Saturday, 22 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.02.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 February 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०

**** 

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कायम संपर्कात राहावं-डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींचं आवाहन.

सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष्य साध्य होईल-सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र प्रदान.

आणि

१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन.  

****

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कायम संपर्कात राहण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती बोलत होते. धनखड यांच्या सुविद्य पत्नी डॉ सुदेश धनखड, कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, कुलगुरू डॉ विजय फुलारी, खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थी हे शिक्षण संस्थेची खरी शक्ती असतात आणि त्यांच्याकडून संस्थेला सर्वप्रकारे मिळणारं योगदान हे संस्थेच्या प्रगतीत भर घालत असल्याचं, उपराष्ट्रपतींनी नमूद केलं.

आंतरराष्ट्रीय घुसखोरी, धर्मस्वातंत्र्य, लोकशाहीची सुरक्षा, जागतिक पातळीवर भारताची उज्ज्वल प्रतिमा, पायाभूत सुविधांचा विकास, आदी मुद्यांवरही उपराष्ट्रपतींनी भाष्य केलं. आज भारतात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून, या संधींच्या आधारे तरुणांच्या आकांक्षाना पंख मिळू शकतात, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला.


पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थी तसंच पीएच.डी संशोधक अशा एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात पदवी घेण्यासाठी अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात पदवी प्रदान करण्यात आली. 

या कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपती तसंच कुलपतींनी एक पेड मां के नाम मोहिमेअंतर्गत विद्यापीठ नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण केलं. 

शहरातल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही उपराष्ट्रपतींनी संबोधित केलं. संविधानाने दिलेले मौलिक अधिकार वापरतांना, मौलिक कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आणिबाणीच्या आठवणींना उजाळा देत, या पार्श्वभूमीवर संविधान जागर अभियानाचं महत्त्व मोठं असल्याचं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं. 

****

दरम्यान, आपल्या या दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी वेरुळ इथं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन वेरुळ लेण्यातल्या कैलास लेणीला भेट दिली. छत्रपती संभाजीनगर इथला दौरा आटोपून उपराष्ट्रपती आता दिल्लीकडे प्रस्थान करत आहेत

****

सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष्य साध्य होईल असा विश्वास सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला शहा यांनी संबोधित करत होते. बँकेच्या यशस्वी वाटचालीचा त्यांनी गौरवपूर्ण शब्दांत आढावा घेतला. 


पुण्यात बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात आलं, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलतांना, अनुदानाच्या रकमेत ५० हजार रुपये वाढ करण्याचा तसंच प्रत्येक घराला सौर ऊर्जा संयत्र देण्याचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले.. 

आपण या घरासाठी एक लाख वीस हजार रुपये थेट देतो. नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये देतो. पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता बारा हजार रुपये देतो. असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये यामाध्यमातून आपण देतो. पण आम्हाला असं वाटलं आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर घर बांधणीकरता हे पैसे मिळणार आहे. माझा विश्वास आहे येत्या पंधरा दिवसामध्ये उरलेल्या दहा लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता निश्चितपणे पोहोचेल.

२८ हजार ग्रामपंचायतींमध्ये हा कार्यक्रम थेट दाखवण्यात आला. विविध ठिकाणच्या २० लाख लाभार्थ्यांना यावेळी ठिकठिकाणी मंजुरीचं पत्र देण्यात आलं. 

छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत तापडिया नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

****

दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी "मनमोकळा संवाद - मराठीचा अमराठी संसार" या विषयावर परिसंवाद रंगला. भाषिक विविधता हा अडथळा न ठरता समृद्धीचे साधन ठरू शकतो, असा सकारात्मक सूर या परिसंवादातून उमटला. 

"मराठी पाऊल पडते पुढे" तसंच 'बृहन्महाराष्ट्रातील मराठी जीवन आणि साहित्य' या विषयावर पार पडलेल्या परिसंवादालाही साहित्य रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

****

१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आज छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन झालं. त्यापूर्वी औरंगपुरा भागातून साहित्यदिंडी काढण्यात आली. पारंपरिक ढोल ताशाच्या निनादात आदिवासी नृत्यावर फेर धरलेल्या नागरिकांनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं. संमेलनाचे उद्घाटक कंवल भारती यांनी या संमेलनाला शुभेच्छा दिल्या. संमेलनाध्यक्ष अशोक राणा यांनी छत्रपती संभाजीनगरात भरलेल्या या संमेलाचं अध्यक्षपद भुषवतांना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. आमखास मैदानावर मलिक अंबर साहित्य नगरीत भरलेल्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

****

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक तपासणी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे संचालकांना दिले आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली होती. तत्कालीन उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा अहवाल २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला होता. त्यात या प्रकल्पाची एकूण लांबी २४० किलोमीटर असून, अंदाजे खर्च चार हजार ८५७ कोटी ४७ लाख रुपये असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे. 

****

जालना इथं आज पहाटे वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला. जाफ्राबाद तालुक्यातल्या पासोडी इथं ही दुर्घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११ तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तूर खरेदी केंद्रावर नोंदणी करुन शेतमाल विक्रीसाठी न्यावा, असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही. यु. राठोड यांनी केलं आहे. ही तूर खरेदी १३ मे पर्यंत सुरु राहणार आहे.

****


No comments: