Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 September
2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
केंद्र सरकारचा
चित्रपट क्षेत्रातला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मिथून
चक्रवर्ती यांना जाहिर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
यांनी समाजमाध्यमांवरुन ही माहिती दिली. येत्या आठ ऑक्टोबरला ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात
मिथून चक्रवर्ती यांना गौरवण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या आधार
संलग्न बँक खात्यांची पडताळणी झालेल्या ६५ लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालं असून, या अर्थसहाय्याचे
वितरण डीबीटी प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात आजपासून करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी काल मुंबईत राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ही माहिती
दिली. वर्ष २०२० ते २०२२ च्या ४४८ राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण यावेळी राज्यपाल
सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असताना
शेतकरी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करत असल्याचं प्रकर्षाने दिसलं, उत्पादन वाढीसाठी बळीराजा करत असलेलं
कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच
समाज, राज्य आणि देश उभा राहतो, त्यांच्याशिवाय
देशाला भविष्य नाही, असंही राज्यापालांनी नमूद केलं.
****
मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. २६ सप्टेंबरला
सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपये जमा करण्यात
आले आहेत. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली.
लाभ हस्तांतरणाची ही प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, सर्व पात्र भगिनींना
लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना
आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात
आले असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
स्वच्छता ही सेवा
पंधरवडा अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.
परभणी महानगरपालिका
आणि विविध सामाजिक संस्थेच्या वतीनं आज स्वच्छता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. महानगरपालिका
आयुक्त धैर्यशील जाधव यांनी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या सहा किलोमीटर स्वछता
दौडला सुरुवात झाली. आरोग्यासोबत पर्यावरण आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींचा संदेश
यामधून देत नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, तसंच लहान मुलांनाही
आतापासूनच स्वच्छतेचं महत्त्व समजण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं जाधव यांनी
सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांसह नागरीक मोठ्या संख्येनं या दौड मध्ये सहभागी झाले
होते.
****
परभणी इथं कालही
सारंग स्वामी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी परिसरातून जनजागृती रॅली काढून नागरिकांचे
लक्ष वेधून स्वच्छतेचा संदेश दिला. यासोबतच जेवणापूर्वी हात धुण्याचे प्रात्यक्षिक
आणि वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगर
महानगरपालिका आणि संत निरंकारी भवन मंडळाच्या वतीने काल शहरातल्या एन - आठ परिसरात
स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता अभियानात जमा झालेला कचरा महानगरपालिका
घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रावर पाठवण्यात आला.
****
शीव पनवेल महामार्ग
आणि ठाणे बेलापूर मार्ग इथं काल ‘महास्वच्छता मोहीम’ राबवण्यात आली. स्वच्छता मित्रांसोबत
महापालिका आधिकारी, कर्मचारी आणि नानासाहेब धर्माधिकारी
प्रतिष्ठानचे सदस्य या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. स्वच्छता पंधरवड्याचा भाग
म्हणून ठाणे महापालिकेने काल स्वच्छता सायक्लोथॉन रॅली काढली.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात
वेंगुर्ले नगरपरिषदेनं काल स्वच्छता मोहिम राबवून दोन टन कचरा संकलित केला. तर नागपूर
महानगरपालिकेनं राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरीकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला
होता.
****
आदिवासी समाजाच्या
आरक्षणात धनगर समाज आणि इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करू नये, यासाठी सरकारच्या
निषेधार्थ आदिवासी समाजाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा इथं रास्ता रोको
आंदोलन सुरू केलं आहे. माजी आमदार डॉ. संतोष टारफे, आदिवासी युवक
कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष
डॉ. सतीश पाचपुते
यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, जवळपास दीड तासापासून
नांदेड - नागपूर आणि नांदेड - अकोला हा मार्ग अडवण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या
दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय व्हॉलिबॉल
महासंघाच्या वतीने अहमदनगर इथं पहिली राष्ट्रीय 3A साईड राष्ट्रीय
व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पुरुष आणि महिला विभागात तेलंगणा संघाने विजेतेपद
पटकावून दुहेरी मुकुट प्राप्त केला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह दहा राज्यातून १५०
खेळाडू सहभागी झाले होते.
****
हॉकी इंडिया कनिष्ठ
महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२४च्या १४व्या आवृत्तीला आजपासून झारखंडमधल्या
रांची इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धेत २६ संघ सहभागी होत असून, प्रत्येक गटातले
अव्वल संघ उपान्त्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाच्या
१८ दरवाजातून सध्या २४ हजार १०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात
येत आहे.
****
No comments:
Post a Comment