Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पीएम-किसान योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशभरातल्या शेतकरी बंधू आणि भगिनींचं अभिनंदन केलं आहे. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या संदेशात त्यांनी, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास साडे तीन लाख कोटी रुपये पोहोचले असून, ही आपल्यासाठी खूप समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. गेल्या १० वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात कृषी क्षेत्राचा झपाट्यानं विकास झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आपल्या लाखो लहान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे बाजारपेठेतली त्यांची उपलब्धता वाढली असून, शेतीचा खर्चही कमी झाला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज बिहारमधल्या भागलपूरमध्ये पीएम-किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी करणार आहेत. देशभरातल्या साडे नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २२ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण यावेळी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोहात नागपूर इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. राज्यातल्या ९२ लाख ८९ हजार शेतकरी कुटुंबांना एक हजार ९६७ कोटीहून अधिक रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातल्या प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र तसंच जिल्हा, तालुका आणि ग्राम पंचायत स्तरावर हा समारोह आयोजित करण्यात आला आहे.
****
प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळयात दररोज जगभरातून लाखो भाविक हजेरी लावत असून त्रिवेणी संगमावर आतापर्यंत ६२ कोटी सहा लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. काल अनेक मान्यवरांसह सुमारे एक कोटी ३२ लाख भाविकांनी संगमात स्नान केलं. उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी, लोकसभेचे खासदार आणि भाजप नेते संबित पात्रा, गायक कैलाश खेर, चित्रपट निर्माते बोनी कपूर, शंकराचार्य भारतीतीर्थ महास्वामीजी यांनीही काल त्रिवेणी संगमावर स्नान केलं.
****
राज्यातल्या बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत राज्यातल्या सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार आहेत. राज्यातल्या ३०५ बाजार समित्या आणि त्यांच्या ६२३ उप बाजारांच्या माध्यमातून शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत कालानुरूप बदल घडविणं, शेतमालाच्या विपणनामध्ये आधुनिक बाबींचा अंगीकार करणं, शेतकरी आणि इतर सर्व बाजार घटकांना द्यायच्या सोई-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाय योजना आदी विषयांसंदर्भात या परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.
****
ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते आणि दूरदर्शनवरील वृत्त निवेदक अनंत भावे यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. वृत्तपत्रातील स्तंभलेखन, कथासंग्रहाबरोबरच त्यांनी विपुल प्रमाणावर बालसाहित्याचं लेखन केलं. अग्गड हत्ती तग्गड बंब, अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी यासारखी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. २०१३ मध्ये बालसाहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
सहायक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा-सेट, येत्या १५ जूनला होणार असून, या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने ही माहिती दिली. उमेदवारांना १३ मार्च पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे अर्ज भरता येणार आहेत. तर, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १४ ते २१ मार्च अशी मुदत देण्यात आली आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड-बीड रस्त्यावर एका धावत्या कारला आग लागल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला. आज पहाटे ही घटना घडली. मृत दोघे जण जामखेडचे रहीवाशी असून, यातले एक जण पोलिस विभागात कार्यरत होते.
****
बीड इथं प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या ४० लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते काल वितरीत करण्यात आलं. या योजनेसाठी राज्य शासनाकडून मिळालेला पैसा घरातल्या गृहीणीनं घरासाठीच खर्च केला पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.
****
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जानेवारी अखेरपर्यंत अकोला जिल्ह्यात पाच हजार ६४९ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी सरकारी जागा जिल्हा परिषद प्रशासनानं उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे संबंधित भूमिहीन लाभार्थ्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार होणार आहे. जनतेच्या विविध समस्यांचं निराकरण यात करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment