Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
· आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
· पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्याचा
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय-परळीत पशूवैद्यक महाविद्यालय स्थापनेला मान्यता
· छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचा दर बुधवारी एक दिवस गावकऱ्यांसोबत उपक्रम
आणि
· प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
एक हजार ८९५ प्रकल्पांना मंजुरी-सलग तिसऱ्या वर्षी देशात अव्वल
****
आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी
शासन कटिबद्ध असून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून समतोल विकास साधला जाईल, अशी
ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सामाजिक दायित्व निधीतून आदिवासी
समाजाच्या विकासासंदर्भात आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या परिषदेत मुख्यमंत्री
बोलत होते. आदिवासी मुलांना योग्य संधी मिळण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली. ते
म्हणाले –
जर आदिवासी मुलं योग्य प्रकारे
शिकली, तर अनेक अडचणीतनं ते बाहेर येतात. साधारणपणे आपण जर बघितलं तर आदिवासी मुलांमध्ये
उपजत प्रचंड मोठे गुण आहेत. केवळ त्या गुणांना योग्य प्लॅटफॉर्म देण्याची आवश्यकता
असते. आणि म्हणूनच आपल्या सगळ्या आदिवासी शाळा असतील, आश्रमशाळा असतील, नामांकित प्रायव्हेट
स्कुल्समध्ये देखील आदिवासी मुलांना आपण शिकवलं पाहिजे. कारण, जोपर्यंत समाजातल्या
इतर लोकांसोबत त्यांचं एज्युकेशन होणार नाही, तोपर्यंत बुजरेपणाचा गुण तेव्हाच जाऊ
शकतो, जेव्हा हा समाज सगळा किंवा ही मुलं इतरांसोबत मिक्सअप होतील.
****
पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये
नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने
घेतला आहे. १९७६ पूर्वीच्या बाधित गावठाणांसाठी हा कृती कार्यक्रम राबवण्यात येईल.
अशा एकूण ३३२ गावठाणासाठी सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या तरतुदीस राज्यमंत्रिमंडळाने
मंजुरी दिली आहे.
राज्य आधारसामग्री -डेटा धोरणास मंजुरीसह
राज्य डेटा प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. महाराष्ट्र
महामार्ग अधिनियमात सुधारणा, आणि महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश २०२५ ला
या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुणे जिल्ह्यात बारामती इथं तसंच बीड जिल्ह्यात
परळी इथं नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
देण्यात आली. यासाठी प्रत्येकी ५६४ कोटी ५८ लाख रुपये तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली
आहे. या महाविद्यालयासाठी परळी इथं ७५ एकर तर बारामती तालुक्यात कऱ्हावागज इथं ८२ एकर
जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता प्रत्येकी
८० विद्यार्थी इतकी असणार आहे.
दरम्यान, परळीत पशुवैद्यक महाविद्यालय
स्थापनेच्या निर्णयाबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे
आभार मानले आहेत. प्रगतीच्या वाटेवर हे एक विश्वासात्मक पाऊल ठरेल, असं
मुंडे यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं गंगा-यमुना
आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर सुरु असलेल्या महाकुंभ पर्वाचा उद्या महाशिवरात्रीला
समारोप होणार आहे. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात आज सायंकाळी चार वाजेपर्यंत
जवळपास ९७ लाखापेक्षा अधिक भाविकांनी स्नान केलं. अमृतस्नान करण्याचा उद्या शेवटचा
दिवस असल्यानं स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्थापन केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात एक दिवस
गावकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विभागात ७६ तालुक्यातल्या एका गावात
तालुक्यातले अधिकारी दर बुधवारी भेट देणार आहेत. या उपक्रमात गावातल्या शक्य त्या समस्या
जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न असेल, असं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज
पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले –
लोकांचे जागेवर सुटणारे प्रश्न
जागेवर सोडवू. ज्याला थोडा वेळ लागणार आहे, त्याच्यावर जे काही कामकाज करावं लागतं,
ते कामकाज करून आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यासाठी खासकरून रचनात्मक
पद्धतीनं ही एक योजना राबवण्याचं नियोजित केलेलं आहे. आणि पहिल्या एक दोन आठवड्यामध्ये
आम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे, त्याचा अनुभव घेऊन आणि जसे जसे आम्हाला करेक्टीव्ह
मेजर्स घ्यावे लागतील काही सुधारणात्मक गोष्टी त्याच्यामध्ये इंप्रुव्ह कराव्या लागतील,
इन्क्लुड कराव्या लागतील त्या आम्ही निश्चितपणाने करू.
****
एसटी बसमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचा
शासनाचा विचार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. कर्नाटकात
एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते पीटीआयशी बोलत होते. गृह राज्यमंत्री
योगेश कदम यांनी यासंदर्भात बोलतांना, एसटीतल्या प्रवाशांची सुरक्षा
ही कर्नाटक सरकारची देखील जबाबदारी असून त्यांनी ती पार पाडली नाही तर महाराष्ट्र सरकार
सुरक्षा पुरवेल असं सांगितलं.
****
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग
योजनेअंतर्गत सर्वाधिक २२ हजार १० प्रकल्पांना मंजुरी महाराष्ट्रात देण्यात आली आहे, यामध्ये
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक हजार ८९५ प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्रात
हा प्रकल्प मंजुरीचा उच्चांक असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने
सलग तीन वर्षांपासून हे सातत्य राखल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश
देशमुख यांनी दिली,
ते म्हणाले –
आपल्याकडे खूप वेगवेगळ्या
स्वरूपाचे प्रकल्प या योजनेतून उभे राहिलेले आहेत. उदाहरणादाखल भाजीपाल्याचे सोलार
ड्राईड करण्याचे अनेक प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने उभे राहिलेले आहेत. तसेच एस फॉर
एस नावाची एक बायबॅक करणारी स्टार्ट अप आहे. ती कंपनी पूर्ण त्यांचा सोलार ड्राईड भाजीपाला
बायबॅक करते. मसाल्याचे उद्योग आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालेले आहेत.
दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. मला सांगायला
अतिशय आनंद होतो की या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा मागच्या तीन वर्षापासून
सातत्यानं देशात नंबर एकवर आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर खालोखाल
राज्यात अनुक्रमे अहिल्यानगर, सांगली, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात
सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. राज्यात मंजूर झालेल्या
२२ हजार १० प्रकल्पांसाठी दोन हजार २६३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून अनुदानापोटी
३८९ कोटी रुपये निधी लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.
****
देशभरात आठवी आर्थिक गणना करण्यात येणार
आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज पार पडली, या
गणनेसाठी ग्रामीण भागासाठी सुमारे साडे सहा हजारावर तर शहरी भागासाठी सुमारे साडे पाच
हजारावर प्रगणकांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी विशेषत्वाने तयार केलेल्या मोबाईल
ॲप्लिकेशनद्वारे ही गणना होणार आहे.
देशात पहिली आर्थिक गणना १९७७ मध्ये झाली होती. तर २०१९ साली सातवी आर्थिक
गणना झाली होती. अर्थव्यवस्थेच्या संरचनेचं मूल्यांकन करणं म्हणजे, बिगरशेती उत्पादन तसंच वस्तू आणि सेवांच्या वितरणात असलेल्या आस्थापनांची
संख्या,
आणि त्यात गुंतलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करणं तसंच
अद्ययावत करणं, हा या आर्थिक गणनेमागचा
उद्देश असतो. काळानुसार आर्थिक परिदृष्यातील बदलांचं निरीक्षण करणं, केंद्र,
आणि राज्य सरकारी धोरणांच्या प्रभावाचं मूल्यांकन करणं, तांत्रिक प्रगती तसंच बाह्य आर्थिक घटकांचा प्रभाव अभ्यासणं अशा विविध
उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही आर्थिक गणना केली जाते.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने
परभणी इथे शून्य ते १८ वर्षे वयोगटातील ४३८ बालरुग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली.
यामध्ये परभणीसह हिंगोली,
जालना तसंच बीड जिल्ह्यातल्या बालकांचाही समावेश होता. यापैकी
९७ बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचं तपासणी अंती आढळून आलं आहे. गरजू
बालकांवर आर.पी रुग्णालयात नामवंत हृदयरोग तज्ज्ञांकडून उपचार तसंच शस्त्रक्रिया करण्यात
येणार असल्याचं आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितलं.
****
हिंगोली इथं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी
माणिकराव देशमुख टाकळ गव्हाणकर यांचा जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त गौरव सोहळा आज
पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद
पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, तसंच
शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी टाकळगव्हाणकर यांना शुभेच्छा दिल्या.
****
आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान नियोजित सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली
आहे. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला.
****
No comments:
Post a Comment