Sunday, 29 September 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २९ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 September 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिडकीन औद्योगिक प्रकल्पासह राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन

·      विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन

·      मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा कोल्हापूर इथून राज्यस्तरीय शुभारंभ

आणि

·      स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन होणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमात पुण्यातल्या भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन, शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भुमिपूजन, तसंच सोलापूर विमानतळाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर केले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ११४ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. 

****

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानांतर्गत महाराष्ट्रातल्या बत्तीस जिल्ह्यांमधल्या सुमारे १२ लाख ८७ हजार आदिवासींना लाभ होणार आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या योजनेचं काम लवकरच सुरू होणार आहे. या योजनेतून जालना जिल्ह्यातल्या २५, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अकरा, बीड दोन आणि लातूर जिल्ह्यातल्या दोन, धाराशिव चार तर परभणी जिल्ह्यातल्या पाच खेड्यांमधल्या आदिवासी समाजाला लाभ होणार आहे.

****

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन, केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं आहे. काल मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार बोलत होते. मतदान केंद्रावर मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यात याव्यात असे आदेश दिल्याचं आणि त्यासाठी सरासरी एका मतदान केंद्रावर ९५० मतदार असतील याची काळजी घेण्याची सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीबाबतचा हा संक्षिप्त वृत्तांत..

राज्यात ९ पूर्णांक ५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार ४ पूर्णांक ५९ कोटी तर महिला मतदार ४ पूर्णांक ६४ कोटी आहेत. राज्यात १९ पूर्णांक ४८ लाख नवमतदार आहेत. १०० वर्षांवरील मतदारांची संख्या ४९ हजार एवढी संख्या आहे. तृतीय पंथीय, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांसाठी आयोगाकडून विशेष व्यवस्था केली जाणार आहे. मतदानकेंद्रावर जाणं शक्य नसलेल्या ज्येष्ठ नागरीक मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रात तीनवेळा जाहिरात द्यावी लागणार आहे. प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

****

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा काल कोल्हापुरातून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत कोल्हापूर ते अयोध्या या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर स्थानकावर उपस्थित होते. यावेळी आठशे ज्येष्ठ नागरिक विशेष रेल्वेनं अयोध्येसाठी रवाना झाले. या योजनेत देशातल्या ७३ आणि राज्यातल्या ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे, मुख्यमंत्र्यांनी या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

****

राज्यात गेल्या मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे बारा जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सोयाबीन, कांदा, भाजीपाला, मका, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग या पिकांना या पावसाचा फटका बसला असून, सुमारे तेहतीस हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात या पावसामुळे अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाच्या माध्यमातून नुकसानीपोटी मदत मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावा राहील, अशी ग्वाही, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. भिकारसारोळा, म्होतरवाडी, गौडगांव, अंबेवाडी आदी गावांमध्ये पिकांची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते.

****

लातूर इथं काल भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढाया ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा संपूर्ण इतिहास अजूनही लोकांपर्यंत पोहचलेला नसून, अनेक घटनांवर अद्यापही लेखन झालेलं नाही. या लढ्याचा एकत्रित इतिहास जागृतपणे नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं, बागडे यावेळी म्हणाले.

****

राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काल अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रमुख विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट घेतली. सोयाबीनला साडे आठ हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भाव मिळावा, तसंच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं गेल्या ११ दिवसांपासून घाडगे-पाटील यांचं उपोषण सुरू आहे. या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असं आश्वासन क्रीडा मंत्री बनसोडे यांनी दिलं.

****

****

स्वच्छता ही सेवा, या अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं काल हर्सूल परिसरातल्या केंद्रीय शाळेत "एक पेड माँ के नाम" हा उपक्रम राबवण्यात आला. वृक्षारोपणाचं महत्व विशद करणारी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली, तसंच सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने काल महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमात महिलांना शहर स्वच्छतेबद्दल प्रश्न विचारून जनजागृती करण्यात आली. महिलांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ११ महिलांना पैठणी तर इतर ५१ आकर्षक बक्षिसांचं वाटप करण्यात आलं.

शहरातल्या सरस्वती भुवन महाविद्यालयातल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी काल शहरात स्वच्छता मोहीम राबवली.

****

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे. पर्यावरण रक्षणासाठीही हे अभियान उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पडवळ यांनी या अभियानाविषयी सांगितलं.... 

“स्वच्छता ही सेवा हे अभियान स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांची या ठिकाणी दौड घेऊन सायकल रॅली केली. याशिवाय गाव स्वच्छतेसाठी गल्लोगल्ली जाऊन स्वच्छतेचा संदशे दिला. आणि हे अभियान आम्ही प्रभावीपणे राबवून आमचं सांजा गाव स्वच्छ आणि सुंदर कसं होईल या दृष्टीनं विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीनं निश्चितच आम्ही प्रयत्नशील आहोत.”

 

****

परभणी इथं काल स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. यात विविध शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, अन्य नागरिक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

****

नांदेड तालुक्यातल्या नेरली इथं गेल्या शुक्रवारी दूषित पाणी प्यायल्यामुळे २७३ नागरिकांना विषबाधा झाली होती, यातले सहा रुग्ण अद्यापही अत्यवस्थ आहेत. अन्य सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली. नेरली गावामध्ये सहा वैद्यकीय पथक कार्यरत आहे. गावातल्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

****

कानपूर इथं सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेशदरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे सुरू होऊ शकला नाही. बांगलादेशनं पहिल्या दिवसअखेर तीन बाद १०७ धावा केल्या.

****

No comments: