Thursday, 26 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत देश रक्षणासाठी तैनात सैनिकांचं कार्य गौरवास्पद असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन 

·      पंतप्रधानांचा नियोजित पुणे दौरा रद्द-मात्र तीन परम रुद्र संगणकांचं दूरदृष्य यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घाटन

·      अब्रुनुकसानीच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना १५ दिवसांच्या कोठडीसह २५ हजार रुपये दंड

आणि

·      राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम-पालघर तसंच नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट

****

आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत देश रक्षणासाठी तैनात सैनिकांचं कार्य गौरवास्पद असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज लद्दाखमध्ये सियाचीन या जगातल्या सर्वाधिक उंचीवर असलेल्या सैन्यदलाच्या तळाला भेट देऊन राष्ट्रपतींनी तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधला. इथल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी आभार मानले. सियाचीन युद्ध स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून त्यांनी हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारतरत्न दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर सियाचीन दौरा करणाऱ्या त्या आतापर्यंतच्या तिसऱ्याच राष्ट्रपती आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या बिडकीन औद्योगिक वसाहतीसह देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.

या दौऱ्यात नियोजित कार्यक्रमांपैकी तीन परम रुद्र संगणकांचं तसंच हवामान विभागासंदर्भात एक संगणकीय यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घाटन करण्यात आलं. शास्त्रोक्त संशोधनासाठी सहायक ठरणारे हे परम रुद्र संगणक दिल्ली, कोलकाता आणि पुण्यात स्थापन करण्यात आले आहेत.

****

देशांतर्गत कापूस उत्पादनात प्रति हेक्टरी एक टन वृद्धीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. कृषीपाठोपाठ रोजगार देणारं वस्त्रोद्योग हे मोठं क्षेत्र असून सन २०३० पर्यंत या क्षेत्रामध्ये सहा कोटी लोकांना रोजगार देता येतील असा विश्वासही गिररराज सिंह यांनी वर्तवला.

****

देशात सर्वसामान्य नागरिकांना एकंदर आरोग्य सुविधांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट झाल्याचं निरीक्षण राष्ट्रीय आरोग्य योजनांबाबतच्या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या खर्चाचं प्रमाण ६४ पूर्णांक दोन शतांश टक्के होतं, २०२१ मध्ये ते प्रमाण ३९ पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही सरकारनं आरोग्य क्षेत्रावर केलेल्या खर्चाचं प्रमाण १ पूर्णांक १३ शतांश टक्क्यांवरून वाढून १ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर पोचल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातली १५४ सार्वजनिक शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या संस्थेला मिळालं होतं. मात्र, या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

****

प्रशिक्षण काळातच प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांचं अटकपूर्व अंतरिम संरक्षण वाढवण्याचे निर्देश देत, हंगामी जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातून सवलत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खेडकर सध्या हंगामी जामिनावर आहेत. पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जाला केंद्रीय लोकसेवा आयोग-युपीएससीने विरोध केला आहे.

****

छत्रपती संभाजी नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळं या पाणवनस्पती पासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पर्यावरण पूरक अशा या प्रयोगाचे पेटंट देखील त्यांनी मिळवलं आहे.

****

राज्याच्या बहुतांश भागात पाऊस सुरू असून, अनेक भागात हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी देण्यात आली होती.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून, सुमारे ५६ हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

****

लातूर जिल्ह्यात रेणा नदीवरील रेणापूर मध्यम प्रकल्पाचे ४ दरवाजे आज सकाळी १० सेंटीमीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा १ हजार २५८ घनफुट प्रतिसेकंद विसर्ग सुरू झाला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

****

हवामान विभागानं उद्या सकाळी साडे ८ वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

स्वच्छता ही सेवा पंधरवड्या निमित्त धाराशिव तालुक्यातील सांजा या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकर भांगे यांनी या उपक्रमामुळे गावाचा स्वच्छतेकडून समृद्धीकडे प्रवास सुरू असल्याचं सांगत, अधिक माहिती दिली

१७ सप्टेंबरपासून पूर्ण जिल्हाभरामध्ये उपक्रम राबवले जात आहेत. त्याच्यामध्ये एक पेड माँ के नाम, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, गावामध्ये स्वच्छतेचे जे कामं झालेले आहेत, त्या कामाचं उद्‌घाटन, त्याच्यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग हा दैनंदिन उपक्रम राबवतोय. दोन ऑक्टोबर हा पूर्ण देशभरामध्ये स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व सहभागी व्यक्तींचा अशा कुटुंबाचा सत्कार सोहळा, त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव सुद्धा करणार आहे.

****

स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या प्रवर्ग -४ मधील हर्सुल कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी नागरिकांना कचरा संकलन, वर्गीकरण, ओल्या कचऱ्या पासून खत निर्मिती, सुक्या कचराचे व्यवस्थापन या विषयीची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना स्वच्छता विषयक प्रतिज्ञा देण्यात आली.

****

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियाना अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील आनंदधाम, मार्केट यार्ड परिसर तसंच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी स्वच्छता केली.

****

नांदेड जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आऊटअंतर्गत अवैध व्यवसाय करणाऱ्या ७५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन सव्वा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्ट २०२४ पासून 'ऑपरेशन फ्लश आऊट' सुरू करण्यात आलं असून, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं अबिनाश कुमार यांनी सांगितलं.

****

जागतिक पर्यटन दिनानिमित्त उद्या २७ आणि २८ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील पर्यटन स्थळांना चालना आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही या प्रदर्शनात देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे.

****

बीड जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी तसंच सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी काम करताना सर्व नियम आणि कायद्यातील तरतुदी याची माहिती घेऊन काम करावं असं प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात या अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होते.

****

नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शंभर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.

****

No comments: