Friday, 27 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 September 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

 

ठळक बातम्या

·      असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ-एक ऑक्टोबरपासून नवे दर लागू

·      अब्रुनुकसानीच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना १५ दिवसांच्या कोठडीसह २५ हजार रुपये दंड

·      राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर

·      छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची गुंठेवारी नियमितीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

आणि

·      भारत-बांगलादेशदरम्यान आजपासून कानपूर इथं दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना

सविस्तर बातम्या

केंद्र सरकारनं असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ केली आहे. अ श्रेणीतल्या अकुशल कामगारांना आता प्रतिदिवस ७८३ रुपये तर अर्धकुशल कामगारांना ८६८ रुपये किमान वेतन मिळेल. कुशल कामगार, लिपिक तसंच नि:शस्त्र सुरक्षा रक्षकांना ९५४ रुपये तर अत्यधिक कुशल कामगार आणि सशस्त्र सुरक्षा रक्षकांना एक हजार ३५ रुपये प्रतिदिन किमान वेतन मिळेल. एक ऑक्टोबरपासून हे दर लागू होणार आहेत.

****

परम रुद्र संगणकाची निर्मिती हे संगणक क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे भारताचं महत्त्वाचं पाऊल असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तीन परम रुद्र संगणकांचं दूरदृष्य पद्धतीनं उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शास्त्रीय संशोधनासाठी सहायक ठरणारे हे परम रुद्र संगणक दिल्ली, कोलकाता आणि पुण्यात स्थापन करण्यात आले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान परवा रविवारी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा चौथा भाग आहे.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटाबाबत केलेल्या आरोपांमुळे मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता.

दरम्यान, राऊत यांना १५ हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून, त्यांना तीस दिवसांच्या आत या निर्णयाला आव्हान देता येणार आहे

****


 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ.सुखबीर सिंह संधू यांचं पथक काल मुंबईत दाखल झालं. दोन दिवसीय भेटी दरम्यान हे पथक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे.            

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल, असं आयोगानं कळवलं आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी नियमितीकरणासाठी ५० टक्के बेटरमेंट चार्जेस अर्थात विकास आकाराची सवलत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या सवलतीची मुदत येत्या ३० तारखेला संपणार होती. मात्र मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार २०० चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या निवासी वापराच्या भुखंडासाठी ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन संबंधित नागरिकांनी आपलं बांधकाम नियमित करून घेण्याचं आवाहन अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी केलं आहे.

****


 

स्वच्छता ही सेवा पंधरवड्या निमित्त धाराशिव तालुक्यातल्या सांजा इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकर भांगे यांनी या उपक्रमामुळे गावाचा स्वच्छतेकडून समृद्धीकडे प्रवास सुरू असल्याचं सांगत, अधिक माहिती दिली..

 

१७ सप्टेंबरपासून पूर्ण जिल्हाभरामध्ये उपक्रम राबवले जात आहेत. त्याच्यामध्ये एक पेड माँ के  नाम, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी,गावामध्ये स्वच्छतेचे जे कामं झालेले आहेत, त्या कामाचं उद्‌घाटन, त्याच्यामध्ये नागरिकांनी मोठ्या

प्रमाणावर सहभाग हा दैनंदिन उपक्रम राबवतोय. दोन ऑक्टोबर हा पूर्ण देशभरामध्ये स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व सहभागी व्यक्तींचा अशा कुटुंबाचा सत्कार सोहळा,त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव सुद्धा करणार आहे.

****

स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत काल छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं हर्सुल कचरा प्रकल्पाचा ठिकाणी नागरिकांना कचरा व्यवस्थापन या विषयीची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना स्वच्छता विषयक प्रतिज्ञा देण्यात आली.

****

लातूर इथं “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत काल नेहरू युवा केंद्र आणि दयानंद कला महाविद्यालय यांच्यावतीने स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात नुक्कड नाटक, स्वच्छता फेरी, भित्तीलेखन, आदी उपक्रम राबवले जात आहेत.

****

भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारत पहिली कसोटी जिंकत मालिकेत एक शुन्यनं आघाडीवर आहे. या सामन्यासाठी पहिल्या कसोटीचा संघ भारतानं कायम ठेवला आहे.

****

राज्याच्या बहुतांश भागात कालही पाऊस झाला, अनेक भागात हवामान विभागानं अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना आज रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाचे १८ दरवाजे आता दीड फुटाने उघडून, सुमारे २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

लातूर जिल्ह्यात मांजरा धरणाच्या सहा दरवाजातून तीन हजार ४९४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर रेणापूर मध्यम प्रकल्पाचे ४ दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून, नदीपात्रात एक हजार २५८ घनफुट प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे.  लातूर-धाराशिव सीमेवर माकणी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे आठ दरवाजे काल बंद करण्यात आले, सध्या सहा दरवाजातून दोन हजार २९० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

****

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन महाशक्ती या राज्यातल्या तिसऱ्या आघाडीचा पहिला संयुक्त मेळावा काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला. स्वराज पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटेचे राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

****


 

तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या एक हजार ९९९ कोटी रुपयांचा विकास आराखडा अंतिम करण्यात आला आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रस्तावास पुढील दहा दिवसात मंजुरी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

No comments: