Monday, 30 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 September 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      बिडकीन औद्योगिक वसाहतीसह राज्यातल्या ११ हजार २०० कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

·      मेक इन इंडिया अभियानामुळे भारत जगातलं महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनला असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन

·      औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आजपासून युवतींसाठी मोफत स्वरक्षणाचं प्रशिक्षण

आणि

·      मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट

सविस्तर बातम्या

छत्रपती संभाजीनगर नजिकच्या ऑरिक-बिडकीन औद्योगिक गुंतवणुकीच्या प्रकल्पातून मराठवाड्यातल्या युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं काल पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक जोडमार्ग विकास कार्यक्रमांतर्गत सात हजार ८५५ एकर जागेत या औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. मराठवाड्याला प्रमुख आर्थिक केंद्र बनवण्याची क्षमता बिडीकन औद्योगिक क्षेत्रात आहे, असं पंतप्रधान म्हणाले…

छत्रपती संभाजीनगर मे लगभग आठ हजार एकड में बिडकीन इंडस्ट्रीयल एरिया का विस्तार होगा। कई बडे बडे उद्योगों के लिये यहां जमीन ॲलॉट हो गई है। इससे यहां हजारों करोड का निवेश आयेगा। इससे हजारों युवाओं को रोजगार मिलेगा।

 

या कार्यक्रमात पुण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. आता पुण्याप्रमाणे संभाजीनगर इथं अनेक उद्योग येऊ घातले असून, त्याद्वारे स्थानिक पातळीवर अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातलं महायुती सरकार हे उद्योगांना भेडसावणारे प्रश्न तत्काळ सोडवत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण डुबे यांनीही या प्रकल्पातून होणाऱ्या रोजगारनिर्मितीबद्दल अधिक माहिती दिली.

या प्रकल्पामध्ये नऊ हजार एकशे बावीस कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही त्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी केली आहे. ६० हजार कोटी इतकी गुंतवणूक आता निर्माण होत आहे त्या नवीन नवीन प्रकल्पामुळे. ज्याद्वारे जवळपास ३५ हजार ही प्रत्यक्ष  रोजगार निर्माण होणार असून अप्रत्यक्ष रोजगार हा ७५ हजार निर्माण होणार आहे.

बिडकीन इथं झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड उपस्थित होते.

****

दरम्यान, पुणे इथं राज्यातल्या ११ हजार २०० कोटींहून अधिक रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं. पुण्यातल्या भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन, शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भुमिपूजन, तसंच सोलापूर विमानतळाचं उद्घाटन, यावेळी करण्यात आलं. 

****

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानामुळे काल भारत उत्पादनाचं केंद्र बनला असून, प्रत्येक क्षेत्रातली निर्यात वाढली असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून काल त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. भंडारा जिल्ह्यातल्या पारंपरिक रेशीम उद्योगाचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. स्वच्छता ही सेवा, एक पेड माँ के नाम, कॅच द रेन अशा उपक्रमांना देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. मन की बातच्या प्रवासाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी दूरदर्शन, प्रसारभारती तसंच आकाशवाणीशी जोडल्या गेलेल्या सर्वांची प्रशंसा केली.

दरम्यान, याबद्दल प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. दूरदर्शन, आकाशवाणी आणि प्रसारभारती या तीन्ही संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधानांचे शब्द प्रेरणादायी आहेत, असं सहगल म्हणाले.

****

सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातल्या काळोली इथं उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल तालुका बीज गुणन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. माती परीक्षण प्रयोगशाळा, धान्य आणि स्वच्छता प्रतवारी केंद्र, डाळ प्रक्रिया केंद्र, तेल घाणा केंद्र आणि भात प्रक्रिया केंद्राची त्यांनी पाहणी केली. पाटण इथल्या केंद्र पुरस्कृत अमृत नळ पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन आणि मल्हारपेठ इथल्या लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.

****

शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देणार्या

‘हर घर दुर्गा’ अभियानाचा शुभारंभ आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. मुंबईच्या कुर्ला इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेत यासाठी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

****


ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना अडकवणं हेच भाजपाचं धोरण असल्याची टीका, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर कडील तळ्याच्या पाळीवर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन काल ठाकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. त्याआधी ठाकरे यांनी नागपुरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

****

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी इथं काँग्रेस मेळाव्यात ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या लडाकी बहिण योजनेवर टीका केली.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत

****

माझी वसुंधरा अभियानाच्या चौथ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महापालिकेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. घनकचरा, वृक्षारोपण, शहराचं वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने केलेल्या कामाची दखल घेत हा पुरस्कार मिळाला असून, दीड कोटी रुपयांचं बक्षिस मिळालं आहे.

****

संविधान हातात घेऊन फिरणं म्हणजे संविधान वाचवणं नव्हे, असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं फुले-आंबेडकर विद्वत सभा आयोजित संविधान जागर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या काल बोलत होत्या. काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, संविधान बदलणारे कोण, आणि वाचवणारे कोण, याबाबत आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती चौक परिसरातून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.

****


नांदेड जिल्ह्यात नेरली इथं दूषित पाण्यामुळे उद्भवलेली परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी तात्काळ भेट देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाकडून गावात सर्वेक्षण केलं जात आहे. नागरिकांनी पाणी गाळून, उकळून प्यावं, मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे दिसताच तात्काळ आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य उपकेंद्राकडे संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या पार्डी मोड इथं भदंत महास्थवीर चंद्रमणी विपश्यना केंद्राचं भूमिपूजन काल झालं. पूज्य भदंत खेमोधम्मा, पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो, पूज्य भदंत डॉ. सत्यपाल, कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यावेळी उपस्थित होते. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विपश्यना उपयुक्त असल्याचं मत भदंत उपगुप्त महाथेरो यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत परभणी इथं सारंग स्वामी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी काल स्वच्छता मोहीम राबवली. तसंच विद्यार्थ्यांनी परिसरातून जनजागृती रॅली काढून नागरिकांचे लक्ष वेधून स्वच्छतेचा संदेश दिला. यासोबतच जेवणापूर्वी हात धुण्याचे प्रात्यक्षिक आणि वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले.

****

हवामान

मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये वादळी वार्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

****

No comments: