Monday, 30 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा काहीही पुरावा नाही- सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

·      देशी गायीच्या संवर्धनासाठी राज्य मंत्रिमंडळाचा देशी गाईला राज्यमाता दर्जा देण्याचा निर्णय

·      लातूर जिल्ह्यात चार कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता तर परळी इथं तीस हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

·      एक पेड मां के नाम उपक्रमात छत्रपती संभाजीनगर इथं खाम नदी परिसरात एक हजार देशी झाडांची लागवड

आणि

·      पावसामुळे तीन दिवस वाया जाऊनही भारत-बांगलादेश कसोटी रंगतदार टप्प्यावर

****

तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा अद्याप काहीही पुरावा नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या लाडू प्रसादात कथितरीत्या प्राणिज चरबीचा वापर झाल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने, या संदर्भात विचारणा केली असता, मंदिर व्यवस्थापनाच्या वकिलांनीही या अनुषंगाने तपास करावा लागेल, असं सांगितलं. लाडूत प्राणिज चरबीच्या भेसळीबाबत खात्री होण्यापूर्वीच आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत विधान करण्याची आवश्यकता नव्हती, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने जबाबदारीने वागावं, आणि देवाला राजकारणापासून दूर ठेवावं, असं मतही न्यायालयानं नोंदवल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या तीन तारखेला होणार आहे.

****

राज्य शासनानं देशी गाईला राज्यमाता हा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशी गाय ही शेतकऱ्यांसाठी वरदान असल्यानं, हा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले

देशी गाईंचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांझरपोळा आहे, ज्याठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गाईच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे.

 

गोशाळांना देशी वंशाच्या गायीसाठी प्रति गाय- प्रति दिन ५० रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचं, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. सदर योजना कायमस्वरूपी असून या योजनेमुळे गोशाळांवरचा आर्थिकभार कमी होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

****

२०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला या बैठकीतून प्रारंभ करण्यात आला. पाच हजार रुपये प्रति हेक्टर, याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.

****

लातूर जिल्ह्यातल्या हासाळा, उंबडगा, पेठ आणि कव्हा, इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात तीस हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट तर नाशिक जिल्ह्यात मालेगाव जवळ सुमारे सहा हेक्टर क्षेत्रात डाळिंब इस्टेट उभारण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी ९८ कोटी रुपये निधीची तरतूद केल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

याशिवाय, राज्य जलसंपत्ती माहिती केंद्राची स्थापना, मुद्रांक अधिनियमात सुधारणा, बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात वनार्टी ची स्थापना, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ तसंच श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ, ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन तसंच प्रोत्साहन अनुदान, राज्यात चार हजार आठशे साठ विशेष शिक्षक पदांची निर्मिती, अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवणं, होमगार्डच्या भत्त्यांत भरीव वाढ, तसंच राज्यातल्या सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला.

नाशिकचं वैद्यकीय पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेण्याचा तसंच आयुर्वेदिक आणि युनानी महाविद्यालयांमधल्या पदभरतीसाठी निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं आज स्वीकारला.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. २६ सप्टेंबरला सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

****

संघटित सायबर गुन्हे प्रकरणी केंद्रीय अन्वेषण संस्था-सीबीआयनं सव्वीस जणांना अटक केली आहे. यापैकी १० जणांना पुणे, जणांना हैदराबाद तर ११ जणांना विशाखापट्टणममधून अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपींकडून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणं, ५८ लाख ४५ हजार रुपये रोख रक्कम आणि तीन वाहनं जप्त करण्यात आली आहेत.

****

चित्रपट क्षेत्रातला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना जाहीर झाला आहे. येत्या आठ ऑक्टोबरला ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात मिथून चक्रवर्ती यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे संयुक्तपणे स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत एक पेड मां के नाम उपक्रमात खाम नदी परिसरात एक हजार देशी झाडं लावण्यात आली. यावेळी खाम नदी काठाची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून सुमारे अडीचशे ते तीनशे किलो कोरडा कचरा गोळा करण्यात आला. उपायुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी उपस्थितांना पर्यावरणाचं महत्त्व समजावून सांगितलं.

****

भारत-बांगलादेश कसोटी रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. पहिल्या तीन दिवसाचा खेळ पावसामुळं वाया गेल्यानंतर, चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. भारतीय संघानं पहिल्या डावात जलद धावा करत ३५ षटकांत ९ बाद २८५ धावांवर डाव घोषीत केला. यशस्वी जयस्वालनं ७२, तर के एल राहुलनं ६८ धावा केल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा बांगलादेशच्या दुसऱ्या डावात दोन बाद २६ धावा झाल्या होत्या. बांगलादेश अजूनही २६ धावांनी पिछाडीवर आहे.

****

भारतीय आरोग्य प्रणालीचा दृष्टिकोन केवळ शारिरीक आरोग्यापर्यंत मर्यादित नसून त्यात मानसिक आणि अध्यात्मिक आरोग्याचाही समावेश आहे, यामुळेच भारताला जगाच्या आरोग्य पर्यटन क्षेत्रात विशेष स्थान मिळाल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिटचं उद्घघाटन आज मुंबईत त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य पर्यटनातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं जाधव यांनी सांगितलं. ते म्हणाले

विदेशामधल्या लोकांना आयुर्वेदाबद्दल खूप ॲट्रॅक्शन आहे. आयुर्वेदमध्ये उपचार करण्याच्या संदर्भातही त्या लोकांच्या मनामध्ये खूप उत्सुकता आहे. आणि म्हणून त्या लोकांना सहजतेनं आपल्या देशामध्ये कसं येता येईल, त्यांना चांगल्या पद्धतीनं कसे उपचार होतील, आणि त्याच्यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा कसा हातभार लागेल, या सगळ्या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे.

****

भगवान गौतम बुद्ध यांच्या महाराष्ट्रातल्या सर्व स्थळांना भेटी देऊन त्यांचा विकास करणार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यक मंत्री किरण रिजिजू यांनी आज म्हटलं आहे. रिजिजू यांनी आज मुंबईत दादर इथे चैत्यभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, त्यावेळी ते बोलत होते

****

तारांगण, ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याला या वर्षी शंभर वर्षं पूर्ण होत आहेत, या निमित्तानं जागतिक स्तरावर ‘शंभर तास खगोलशास्त्र-तारांगणाची शंभर वर्षं हा उपक्रम आयोजित केला आहे. यात जगभरातल्या चार हजार तारांगणांचा सहभाग राहणार असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशनच्या डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम खगोल अंतराळविज्ञान केंद्राचा समावेश आहे. या उपक्रमानिमित्त या केंद्रात येत्या दोन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत अंतराळ विज्ञान विषयक माहितीपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यात उदगीर इथं दाखल झाली. या यात्रेसाठी अजित पवार यांचं आज दुपारी लातूर विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते उदगीरला पोहोचले. उदगीरमध्ये दुचाकी फेरीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं.

****

अमरावती जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक दोन इतकी नोंदली गेली. या भूकंपाचं केंद्र अमरावती जिल्‍हयातल्या चिखलदरा तालुक्‍यातल्या अमझरी आणि टेटु या गावांदरम्यान होतं. अकोला जिल्ह्यातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे.

****

No comments: