Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 September 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली
आज न्यूयॉर्कमध्ये बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या बिमस्टेक सदस्य
देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अनौपचारिक बैठक झाली. या नेत्यांच्या आगामी शिखर बैठकीच्या
तयारीबाबत या बैठकीत चर्चा झाली. आरोग्य, अन्न सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि ऊर्जा या क्षेत्रात भारतासोबत परस्पर सहकार्याचाही
यावेळी जयशंकर यांनी आढावा घेतला.
या बैठकीत क्षमता निर्माण, कौशल्य विकास आणि लोक संबंध सुधारण्यासाठी संधी शोधण्यावर तसंच
प्रदेशातील भौतिक, सागरी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी
सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं असं, डॉ. जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी
भारताच्या मागणीला ब्रिटनने पाठींबा दिला आहे. अमेरिका, फ्रान्सनंतर आता ब्रिटन भारताला पाठींबा देणारे तिसरे राष्ट्र बनले आहे. न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्र
महासभेच्या ७९ व्या सत्राला संबोधित करताना ब्रिटनचे पंतप्रधान केईर स्टारर यांनी हा
पाठींबा दिला आहे. त्यांनी भारतासोबतच आफ्रिका, ब्राझील, जपान आणि जर्मनीलाही सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व द्यावं, असं म्हटलं आहे.
****
भारतामध्ये मंकीपॉक्स क्लेड वन - बी या विषाणूचा संसर्ग
झालेला एक नवा रुग्ण आढळला असल्यानं अशा प्रकारातील रुग्ण आढळलेला भारत हा आफ्रिकेबाहेरील
तिसरा देश ठरला आहे. या रोगाचा अफ्रिका खंडातील देशांमध्ये मोठ्याप्रमाणात फैलाव झाला
असून तिथं रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत
आहे. रुग्णांचा शोध, संपर्कातील व्यक्तींचा शोध, लागण झालेल्यांवर योग्य उपचार या अनुषंगानं दुरस्थ पद्धतीनं
या एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान, भारतात या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य
आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत तसंच राज्ये आणि केंद्रशासित
प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. विषाणूच्या प्रादुर्भाव- प्रसारावर लक्ष
ठेवणं, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधांसह
अलगीकरणाची सोय उपलब्ध करणं, या बाबींकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष देण्याचे निर्देशही आरोग्य
मंत्रालयानं दिले आहेत.
****
थोर क्रांतीवीर भगतसिंह यांची आज जयंती. यानिमित्त पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी भगतसिंह यांना अभिवादन केलं. मातृभुमीचं रक्षण आणि सन्मानासाठी
त्यांनी आपले प्राण अर्पण केले, असं समाजमध्यमावरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आपल्या संदेशात भगतसिंह यांनी दुर्र्दम्य धैर्यानं
ब्रिटीश राजवटीला आव्हान देत देशाच्या स्वातंत्र्य आणि सुवर्ण भविष्यकाळासाठी प्राणार्पण
केल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, आज भारतरत्न गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांचाही जन्म दिवस
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लता मंगेशकर या त्यांनी गायलेल्या भावपूर्ण गीतांमुळे लोकांच्या
हृदयात नेहमीच आपलं स्थान अढळपणे राखतील असं नमूद केलं आहे.
****
भारतीय सैन्याचा तोफखाना विभाग - आर्टिलरी ब्रिगेडतर्फे
सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी छत्रपती संभाजीनगर इथं निवृत्तीवेतन
विषयक स्पर्श - सिस्टम फॉर पेंशन एडमिनिस्ट्रेशन - रक्षा हा उपक्रम घेण्यात आला. देशाचे
खरे नायक असलेल्या भारतीय सैन्यातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे हक्कांचे
लाभ वेळेवर प्राप्त होण्याच्या उद्देशानं याचं आयोजन करण्यात आलं.
या अंतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सैन्यदलातील
जवान, शहिदांच्या वीरपत्नी, त्यांचे वीर पालक अशा दोन हजारांहून जास्त जणांनी यात
सहभाग नोंदवला. सैनिकांचं निवृत्ती वेतन, बँकींग प्रणाली आणि
शासनाच्या योजना आणि संबंधितांच्या विविध समस्या याबाबत उपक्रमातून मार्गदर्शन
करण्यात आलं.
****
परभणी इथं आज स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन
रॅली काढण्यात आली. महापालिकेसह सायकलिस्ट
ग्रुप आणि प्रभावती ग्रुप यांच्यातर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विविध
शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, अन्य नागरिक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फुर्त
प्रतिसाद नोंदवला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उत्कृष्टता केंद्र अर्थात सेंटर
ऑफ एक्सलेंस अंतर्गत नेत्ररोग निदान आणि उपचार केंद्र निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील
असल्याचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल
माधुरी कानिटकर यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डाक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विलास वांगीकर, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीचे
अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी सुरु असणाऱ्या
उपक्रमांचं राज्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत असून त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग
लक्षणियरीत्या वाढत असल्याचं कानिटकर यांनी नमूद केलं.
****
भारत-बांगलादेशदरम्यान कानपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या
क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा आज पहिल्या सत्राचा खेळ पावसामुळं होऊ शकला नाही आणि आद्याप ही सामन्यावर पावसाचं सावट कायत आहे.
****
No comments:
Post a Comment