Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 September 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
२०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक
शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात
जमा करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये दोन
हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या
तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. २६ सप्टेंबरला सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या
खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. महिला आणि बालकल्याण मंत्री
अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. लाभ हस्तांतरणाची ही प्रक्रिया युद्धपातळीवर
सुरू असून, सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार
आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक
अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले असल्याचं
तटकरे यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारचा चित्रपट क्षेत्रातला प्रतिष्ठेचा दादासाहेब
फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना जाहिर झाला आहे. केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवरुन ही माहिती दिली.
येत्या आठ ऑक्टोबरला ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात मिथून चक्रवर्ती
यांना गौरवण्यात येणार आहे. आज वार्ताहरांशी बोलताना मंत्री वैष्णव यांनी मिथून चक्रवर्ती
यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले,
Byte...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमध्यमावरून मिथुन चक्रवर्ती यांचं हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, असं सांगत, हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबाला आणि जगभरातल्या माझ्या चाहत्यांना
समर्पित करत आहे, अशी प्रतिक्रिया मिथुन
चक्रवर्ती यांनी आहे.
****
तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जगभरात सायबर गुन्हे करणाऱ्या
गुन्हेगारांच्या जाळ्यातल्या सव्वीस व्यक्तींना केंद्रीय अन्वेषण संस्था-सीबीआयनं अटक
केली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयनं या महिन्याच्या सव्वीस तारखेला देशभरातल्या
बत्तीस ठिकाणी एकाच वेळी छापे घालत ही कारवाई केली. यामध्ये पुण्यातल्या दहा जणांसह
हैदराबाद आणि विशाखापट्टणम् इथल्या व्यक्तींचा समावेश आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे
हे गुन्हेगारी जाळं उध्वस्त झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी
स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.
परभणी महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थेच्या वतीनं
आज स्वच्छता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी
यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या सहा किलोमीटर स्वछता दौडला सुरुवात झाली. आरोग्यासोबत
पर्यावरण आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींचा संदेश यामधून देत नागरिकांमध्ये स्वच्छतेची
जनजागृती व्हावी, तसंच लहान मुलांनाही
आतापासूनच स्वच्छतेचं महत्त्व समजण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं जाधव यांनी
सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांसह नागरीक मोठ्या संख्येनं या दौड मध्ये सहभागी झाले
होते.
****
आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाज आणि इतर कोणत्याही
समाजाला समाविष्ट करू नये, यासाठी सरकारच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या वतीने हिंगोली
जिल्ह्यातल्या वारंगा फाटा इथं रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. माजी आमदार डॉ. संतोष
टारफे, आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष
डॉ. सतीश पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, नांदेड - नागपूर आणि नांदेड - अकोला हे मार्ग अडवण्यात
आले आहेत.
****
पेरू देशातल्या लीमा इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय
नेमबाजी क्रीडा महासंघ कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गौतमी भानोत आणि
अजय मलिक या जोडीनं एअर रायफल मिश्र प्रकारात, तर लक्षिता आणि प्रमोदच्या जोडीनं एअर पिस्तूल मिश्र प्रकारात
कांस्यपदक जिंकलं. या पदकांसोबतच भारतानं या स्पर्धेतलं आपलं पहिलं स्थान कायम राखलं
आहे. भारताकडे दोन सुवर्ण आणि तीन कांस्य अशी पाच पदकं आहेत.
****
No comments:
Post a Comment