Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 September
2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत
आहे. लोकांना परस्परांशी जोडण्यामध्ये आणि अर्थव्यवस्थांना चालना देण्यामध्ये पर्यटनाची
असलेली भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. ‘पर्यटन आणि शांतता’
ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. भविष्यातल्या पिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि
न्याय्य पर्यटन उद्योगाला चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. पर्यटन मंत्रालयातर्फे
आज नवी दिल्ली विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज आणि
उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं
आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी खुलं आहे.
****
गेल्या काही वर्षात नवोन्मेष क्षेत्रात
केलेल्या प्रगतीमुळे भारतानं, यंदाच्या जागितक नवोन्मेष निर्देशांक
म्हणजेच जीआयआय २०२४ मध्ये १३३ देशांत ३९ व्या स्थानावर झेप घेतली आहे. २०१५ मध्ये
८१ व्या स्थानावर असलेल्या भारताची ही लक्षणीय झेप आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री
पीयूष गोयल यांनी याबाबत समाज माध्यमावरून एक संदेश प्रसारित केला आहे. भारतानं मध्य
आणि दक्षिण आशियातल्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत पहिल्या
क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतानं एक हजार ६३३ कोटी लिटर इतकी
उच्चांकी इथेनॉल निर्मिती केली असल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत भारतीय साखर आणि जैव उर्जा परिषदेचं
उद्धाटन करताना बोलत होते. २०३० पर्यंत पाच टक्के बायोडिझेलचं लक्ष्य सरकारनं निश्चित
केलं असल्याचं, त्यांनी सांगीतलं.
****
आधार आणि पॅनकार्डचे तपशील सार्वजनिक
करून नागरिकांची ओळख उघड करणाऱ्या काही संकेतस्थळांवर, केंद्र सरकारनं प्रतिबंध
लावले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही कारवाई केली. आधार कायदा २०१६ च्या
कलम २६ (४) नुसार आधारकार्डवरील माहिती सार्वजनिक करण्यावर प्रतिबंध आहेत. याचे उल्लंघन
संकेतस्थळाकडून झाल्याची तक्रार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं दाखल केली होती.
****
देशातली ५९ हून अधिक औषधं गुणवत्ता
निकषांवर दर्जेदार नसल्याचा अहवाल केंद्रीय औषध नियामक संस्थेनं दिला आहे. त्यात पॅरासीटमॉल, व्हिटॅमिन बी,
कॅल्शियम आणि विटामिन
डी 3 प्रकारातल्या औषधांचा समावेश आहे.
****
२०३० पर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जेचं
उत्पादन करण्याच्या दिशेने राज्य शासनानं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, असं उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. मुंबईत काल हरित ऊर्जा क्षेत्रातल्या चार कंपन्यांसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
करण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते. ४७ हजार ५०० कोटी रुपयांच्या या
सामंजस्य करारामुळे १८ हजार ८२८ रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
यंदाच्या खरीप हंगामात कांदा पिकाचं
क्षेत्र, अंदाजे उत्पादन तसंच बाजारांमधील आवक, बाजारभाव आणि निर्यातविषयक धोरण याबाबत शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या
अडीअडचणी जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकानं काल नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव तसंच सोलापूर
बाजार समितीला भेट दिली. यावेळी पथकाने बाजार समितीचे सदस्य शेतकरी प्रतिनिधी व्यापारी
प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला आणि गेल्या पाच वर्षात कांद्याची आवक, बाजारभाव, निर्यात यांची माहिती जाणून घेतली.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
विविध जिल्हा प्रशासनांनी प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ केला आहे. काल बीड तसंच परभणी
इथं यानिमित्तानं कार्यशाळा घेण्यात आली. संबंधित जिल्ह्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी
या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात
आला आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात 'ऑपरेशन फ्लश आऊट'
अंतर्गत अवैध व्यवसाय
करणाऱ्या ७५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन सव्वा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्टपासून
'ऑपरेशन फ्लश आऊट'
सुरू करण्यात आलं असून, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं
काल ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियाना अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील
आनंदधाम, मार्केट यार्ड परिसर तसंच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी स्वच्छता केली.
****
भारत आणि बांग्लादेशदरम्यान दुसर्या
आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आजपासून कानपूर इथं सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून
प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
****
No comments:
Post a Comment