Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 27 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २७ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक
सूचना जारी
· विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राजकीय तसंच प्रशासकीय
आढावा बैठका
· राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा छत्रपती संभाजीनगर इथं अभिष्टचिंतन सोहळा
· जागतिक पर्यटन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा-रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला
कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर
आणि
· मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्य
फेरीत प्रवेश
****
मंकी पॉक्स या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय
आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विषाणूच्या
प्रादुर्भाव-प्रसारावर लक्ष ठेवणे, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा
तसंच विलगीकरणाच्या सोयी उपलब्ध करुन देणे, या
बाबींकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत.
****
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा रविवारी २९ सप्टेंबरला
पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे
लोकार्पण होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भुमिपूजनही यावेळी होणार
आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, पंतप्रधान परवा रविवारी आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या
आवृत्तीचा हा चौथा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११
वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा
घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानं आज विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा केली.
कोकण तसंच पुणे विभागीय आयुक्त, ठाणे, पुणे,
पालघर आणि मुंबई तसंच मुंबई उपनगरचे पोलिस आयुक्त तसंच अधीक्षक, तसंच ठाणे,
नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या
महापालिका प्रशासनाशी या पथकानं चर्चा करून आढावा घेतला. उर्वरित विभागांचा आढावा उद्या
घेतला जाणार आहे.
हे पथक दोन दिवसांच्या दौऱ्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातल्या विविध अधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या
अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत.
भाजपा आमदार विधिज्ञ आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे सूचना
मांडल्या आहेत. मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशीचा असू नये, प्रत्यक्षात बदली झालेल्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा अशा सूचनांचं पत्र
शेलार यांनी आयोगाकडे सादर केलं आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी
सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत
वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं आवाहन शासनानं केलं आहे.
****
देशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत ऐंशी कोटीं रोपांची
लागवड करण्याचं उद्दीष्ट पूर्ण केलं असल्याचं पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं आहे. ३०
सप्टेंबर या अंतिम मुदतीच्या आधी हे लक्ष्य गाठले असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं.
यात उत्तर प्रदेश सरकारने सर्वाधिक २६ कोटी रोपांची लागवड केली आहे.
****
माजी मंत्री तथा काँग्रेचे ज्येष्ठ नेते रोहिदास चुडामण पाटील
यांचं आज धुळे इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. पाटबंधारे
आणि अन्य खात्याचं मंत्रिपद भूषवलेल्या रोहिदास पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अक्कलपाडा
आणि अन्य प्रकल्प पूर्णत्वास नेले. काँग्रेस पक्षातही अनेक पदं त्यांनी भूषवली. त्यांच्या
पार्थिव देहावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रोहिदास पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख
व्यक्त केलं आहे.
****
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा छत्रपती
संभाजीनगर इथं आज पार पडला. बागडे यांनी नुकतेच ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं, त्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात
आला. यावेळी गृहनिर्माण, इतर मागास आणि बहुजन कल्याण
मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार विक्रम काळे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित
होते. बागडे यांनी समर्पित भावनेनं राष्ट्र निर्मितीसाठी केलेलं कार्य सर्वांसाठी दिशादर्शक
असल्याचे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले. बागडे यांच्या जीवन प्रवासावर आधारित 'माझा प्रवास' या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत आहे. ‘पर्यटन आणि शांतता’ ही
यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त नवी दिल्ली पर्यटन मंत्रालयातर्फे
घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते
करण्यात आलं.
पर्यटन मंत्रालयाच्या महासंचालक मुग्धा सिन्हा यांनी या निमित्तानं
आकाशवाणीला विशेष मुलाखत दिली, जागतिक पातळीवर शांती आणि समृद्धीसाठी
ग्रामीण पर्यटन तसंच महिला आणि युवा सक्षमीकरणावर भर देणाऱ्या पर्यटनाची आवश्यकता, मुग्धा सिन्हा यांनी व्यक्त केली.
****
केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेचे
निकाल आज जाहीर केले. विविध आठ श्रेणींमध्ये ३६ गावांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यामध्ये कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातल्या कर्दे
गावाला जाहीर झाला आहे. तर आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्राचा पुरस्कार गोव्यात फोंडा
तालुक्यातल्या बांदोरा गावानं पटकावला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथं पर्यटन विकास महामंडळाच्या
राष्ट्रकूट पर्यटक निवासाचं लोकार्पण पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीव्दारे
झाले. हेलीपॅड तसंच जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्र याठिकाणी उभारण्यात आलं आहे.
****
जागतिक पर्यटन दिना निमित्त छत्रपती संभाजीनगर इथं ‘शाश्वत पर्यटन
- एक सहयोग पूर्ण वाटचाल’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये भारतीय पुरातत्व
विभागाचे अधीक्षक डॉ.शिवकुमार भगत, पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालिका
जयदेवी पुजारी स्वामी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, पर्यटन मंत्रालयाच्या सहाय्यक संचालिका मालती दत्त यांनी ग्रामीण पत्रकारांशी संवाद
साधत पर्यटन वाढीसाठी सहायक बाबींवर चर्चा केली.
दरम्यान, जागतिक पर्यटन दिनानिमित्त वेरूळ
लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे. डॉ. भगत यांच्या
हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनात देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या
छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त स्वरुपातील माहिती चित्रफितींद्वारे देण्यात येत आहे.
हे प्रदर्शन उद्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी
खुलं आहे.
****
कानपूर इथं सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेशदरम्यान दुसऱ्या
क्रिकेट कसोटी सामन्यात आज पहिला दिवसाचा खेळ पाऊस आणि पुरेशा प्रकाशाअभावी लवकर थांबवण्यात
आला. बांगलादेशनं दिवसअखेर तीन बाद १०७ धावा केल्या आहेत.
****
मकाऊ खुल्या बॅडमिंटन महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री
गोपीचंद या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात त्रिशा आणि गायत्री
जोडीने तैवानच्या जोडीचा २१-१२, २१-१७ असा पराभव केला. उद्या
उपांत्य फेरीत यांचा सामना तैवानच्या अन्य एका जोडीशी होईल. दरम्यान, पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत किदाम्बी श्रीकांतचा पराभव झाला.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने पुढील ३० वर्षांसाठी शहराची
स्वतंत्र जलनिती तयार केली आहे. या जलनीतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
नुकतंच प्रकाशन करण्यात आलं आहे. या जलनितीचा मसुदा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या
छत्रपती संभाजीनगर एम सी डॉट ओआरजी या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या
जलनिती बाबत आपले आक्षेप आणि सूचना लेखी स्वरुपात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे
कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ६० दिवसांच्या आत दाखल करण्याचं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातला सीना कोळेगाव सिंचन प्रकल्प
पूर्ण क्षमतेनं भरला आहे. कालपासून धरणाचे १७ दरवाजे उघडून तीस हजार घनफूट प्रति सेकंद
वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात
सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं सफाई मित्र सुरक्षा आरोग्य तपासणी
शिबिर घेण्यात आलं. मुख्य अधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या
या शिबिरात १६० सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
****
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आज परभणी महानगरपालिकेच्या वतीनं
शहरात जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आलं. या पथनाट्यातून कचरा वर्गीकरण, आपला कचरा आपली जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment