Monday, 30 January 2023

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 30.01.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

·       विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काही अपवाद वगळता शांततेत मतदान

·       संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं आवाहन

·       उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेश

·       राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशभअभिवादन

आणि

·       टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या महिला संघाला भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर 

****

राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काही अपवाद वगळता आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होवून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक पदवीधर मतदार संघासाठी मतदानाची चार वाजेची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा दिसून आल्या. नदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कुलच्या केंद्रावर चार वाजेनंतर तीनशेहुन अधिक मतदार रांगामध्ये असल्यानं त्यांना चिठ्ठी देण्यात आली. मतदानाची अंतिम वेळ उलटुन गेल्यानंतरही याठिकाणी मतदान सुरु होतं. दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी प्राप्त झाली असून कोकण शिक्षक मतदारसंघासाठी २८ टक्के मतदान झालं. नागपूर शिक्षक मतदारसंघातल्या ६ जिल्ह्यांमध्ये साठ पूर्णांक ४८ टक्के मतदान झालं. नाशिक पदवीधर मतदार संघात ३१ पूर्णांक ७१ टक्के तर औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात ५८ पूर्णांक २७ टक्के मतदान झालं. अमरावती पदवीधर मतदार संघात ३० पूर्णांक ४० टक्के मतदान झालं आहे.

****

संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. अधिवेशनादरम्यान सरकार कुठल्याही मुद्द्यावर या अधिवेशनात चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे इलामरम करीम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, आम आदमी पक्षीचे संजय सिंह आदी नेते यावेळी उपस्थित होते.

      संसदेच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्याच्या पहिल्या दिवशी केंद्रीय कक्षात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. आणि दोन्ही सदनात आर्थिक सर्वेक्षण पटलावर मांडण्यात येईल. केंद्रीय अर्थसंकल्प परवा १ फेब्रुवारीला सादर होईल.

अधिवेशनाचं पहिलं सत्र १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून १४ फेब्रुवारी ते १२ मार्च या काळात संसदेच्या विविध विभागांच्या समित्यांना वित्त मागण्यांना मंजुरी देण्यासाठी आवश्यक त्या बैठका होणार आहेत. त्यानंतर अधिवेशनाचं पुन्हा सुरु होणारं दुसरं सत्र ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे.

***

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ७५ व्या पुण्यतिथी निमित्त आज देशभअभिवादन करण्यात आलं. त्यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून पाळली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान तसंच लष्कराच्या तिन्ही विभागाचे प्रमुख यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना राजघाट इथल्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली अर्पण केली. यावेळी सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजनही करण्यात आलं होतं.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज भवनमध्ये दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधी तसंच हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी महात्मा गांधी यांच्या राजभवन भेटीया विषयावरील माहितीपट दाखवण्यात आला.

औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन श्रध्दांजली वाहण्यात आली.

***

मुंबईत आयोजित पहिल्या मॉडेल जी २० शिखर परीषदेचं भारताचे जी २० शेर्पा अमिताभ कांत आणि इंडोनेशियाचे मंत्री समुपदेशक एको जुनोर यांच्या हस्ते आज उद्धघाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक जयंत कुलकर्णी आणि मॉडेल जी २० चे संचालक देवेंद्र पै उपस्थित होते. रामभाऊ म्हाळगी प्रबधिनीचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रॅटिक लीडरशिप भारतात पहिल्या मॉडेल जी २० चं आयोजन करून भारताचं अध्यक्षपद साजरं करत आहे.

एकूण १६१ प्रतिनिधींनी जी २० देश, निरीक्षक राष्ट्रे आणि संघटना यांची भूमिका गृहीत धरून जागतिक शांतता, शाश्वत विकास, जागतिक अर्थव्यवस्था आणि सर्वसमावेशकता या विषयांवर चर्चा केली. या पहिल्या मॉडेल जी २० शिखर परिषदेत जागतिक भागीदारी : संधी आणि आव्हानंया संकल्पने अंतर्गत लिडर ट्रॅक, शेर्पा ट्रॅक, फायनान्स ट्रॅक आणि सिव्हिल ट्रॅक या ४ ट्रॅकद्वारे चर्चा करण्यात येईल.

***

भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय फायद्यासाठी द्वेषाच्या माध्यमातून लोकांना विभाजीत करण्याचं काम केलं. त्याविरोधात नफरत छोडो, भारत जोडोअसा नारा देत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाला पुन्हा एकदा प्रेमानं जोडलं आहे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी म्हटलं आहे.

महागाई, बेरोजगारी तसंच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण, केंद्रीय संस्थांचा गैरवापर या मुद्द्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो यात्रा चार हजार किलोमीटरचा प्रवास करून काश्मीरच्या श्रीनगरमध्ये आज पोहोचली. श्रीनगर इथे ध्वजारोहण करून या यात्रेचा समारोप झाला.

 या यात्रेच्या समर्थनार्थ प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतल्या मुख्यालयात नसीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तसंच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं.

***

भारताच्या १९ वर्षांखालच्या भारतीय महिला संघानं टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं पहिलं विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळानं, संघाला पाच कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं आहे.

या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघाचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडू देशातल्या युवकांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रेरणा ठरल्या आहेत, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तर, हे यश उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देईल, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांनी म्हटलं आहे.

***

शेत जमीन मोजण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मारुती घाटोळ या भूमापकासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज दुपारी ही कारवाई केली. वसमत शहरातील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाघाटोळ हा भूमापक म्हणून कार्यरत आहे. त्यानं शेत जमीन मोजण्यासाठी एका शेतकऱ्याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच स्वीकारण्यासाठी मदत करणारा घाटोळचा मित्र चंदू भेदेवाड यालाही पथकानं ताब्यात घेतलं आहे.

***

भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून अन्न पदार्थ म्हणून त्याची निवड करणं ही काळाची गरज आहे असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये आयोजित दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेत आज ते बोलत होते. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचं ब्रँडिंग करणं गरजेचं असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद महत्वाची ठरणार असल्याचं  मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

***

नांदेड -एर्नाकुलम नांदेड  आणि पूर्णा ते तिरुपती या विशेष रेल्वे गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे. नांदेड ते एर्नाकुलम ही विशेष गाडी नांदेड इथून ३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान दर शुक्रवारी दुपारी ३ वाजता नांदेडहून सुटेल. एर्नाकुलम इथं शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता पोहोचेल. तर शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटानी एर्नाकुलम इथून निघून रविवारी सकाळी साडे सात वाजता ती नांदेडला पोहोचेल.

//***********//

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...