Thursday, 26 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 September 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

संयुक्त राष्ट्र संघासह बहुराष्ट्रीय विकास बँकांच्या पुनर्रचनेची आवश्यकता भारतानं व्यक्त केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी न्यूयॉर्क इथं जी-20 शिखर परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ही भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्र संघटना आजही भूतकाळातच रममाण असून, संघटनेनं जगासोबत विकसित होण्याची गरज असल्याचं, जयशंकर यांनी नमूद केलं. जुन्याच संरचनेत अडकून पडल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य राखण्यात संयुक्त राष्ट्र अपयशी ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भेदभावरहित मुक्त आणि पारदर्शक अशा बहुराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेचं भारत समर्थन करत असल्याचं, जयशंकर यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या बिडकीन औद्योगिक वसाहतीसह देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.

****

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांच्या वर पोहोचला असून, धरणातून होणार्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून, सुमारे ५६ हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

****

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काल सर्वाधिक ७१ मिलिमीटर पाऊस खेडमध्ये पडला. हळव्या म्हणजे लवकर तयार होणाऱ्या जातीची भातपिकं तयार झाली असून, त्यासाठी असा मोठा पाऊस नुकसानकारक ठरत असल्याचं आमच्या वार्तहारानं कळवलं आहे.

****

पोषण जनजागृती संदर्भातील विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल राहिला असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल 'पोषण भी, पढाई भी' या राज्यस्तरीत परिसंवादात त्या बोलत होत्या. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण, आहार आणि शिक्षण देणं हा 'पोषण भी, पढाई भी' या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यावेळी उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्य शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून, केंद्र शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती तटकरे यांनी, केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्याकडे केली.

****

'स्वच्‍छता ही सेवा' पंधरवड्यात सफाईमित्र सुरक्षा अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मित्रांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. यामध्ये साडे तीन हजाराहून अधिक स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात रक्तदान शिबीराचंही आयोजन करण्यात आलं होतं. 

****

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचं आज नागपुरात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते यकृताच्या आजारावर उपचारासाठी रुग्णालयात उपचार घेत होते. केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. विद्यार्थी हिताला प्राधान्य देणारे मृदुभाषी कुलगुरू म्हणून ते कायम स्मरणात राहतील असं गडकरी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून अयोध्येसाठी २८ सप्टेंबरला निघणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. राज्यात सर्व धर्मियांच्या ६० वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जात आहे.

****

छत्रपती संभाजी नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळं या पाणवनस्पती पासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पर्यावरण पूरक अशा या प्रयोगाचे पेटंट देखील त्यांनी मिळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शंभर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...