Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 September
2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदमध्ये
कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला ब्रिटनने पाठींबा दिला आहे. अमेरीका, फ्रान्सनंतर आता ब्रिटन पाठींबा देणारे तिसरे राष्ट्र बनले आहे.
न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७९ व्या सत्राला संबोधित करताना ब्रिटनचे
पंतप्रधान केईर स्टारर यांनी हा पाठींबा दिला आहे. त्यांनी भारताव्यतिरिक्त आफ्रिका, ब्राझील, जपान आणि जर्मनीलाही सुरक्षा परिषदेत
कायमस्वरूपी सदस्यत्व द्यावं, असं म्हटलं आहे.
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे
यांनीही भारताला सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य देण्याबाबत मागणी केली आहे. त्यांनी दक्षिण
आशियायी देशांत महत्त्वपूर्ण आर्थिक वाढ आणि नेतृत्वासाठी भारत सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी
सदस्यत्वासाठी पात्र असल्याचं म्हटलं तसंच सुरक्षा परिषद अधिक प्रातिनिधिक आणि कार्यक्षम
करण्यावर भर देत विकासातील भागीदारीबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले. या आठवड्याच्या
सुरुवातीला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन
यांनीही सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याबाबतच्या मागणीला पाठिंबा
दिला होता. सध्या सुरक्षा परिषदेतमध्ये पाच स्थायी सदस्य आणि 10 अस्थायी सदस्य आहेत. तर तात्पुरते सदस्य दोन वर्षांसाठी निवडले जातात.
****
दरम्यान, न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात आज परराष्ट्रव्यवहार
मंत्री डॉक्टर एस. जयशंकर संबोधित करणार आहेत, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी
केलेल्या तथ्यहीन आरोपांनाही ते यावेळी उत्तर देणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात
आज सकाळी सुरक्षा दल आण दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या परिसरात दहशतवादी आल्याचं समजताच
सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकानं वेढा घालून शोध मोहीम राबवली. यादरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दलाकडूनही
प्रत्युत्तर देण्यात आलं असून शोधमोहीम अद्यापही सुरू आहे.
****
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंकीपॉक्स
विषाणूच्या संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश
दिले आहेत. भारतात मंकीपॉक्स क्लेड वन - बी चा नवीन रुग्ण आढळला आहे, त्यामुळं अशा प्रकारातील रुग्ण आढळलेला भारत हा आफ्रिकेबाहेरील
तिसरा देश ठरला आहे.
****
पंतप्रधान उद्या आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी
अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा
निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानं काल विविध
राजकीय पक्षांसोबत तसंच ठाणे, पुणे, पालघर आणि मुंबईसह विविध
जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
दरम्यान, आज उर्वरित विभागांचा आढावा घेतला जाणार असल्याचं या वृत्तात
म्हटलं आहे.
****
लातूर इथं मालमत्ता कर भरणा करण्यासाठी
थकबाकीदारांना पुन्हा एकदा शंभर टक्के शास्ती माफीसह आजच्या दिवशी सर्व क्षेत्रीय कर
संकलन केंद्र सुरू असणार आहे. तसंच ऑनलाईन पध्दतीनं m c latur.org , LaturProperty Tax सिटीझन अॅप किंवा propertytax.m c latur. in या संकेतस्थळावर नागरिकांना आज कर भरणा करता येणार आहे. कर भरणा करुन शहर विकासात हातभार
लावण्याचं आवाहन महापालिका उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसोळे यांनी केलं आहे.
****
आज आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार
दिन साजरा होत आहे. आज शासकीय सुटी असल्यानं नांदेड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयात
या दिनानिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत
प्राप्त अर्जांची कार्यवाही तत्परतेनं करणं आवश्यक असल्याचं या कायद्याचे अभ्यासक अभिवक्ता
डॉक्टर भीमराव हाटकर यांनी या वेळी केलेल्या भाषणात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती
भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे आज सुरमणी पंडित उत्तमराव
अग्निहोत्री स्मृति संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या समारोहात प्रसिद्ध संवादिनी
वादक आणि पंडित उत्तमराव अग्निहोत्री यांचे नातू ओंकार अग्निहोत्री यांचं सादरीकरण
होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाचे १८ दरवाजे आता दीड फुटाने
उघडून, सुमारे चौदा हजार ६७२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी
नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
उत्तर मध्य महाराष्ट्र , विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात आज तुरळक
ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
***
भारत-बांगलादेशदरम्यान कानपूर इथं
सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी ताज्या वृत्तानुसार, पहिल्या सत्राचा खेळ
कालच्या पावसामुळे काहीसा उशिरानं सुरु होत आहे.
काल पहिल्या दिवसाचा खेळ पाऊस आणि
पुरेशा प्रकाशाअभावी लवकर थांबवण्यात आला. बांगलादेश तीन बाद १०७ धावसंख्येच्या पुढे
खेळण्यास आता सुरुवात करणार आहे.
****
No comments:
Post a Comment