Thursday, 26 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 September 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुण्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.

****

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टिमुळं जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांच्या वर पोहोचला असून, धरणातून होणार्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाच्या १८ दरवाजांमधून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा, हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर तर बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सातारा तसंच धुळे जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात काल वीजांसह मुसळधार पाऊस पडला.

****

उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात सेमीकंडक्टर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे आणि यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४ या कार्यक्रमात काल मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. दावोसमध्ये झालेली गुंतवणूक, सौरऊर्जा, सेमीकंडक्टर इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढती गुंतवणूक यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढत असल्याचं ते म्हणाले.

****

भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कोल्हापूर इथं पक्षातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.  विधानसभेच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ५८ जागांपैकी अवघ्या १७ जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे हे अंतर भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचना शाह यांनी यावेळी केली.

****

देशातल्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संवाद असण्याची गरज, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आणि पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्यातल्या अधिकाऱ्यांसोबत मंत्री जाधव यांनी नॅशनल हेल्थ मिशनची बैठक दिल्लीत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. नॅशनल हेल्थ मिशनचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिश्रम घेण्याचं आवाहन जाधव यांनी यावेळी केलं. 

****

देशात २०२३-२४ या वर्षात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २५ लाख मेट्रिक टनांनी वाढून तीन हजार ३२२ लाख मेट्रिक टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं २०२३-२४ साठी विविध महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनाचे अंतिम अंदाज जाहीर केले आहेत. सरत्या वर्षात भात, गहू आणि श्री अन्न यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन विक्रमी झाल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्राथमिक अंदाज करण्यात आल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

माथाडी कामगारांचा मोबदला स्वतःच्या खिशात टाकणाऱ्यांवर सरकारनं कारवाई केली असून, यापुढेही अशी कारवाई करण्यात येईल, माथाडींसाठीचा कायदा आणखी बळकट करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती आणि गुणवंत कामगार पुरस्काराचा वितरण समारंभ नवी मुंबईत काल झाला, त्यावेळी ते बोलत होते.

****

परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महाअभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल गंगाखेड तालुक्यात दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या, फळं यापासून बनवलेल्या विविध पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. गरोदर माता तसंच बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.

****

आंतरराष्ट्रीय बिलिअर्ड्स आणि स्नूकर महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सिक्स रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कमल चावला यानं अजिंक्यपद मिळवलं आहे. मंगोलियात उलानबातर इथं झालेल्या या स्पर्धेत कमलनं पाकिस्तानच्या खेळाडुचा सहा - दोन असा पराभव केला.

****

कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी पहिल्या दहा खेळाडुंमध्ये स्थान मिळवलं आहे. ७५१ गुणांसह जयस्वालनं पाचवं तर पंतनं ७३१ गुणांसह सहावं स्थान पटकावलं आहे.

****

No comments: