Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 September 2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा रविवारी २९
सप्टेंबरला पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं दूरदृश्य
प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भुमिपूजनही
यावेळी होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. मुसळधार
पावसामुळे पंतप्रधानांचा कालचा पुणे दौरा रद्द करण्यात आला होता.
दरम्यान, पंतप्रधान मोदी परवा रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा चौथा भाग
आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सातव्या राष्ट्रीय
पोषण महिना उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत नऊ कोटी ६८ लाखांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन
केलं आहे. यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या अभियानात महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली. पौष्टिक
आहाराबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यावर भर देणारे उपक्रमही
राबवल्याची मंत्रालयानं दिली आहे.
****
देशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत ऐंशी कोटीं
रोपांची लागवड करण्याचं उद्दीष्ट पूर्ण केलं असल्याचं पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं
आहे. ३० सप्टेंबर या अंतिम मुदतीच्या आधी हे लक्ष्य गाठले असल्याचं मंत्रालयानं नमूद
केलं. यात उत्तर प्रदेश सरकारने सर्वाधिक २६ कोटी रोपांची लागवड केली आहे.
****
जागतिक पर्यटन दिन आज साजरा केला जात आहे. लोकांना परस्परांशी
जोडण्यामध्ये आणि अर्थव्यवस्थांना चालना देण्यामध्ये पर्यटनाची असलेली भूमिका अधोरेखित
करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. ‘पर्यटन आणि शांतता’ ही यंदाच्या पर्यटन
दिनाची संकल्पना आहे. भविष्यातल्या पिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाला
चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. पर्यटन मंत्रालयातर्फे आज नवी दिल्ली विशेष कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं असून, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन
झालं.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं
आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी खुलं आहे.
****
देशात कापसाच्या उत्पादनात पुढच्या वर्षी किमान एक हजार
किलो प्रति हेक्टरने वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं.
ते आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्या देशातल्या कापसाचं उप्पादन साडेचारशे
किलो प्रति हेक्टर असून, ते अमेरिका, रशिया, चीन, ब्राझील या देशात होणाऱ्या दोन हजार ते दोन हजार दोनशे किलो
प्रति हेक्टर उत्पादनापेक्षा कमी असल्याचं सिंह यांनी सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ‘महाविजय
संवाद’ या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या युवा सेना, महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या तीन विभागांकडून
राज्यभरात हे अभियान राबवलं जाणार आहे.
****
माजी मंत्री तथा काँग्रेचे ज्येष्ठ नेते रोहिदास चुडामण
पाटील यांचं आज धुळे इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. पाटबंधारे आणि अन्य खात्याचं मंत्रिपद
भूषवलेल्या रोहिदास पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अक्कलपाडा आणि अन्य प्रकल्प पूर्णत्वास
नेले. काँग्रेस पक्षातही अनेक पदं त्यांनी भूषवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
होणार आहेत.
****
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आज परभणी महानगरपालिकेच्या
वतीनं शहरात जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आलं. या पथनाट्यातून ओला कचरा सुखा कचरा
विलागिकरण, आपला कचरा आपली जबाबदारी याबाबत
जनजागृती करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेच्यावतीनं विविध माहिती फलक लावण्यात आले
होते.
****
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत २०२३-२४
या शैक्षणिक वर्षात राज्यातल्या सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी
घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातल्या उदयनगर
बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
येत्या रविवारी पुण्यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात
शाळेला सन्मानित करण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भूवन कला आणि वाणिज्य
महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे उद्या २८ तारखेला सुरमणी पंडित उत्तमराव अग्निहोत्री
स्मृति संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आलं आहे. या समारोहात सुप्रसिद्ध संवादिनी वादक
आणि पंडित उत्तमराव अग्निहोत्री यांचे नातू ओंकार अग्निहोत्री यांचं सादरीकरण होणार
आहे.
****
भारत आणि बांग्लादेशदरम्यान दुसरा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आजपासून कानपूर इथं सुरु
झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. उपाहारापर्यंत बांग्लादेशच्या
दोन बाद ७४ धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment