निवृत्त
परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमण्यात आली
आहे. काल मुंबईत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची
बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या समितीला पुढील एका महिन्याच्या
कालावधीत या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या आहेत. शालेय
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन ही नियमावली लागू केली जाणार असल्याचंही
सरनाईक यांनी सांगितलं.
****
आयसीसी
अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड आणि भारतीय संघाचा उपांत्यपूर्व फेरीतील
प्रवेश निश्चित झाला आहे. कालच्या सामन्यात न्यूझीलंडने बांग्लादेशवर पाच गडी राखून
विजय मिळवला. दुबईत झालेल्या या सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडला
२३७ धावांचं आव्हान दिलं. न्यूझीलंडच्या संघानं ४६ षटकं आणि एका चेंडूत २४० धावा केल्या.
रचिन रविंद्रने ११२ धावा केल्या. आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान लढत
होणार आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या
खात्यावर १३७ कोटी रुपये जमा झाले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती
दिली. शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर सादर केली नसल्यामुळे आणि ईकेवायसी पूर्ण न झाल्याने
मंजूर भरपाईपैकी उर्वरीत ८९ कोटी नऊ लाख रुपये वितरित होणे बाकी असल्याचं, पाटील यांनी
सांगितलं. शेतकर्यांनी लवकरात लवकर कागदपत्र जमा करण्याचं आवाहन पाटील यांनी केलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा
बालस्नेही पुरस्कार जाहीर झाला आहे. आयोगाच्या अध्यक्ष विधीज्ञ सुशीबेन शाह यांनी या
पुरस्कारासाठी स्वामी यांची निवड झाल्याचं एका पत्राद्वारे कळवलं आहे. येत्या तीन मार्चला
मुंबईत एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. स्वामी यांनी बालकांच्या हक्कांचे
संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत राबवलेल्या विविध उपक्रमांच्या
यशस्वीतेमुळे त्यांची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या
मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अडीच महिन्याचा कालावधी उलटून गेला
आहे. राज्य शासनाने या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून नियुक्ती
करावी आणि फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ
आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशापुख
यांनी ही माहिती दिली. स्थानिक सहकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल,
तसंच मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचं देशमुख
यांनी सांगितलं.
दरम्यान, येत्या ८
मार्चला जागतिक महिला दिनाच्या औचित्याने काँग्रेस पक्षातर्फे मस्साजोग-बीड अशी सद्भावना
यात्रा काढण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून
साकार झालेल्या "प्रशासन आपल्या मोबाईलवर" या नावीन्यपूर्ण उपक्रमास कालपासून
सुरुवात करण्यात आली. शंभर दिवसाच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात
आला आहे. सोमवारपासून शुक्रवार पर्यंत प्रत्यक्ष गुगल मीटद्वारे सरपंच, ग्रामसेवक
यांच्यासोबत संवाद साधून पंचायत, जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत त्यांच्या काही अडीअडचणी
असल्यास त्यावर साधक बाधक चर्चा केली जाणार आहे.
****
लातूरचे
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. हा यात्रा महोत्सव २०
दिवस चालणार असून या दरम्यान धार्मिक, आरोग्य, सामाजिक
यासह विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर श्रींची महापूजा करण्यात येणार आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात कळमनुरी पंचायत समिती मधील घरकुल विभागातील कंत्राटी अभियंत्यासह एका खाजगी
व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल पंधरा हजार रूपयांची घेताना रंगेहात
पकडले. एका लाभार्थ्याचा मंजूर घरकुल योजनेतील दुसरा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी कंत्राटी
अभियंता सागर पवार याने ही लाच मागितली होती.
****
प्रयागराज
इथल्या महाकुंभ मेळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद स्थानकावरुन औरंगाबाद-पाटणा-औरंगाबाद
ही विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी आज सायंकाळी साडे सात सुटून परवा
सकाळी साडे दहा वाजता पाटण्याला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी परवा दुपारी साडे
तीनला पाटण्याहून निघेल आणि १ मार्चला सकाळी पावणे आठ वाजता औरंगाबाद स्थानकावर पोहचेल.
****
No comments:
Post a Comment