Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 February 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार सलग आठवा केंद्रीय अर्थसंकल्प
• केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
• आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; आर्थिक वाढीचा दर सहा पूर्णांक आठ टक्के राहण्याचा अंदाज
• तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
आणि
• इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेन्टी क्रिकेट मालिकेत भारताची विजयी आघाडी
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंक्लप असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असेल. गेल्या वर्षी निवडणुकीमुळं हंगामी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन अर्थसंकल्पाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
दरम्यान, काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेसमोर सादर करण्यात आला. २०२५ या आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरेलू उत्पादनात सहा पूर्णांक चार दशांश टक्के वृद्धी होण्याचा तर २०२६ च्या आर्थिक वर्षात ही वृद्धी सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५च्या शेवटच्या तिमाहीत अन्नधान्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये सहा टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर कमी होऊन, २०२३-२४ या वर्षामध्ये तो तीन पूर्णांक दोन टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा दिल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी विकसित भारत संकल्पनेत लोकसहभागाचं अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या..
‘‘मेरी सरकार के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है। विकसित भारत के विजन में जनभागीदारी का सामूहिक सामर्थ्य है। देश की आर्थिक उन्नति का रोडमैप है। डिजिटल क्रांति के रूप में टेक्नॉलाजी की ताकत है। और आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर का आधार है। मेरी सरकार के प्रयासों के बल पर भारत, दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहा है। सरकार ने सेवा, सुशासन, समृद्धि और स्वाभिमान, इन प्रमुख सिद्धांतों को गवर्नेंस के केंद्र में रखा है। सरकार reform, perform और transform के अपने संकल्प को तेज गति से आगे बढ़ा रही है।’’
राष्ट्रपतींनी यासह इस्रोचं शंभरावं उपग्रह प्रक्षेपण, मराठीसह विविध भाषांना अभिजात दर्जा, स्टार्टअप योजना या बाबींकडेही लक्ष वेधलं. देशाच्या विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतो, तेव्हाच विकास सार्थक होत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या…
‘‘जब देश के विकास का लाभ अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति को भी मिलने लगता है तभी विकास सार्थक होता है। गरीब को गरिमापूर्ण जीवन मिलने से उसमें जो सशक्तिकरण का भाव पैदा होता है, वो गरीबी से लड़ने में उसकी मदद करता है। अनेक योजनाओं ने गरीब को ये भरोसा दिया है कि वो सम्मान के साथ जी सकते हैं। ऐसे ही प्रयासों की वजह से देश के 25 करोड़ लोग गरीबी को परास्त करके आज अपने जीवन में आगे बढ़ रहे हैं। इन्होंने नियो मिडिल क्लास का एक ऐसा समूह तैयार किया है, जो भारत की ग्रोथ को नई ऊर्जा से भर रहा है।’’
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशाच्या प्रगतीचं सर्वसमावेशक चित्र स्पष्ट होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अभिभाषणातून युवकांच्या समग्र विकासाबाबत भारताचा दृष्टिकोन दिसून येत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपतींच्या अभिभषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनांत कामकाजाला प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
राज्यसभेतही दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
देशातल्या मंदिरांमधलं व्हीआयपी दर्शन, अर्थात महत्त्वाच्या व्यक्तींसाठी देवदर्शनाची वेगळी सुविधा मनमानी स्वरूपाची असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा व्यवस्थेला आव्हान देणारी याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. या याचिकेतल्या मुद्द्यांशी न्यायालय सहमत असलं तरी, याप्रकरणी कोणताही निर्णय अथवा निर्देश देऊ शकत नसल्याचं सांगत, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी लक्ष घालावं, असं म्हटलं आहे.
****
तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला कालपासून पुण्यात प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात केली, त्या मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साद घालत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितलं. या सोहळ्यात कौशल्य विकास आणि उद्योगजकता विकास मंत्रालयाच्या 'सिद्ध' या संकेतस्थळाचं लोकार्पण करण्यात आलं. पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभमेळा या संमेलनात भरला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर, विश्व मराठी साहित्य संमेलन आता परदेशातही व्हावं, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
****
राज्यात सोयाबीन खरेदीला सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 31 जानेवारीनंतरही सोयाबीनची खरेदी सुरु रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी राज्यानं केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला होता.
****
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटीलनं रौप्य पदक मिळवलं आहे. या स्पर्धेत ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कांस्य पदकांसह एकूण २५ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
क्रिकेट: पुणे इथं झालेल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करत पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना जिंकला. या विजयासह भारतानं मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतानं इंग्लंडला १८२ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युरादाखल इंग्लंडचा संघ १६६ धावांवर सर्वबाद झाला. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी ५३ धावा केल्या तर रवी बिश्नोई आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी तीन, तर वरुण चक्रवर्तीनं दोन गडी बाद केले. मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना उद्या मुंबईत खेळला जाणार आहे.
****
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं ११४ धावांचं आव्हान भारतीय संघानं पंधराव्या षटकांत साध्य केलं. २१ धावांत तीन बळी घेणारी पारुनिका सिसोदिया प्लेयर ऑफ द मॅच ठरली. या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असून, दोन फेब्रुवारीला क्वालालंपूर इथं होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
****
रस्ता सुरक्षा अभियानामुळे गेल्या वर्षभरात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचं, महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
‘‘सदर अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १४ महामार्ग पोलीस केंद्रांच्या हद्दीमध्ये वाहनचालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबीरांगचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये दहा पॉईंट तीस टक्क्यांनी घट झालेली आहे.’’
****
लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेल इमारतीचं काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. लातूर पोलिसांकडून महिला, मुलींसाठी राबवण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी या विभागाची प्रशंसा केली. भरोसा सेलच्या समुपदेशनानंतर समेट झालेल्या जोडप्यांचा यावेळी पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment