Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 29 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २९ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· राज्यातल्या ११ हजार २०० कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची
पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
· बिडकीन औद्योगिक क्षेत्रामुळे गुंतवणूकीला चालना मिळणार, तसंच विविध उद्योगांच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती
होणार
· मेक इन इंडिया अभियानामुळे भारत जगातलं महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनला
असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन
· औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उद्यापासून युवतींसाठी मोफत स्वरक्षणाचं
प्रशिक्षण
आणि
· छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला माझी वसुंधरा अभियानांतर्गत दीड कोटी
रुपयांचं बक्षीस
****
भारताचंही आधुनिकीकरण झालं पाहिजे, त्यासोबतच
आपल्या मूलभूत मूल्यांच्या आधारे भारताने समृद्ध, विकास
आणि आपला वारसा अभिमानाने पुढे नेला पाहिजे, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या ११ हजार २०० कोटींहून अधिक
रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते
दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी
ते बोलत होते. सरकारच्या या विविध योजना शहरी विकासाला चालना देतील आणि नागरीकांचं
जीवनमान अधिक सोपं करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
या कार्यक्रमात पुण्यातल्या भिडे वाड्यात क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन, शिवाजीनगर ते
स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, स्वारगेट
ते कात्रज या भुयारी मार्गाचं भुमिपूजन, तसंच सोलापूर
विमानतळाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. व्यापार, उद्योग,
व्यवसायासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही जगभरातून लोक आता
विमानाने येणार असल्याचं ते म्हणाले.
पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं देखील
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आलं. केंद्र सरकारच्या
राष्ट्रीय औद्योगिक जोडमार्ग विकास कार्यक्रमांतर्गत सात हजार ८५५ एकर जागेत या
औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. मराठवाड्याला प्रमुख आर्थिक केंद्र बनवण्याची
क्षमता बिडकीन औद्योगिक क्षेत्रात आहे.
या प्रकल्पामुळे औद्योगिक गुंतवणूकीस चालना मिळून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले -
छत्रपती संभाजीनगर मे लगभग
आठ हजार एकड में बिडकीन इंडस्ट्रीयल एरिया का विस्तार होगा। कई बडे बडे उद्योगों के
लिये यहां जमीन ॲलॉट हो गई है। इससे यहां हजारों करोड का निवेश आयेगा। इससे हजारों
युवाओं को रोजगार मिलेगा।
आता पुण्याप्रमाणे संभाजीनगर इथं अनेक उद्योग येऊ घातले
असून,
त्याद्वारे स्थानिक पातळीवर अनेक संधी उपलब्ध होणार
असल्याचं,
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. राज्यातलं महायुती सरकार
हे उद्योगांना भेडसावणारे प्रश्न तत्काळ सोडवत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण डुंबरे
यांनीही या प्रकल्पातून होणाऱ्या रोजगारनिर्मितीबद्दल अधिक माहिती दिली.
या
प्रकल्पामध्ये नऊ हजार एकशे बावीस कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही त्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी केली आहे. ६० हजार कोटी इतकी गुंतवणूक आता निर्माण
होत आहे त्या नवीन नवीन प्रकल्पामुळे. ज्याद्वारे जवळपास ३५ हजार ही प्रत्यक्ष रोजगार निर्माण
होणार असून अप्रत्यक्ष रोजगार हा ७५ हजार निर्माण होणार आहे.
बिडकीन इथं झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण
मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड उपस्थित होते.
****
केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानामुळे आज भारत
उत्पादनाचं केंद्र बनला असून, प्रत्येक क्षेत्रातली
निर्यात वाढली असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून आज त्यांनी
देशवासियांशी संवाद साधला.
भंडारा जिल्ह्यातल्या पारंपरिक रेशीम उद्योगाचा उल्लेख
पंतप्रधानांनी यावेळी केला. भंडारा टसर सिल्क हॅण्डलूम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या
या उद्योगात भंडारा जिल्ह्यातले ५० पेक्षा जास्त स्वयंसहायता गट कार्यरत आहेत. या
कामात महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे. या रेशीम उत्पादनाला लोकप्रियता मिळत असून, स्थानिक समुदायही सक्षम होतो असल्याचं सांगून, हाच
मेक इन इंडियाचा गाभा असल्याचं ते म्हणाले.
भंडारा के कुछ हिस्सों में ५० से
भी अधिक ‘Self Help Group’, इसे संरक्षित करने के काम में
जुटे हैं।
इनमें महिलाओं की बहुत बड़ी भागीदारी है।
यह silk तेजी से लोकप्रिय हो रही है और
स्थानीय समुदायों को सशक्त बना रही है, और यही तो ‘Make In India’ की spirit है।
स्वच्छता ही सेवा, एक पेड माँ के नाम, कॅच द रेन या अशा उपक्रमांना देशभरातून उत्स्फुर्त सहभाग मिळत असल्याचं
पंतप्रधानांनी सांगितलं.
आपल्या अलिकडच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिका सरकारनं भारताला
सुमारे ३०० प्राचीन कलाकृती परत केल्याची, आणि
त्यातल्या कलाकृतींची तपशीलवार माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. आगामी
सणांनिमित्त शुभेच्छा देतानाच केवळ मेड इन इंडिया उत्पादनांचीच खरेदी करण्याच्या
जुन्या संकल्पाची उजळणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
मन की बातच्या प्रवासाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल
पंतप्रधानांनी दूरदर्शन, प्रसारभारती तसंच
आकाशवाणीशी जोडल्या गेलेल्या सर्वांची प्रशंसा केली.
दरम्यान, याबद्दल प्रसारभारतीचे
अध्यक्ष नवनीत सहगल यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. दूरदर्शन, आकाशवाणी आणि प्रसारभारती या तीन्ही संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी
पंतप्रधानांचे शब्द प्रेरणादायी असल्याचं सहगल म्हणाले.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असून, पाटण विधानसभा मतदारसंघातील
विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. यामध्ये छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, तसंच
नगरोत्थान योजनेसह पाणी पुरवठा योजनांचं भूमिपूजन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
****
शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वरक्षणाचं मोफत
प्रशिक्षण देणाऱ्या ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा
शुभारंभ उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे. कौशल्य विकास
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज ही माहिती दिली. मुंबईच्या कुर्ला इथल्या शासकीय
औद्योगिक संस्थेत यासाठी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
****
माझी वसुंधरा अभियानाच्या चौथ्या टप्प्यात छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महापालिकेचा पुरस्कार देऊन
गौरवण्यात आलं आहे. घनकचरा, वृक्षारोपण, शहराचं वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने केलेल्या कामाची दखल घेत हा
पुरस्कार मिळाला असून, दीड कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. माझी वसुंधरा अभियानाचा चौथा टप्पा
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या
कालावधीत राबवण्यात आला. यामध्ये राज्यातल्या ४१४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था
तसंच २२ हजार २१८ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.
****
लोकप्रतिनिधी, नोकरशाही आणि
न्यायव्यवस्था लोकांना न्याय देण्यासाठी असून, दुसऱ्यावर
अन्याय होणार नाही ही न्यायाच्या जाणीवेची पहिली पायरी असल्याचं प्रतिपादन, मुंबई
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा
इथं आज विधी सेवा महाशिबीर तसंच शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावाच्या उद्घाटन
समारंभात ते बोलत होते. अशा प्रकारच्या विधी सेवा महाशिबीरांच्या माध्यमातून खऱ्या
सामाजिक न्याय आणि समान न्यायाच्या संकल्पनेची पायाभरणी होत असते, असं न्यायमूर्ती संत म्हणाले. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कालिदास पी.
नांदेडकर,
अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित
होते.
****
देशातल्या प्रत्येक मुलाने पद्मश्री, सुवर्ण पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करावे आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं, असं आवाहन,
चंदू चॅंपियनचे प्रेरणास्थान, पहिले
पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर
इथं सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ, समुपदेशक आणि लेखक डॉ. आनंद
नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वेध परिषदेत ते आज बोलत होते. या
परिषदेचं हे १३वं सत्र होतं. दिव्यांग लोक मेहनत करुन यश मिळवतात, असं सांगून पेटकर यांनी अपांगांना दिव्यांग हा शब्द वापरल्या जात असल्याबद्दल
आनंद व्यक्त केला.
या परिषदेत पेटकर यांच्यासह सियाचीनमध्ये सैनिकांसाठी
ऑक्सिजन प्लांट उभारणाऱ्या सुमेधा चिथडे, मराठवाड्यातल्या
पहिल्या महिला सैन्याधिकारी निवृत्त मेजर मोहिनी गर्गे आणि यंग इंडियन्स संस्थेचे
सहअध्यक्ष सीए असीम अभ्यंकर यांची नाडकर्णी यांनी मुलाखत घेतली. शहरातल्या विविध
शाळांमधले सुमारे ५०० विद्यार्थी, पालक, शिक्षक यावेळी उपस्थित होते.
****
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर
महानगरपालिका आणि संत निरंकारी भवन मंडळाच्या वतीने आज शहरातल्या एन - आठ परिसरात
स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता अभियानात जमा झालेला कचरा महानगरपालिका
घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रावर पाठवण्यात आला.
****
हवामान
मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव
या जिल्ह्यांना उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह
पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या राष्ट्रीय क्रिकेट
अकादमीचं आज बंगळुरु इथं उद्घाटन करण्यात आलं. चाळीस एकर परिसरात तीन जागतिक
दर्जाची मैदानं,
८६ खेळपट्ट्या तसंच इनडोअर आणि आऊटडोअर प्रशिक्षण, वैद्यकीय उपचाराची सुविधा या अकादमीत उपलब्ध आहे.
****
No comments:
Post a Comment