Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २८ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं केंद्रीय निवडणूक
आयोगाचं आवाहन
· मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत सर्व १० जागांवर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या
युवासेनेचे उमेदवार विजयी
· मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापूर इथून मुख्यमंत्री तीर्थदर्शन
योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ
आणि
· स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान
करण्याचं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं आहे. आज मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या
तयारीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार बोलत
होते. मतदान केंद्रावर मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यात याव्यात असे आदेश दिल्याचं
आणि त्यासाठी एका मतदान केंद्रावर सरासरी ९५० मतदार असतील याची काळजी घेण्याची सूचना
केल्याचं त्यांनी सांगितलं. शहरी भागातल्या जवळपास १०० टक्के आणि ग्रामीण भागातल्या
५० टक्के मतदान केंद्रावर web casting सुविधा
दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व
आदेश दिल्याची माहितीही निवडणूक आयुक्तांनी यावेळी दिली.
****
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या
नेतृत्वाखालील युवासेनेचे उमेदवार सर्व १० जागांवर विजयी झाले. खुल्या प्रवर्गातल्या
५ जागांवर प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार
विजयी झाले. राखीव प्रवर्गातून शीतल शेठ देवरुखकर, धनराज
कोहचाडे,
शशिकांत झोरे, मयुर पांचाळ आणि स्नेहा
गवळी हे उमेदवार निवडून आले आहेत.
****
महायुतीकडून सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर सर्व २८८ जागांवर
निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे, असं राष्ट्रीय समाज पक्षाचे
अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महायुतीनं आम्हाला ३५ ते चाळीस जागा द्याव्यात, अशी
अपेक्षा जानकर यांनी व्यक्त केली.
****
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आज कोल्हापुरातून राज्यस्तरीय
शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत कोल्हापूर
ते अयोध्या या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री
हसन मुश्रीफ कोल्हापूर स्थानकावर उपस्थित होते. यावेळी आठशे ज्येष्ठ नागरिक विशेष रेल्वेनं
अयोध्येसाठी रवाना झाले. या योजनेत देशातल्या ७३ आणि राज्यातल्या ६६ तीर्थक्षेत्रांचा
समावेश आहे,
मुख्यमंत्र्यांनी या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं
अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
****
मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय
तपास यंत्रणांकडून मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.
आगामी नवरात्रौत्सव लक्षात घेऊन मंदिरं आणि प्रार्थनास्थळांवरची सुरक्षा व्यवस्था अधिक
कडक करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारताच्या परकीय चलन गंगाजळीत २ अब्ज ८३ कोटी डॉलर्सने वाढ होऊन
ती,
६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स एवढ्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली
आहे. गेल्या आठवड्यात यात २२ कोटी ३० लाख डॉलर्सची वाढ झाली होती. भारताच्या सुवर्ण
साठा मूल्यातही ७२ कोटी ६० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो ६३ अब्ज ६१ कोटी डॉलर्स वर पोहोचला
आहे.
****
आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अंतर्गत गेल्या तीन वर्षांत ६७
कोटी आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट्स अर्थात आभा खाती तयार करण्यात आली आहेत. ४२ कोटी
आरोग्य नोंदी या आभा खात्याशी संलग्नित आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातल्या शिवाजीनगर
ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण होणार
आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भूमीपूजनही यावेळी होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान उद्या आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाभिमानासाठी
प्राणांची आहुती देणारे भगतसिंग अमर शहीद असल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या
संदेशामधे म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भगतसिंगांना आदरांजली वाहिली
आहे.
****
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज
त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. सुमारे आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लता मंगेशकर
यांनी गायलेली गाणी केवळ देशातच नव्हे तर भाषा, प्रांत
आणि वयाच्याही सीमा ओलांडून जगभरात आजही लोकप्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
इतर मान्यवरांनी लता मंगेशकरांना आदरांजली वाहिली आहे.
****
सतत नवीन तंत्रज्ञान शिकणं आणि तंत्रज्ञान वापरात अद्ययावत राहणं
ही आजच्या जगाची गरज असून, वकिलांनीही हा बदल आत्मसात केला
पाहिजे,
असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
नवी मुंबईतल्या तळोजा इथे देशातल्या पहिल्या वकील अकादमी आणि संशोधन केंद्राच्या इमारतीचं
भूमिपूजन आज करण्यात आलं, त्यानंतर नेरूळ इथल्या डी.वाय.पाटील विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत
होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीनं ही अकादमी उभारण्यात येत आहे. नवीन
वकिलांना विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
माजी मंत्री तथा काँग्रेचे ज्येष्ठ नेते रोहिदास चुडामण पाटील
यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी धुळे इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
राज्यात या आठवड्यात मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे
बारा जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सोयाबीन, कांदा,
भाजीपाला, मका, बाजरी,
मूग, उडीद, भुईमूग या पिकांना या पावसाचा फटका बसला असून, सुमारे
तेहतीस हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
स्वच्छता ही सेवा, या अभियानाअंतर्गत मराठवाड्यात
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
आज छत्रपती संभाजीनगर मध्ये हर्सूल परिसरातल्या केंद्रीय शाळेत
“एक पेड माँ के नाम” हा उपक्रम
राबवण्यात आला. वृक्षारोपणाचं महत्व विशद करणारी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी यावेळी
घेतली तसंच सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे
कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
शहरातल्या सरस्वती भुवन महाविद्यालयातल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या
विद्यार्थ्यांनी आज शहरात स्वच्छता मोहीम राबवली
****
‘स्वच्छता ही सेवा’ अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे. पर्यावरण रक्षणासाठीही
हे अभियान उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात
आहे. धाराशिव जिल्ह्यातले जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक पडवळ यांनी या अभियानाविषयी सांगितलं –
****
परभणी इथं आज स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन रॅली
काढण्यात आली. महापालिकेसह सायकलिस्ट ग्रुप आणि प्रभावती ग्रुप यांच्यातर्फे या रॅलीचं
आयोजन करण्यात आलं होतं. यात विविध शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, अन्य नागरिक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
****
मागेल त्याला सौर कृषी पंप, या
योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठीच्या महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद मिळाला
असून फक्त चौदा दिवसात राज्यातल्या १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली
आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत त्रिशा जॉली
आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. चिनी तैपेईच्या जोडीशी
आज झालेल्या सामन्यात भारतीय जोडीचा २१-१२, २१-१७
असा पराभव झाला.
****
No comments:
Post a Comment