Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जानेवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
· राज्याच्या
सर्वांगीण विकासाचं सरकारचं लक्ष्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन.
· सरकारची
भूमिका सर्वसामान्यांना सोबत घेण्याची - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
· मराठवाड्यात
चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात.
आणि
· मध्य
रेल्वेच्या उद्यापासून चार विशेष गाड्या.
****
आपलं
सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवाससस्थानी
प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी शिंदे हे माध्यम प्रतिनिधींशी
बोलत होते. ते म्हणाले –
महाराष्ट्राच्या
सर्वांगीण विकासासाठी अतिशय चांगली कामं, पायाभूत सुविधा असतील, राज्यातल्या सर्व समाजघटकांसाठी
योजना असतील, असे अनेक निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण घेतोय. आणि खऱ्या अर्थाने
हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठीचं सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय
घेण्यासाठीचं सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी अहोरात्र काम करतायत.
राज्यात
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी
दिली.
****
नागपूर
इथं उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यांनी
महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेतला. सामान्य माणसाला पुढं घेऊन जाण्याची
सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
देशाच्या
एकूण जीडीपीच्या पंधरा टक्के आपण महाराष्ट्रातनं जीडीपी देतो. आणि देशाची जी निर्यात
आहे, त्या निर्यातीमध्ये जवळजवळ बावीस ते पंचवीस टक्के हिस्सा हा आपल्या महाराष्ट्राचा
आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज ज्याप्रमाणे महाराष्ट्र हा प्रगतीकडे चाललेला आहे,
ही प्रगती करत असताना, जो सामान्य माणूस आहे, त्या सामान्य माणसाला सोबत घेऊन या महाराष्ट्रातील
दीन-दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर अशा प्रत्येकाला या ठिकाणी सोबत घेऊन
आपल्याला पुढे जायचंय.
****
मराठवाड्यामध्ये
आज सर्वत्र चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून आला. औरंगाबाद इथं पोलिस
मुख्यालयात पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. हिंगोली
इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. उस्मानाबाद इथं तुळजाभवानी
जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय
ध्वजारोहण झालं. जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या
हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेद विसरुन सर्वांना
समान संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आपण सर्वांनी
मिळून प्रयत्न केल्यास देश सामर्थ्यशाली महासत्ता बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला. सावे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा
यावेळी सन्मान करण्यात आला. नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते, बीड
इथं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते, लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी पी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
राज्यात
बालविवाह प्रथेमध्ये परभणी जिल्हा वरच्या क्रमांकावर आहे, जिल्ह्यासाठी ही बाब चांगली
नाही, त्यामुळं आता जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकानं बालविवाहमुक्त परभणी मोहिमेत
सहभागी होणं आवश्यक आहे, असं आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे.
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल इथं प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण
समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी गोयल बोलत होत्या. परभणी जिल्हा बाल विवाहमुक्त
करण्यासाठी ग्रामीण भागातल्या शालेय शिक्षणात मुलींची पटसंख्या वाढली पाहिजे, असंही
गोयल यांनी सांगितलं.
****
प्रसार
भारती आणि इजिप्तच्या राष्ट्रीय माध्यम प्राधिकरणादरम्यान आशय-सामग्रीची देवाणघेवाण,
क्षमता विकास आणि सह-निर्मिती सुलभ करण्यासाठी आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि इजिप्त सरकारचे परराष्ट्र
व्यवहार मंत्री समेह हसन शौकरी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या
हैदराबाद हाऊस इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सामंजस्य
करारांची देवाणघेवाण करण्यात आली. हा सामंजस्य करार म्हणजे, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान,
सामाजिक विकास आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यावर विशेष भर देणाऱ्या कार्यक्रमांच्या
माध्यमातून देशाची प्रगती दाखवण्यासाठी दूरदर्शन वाहिनीची व्याप्ती वाढवण्याच्या प्रयत्नांचा
एक भाग आहे. दोन्ही देशांचे प्रसारक द्विपक्षीय आधारावर क्रीडा, बातम्या, संस्कृती,
मनोरंजन आणि इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित विविध प्रकारच्या कार्यक्रमांची देवाणघेवाण
या अंतर्गत करणार आहेत. हे कार्यक्रम त्यांच्या नभोवाणी आणि दूरचित्रवाणी मंचावरून
प्रसारित केले जातील. हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी वैध असेल. प्रसार भारती या भारताच्या
सार्वजनिक प्रसारकांनी, प्रसारण क्षेत्रातलं सहकार्य आणि सहयोगासाठी सध्या ३९ परदेशी
प्रसारकांबरोबर सामंजस्य करार केले आहेत.
****
औरंगाबाद
इथलं प्रमुख पर्यटन स्थळ असलेला बीबी का मकबरा आज प्रजासत्ताक दिनापासून दररोज रात्री
१० वाजेपर्यंत आकर्षक रोषणाईनं उजळणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व विभागानं दिली
आहे. या अनुषंगानं भारतीय पुरातत्व विभागानं आज संध्याकाळी सात वाजता बीबी का मकबरा
परिसरात विशेष कार्यक्रमांतर्गत महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता आणि त्यांच्या
शिष्यांचं ध्रुपदांगी कथ्थक नृत्य सादरीकरण होत आहे.
****
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त औरंगाबादमध्ये १५० हून अधिक वस्त्यांमध्ये
भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, संविधान आणि हैदराबाद
मुक्तीसंग्रामात - स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग यावर यावेळी माहिती देण्यात आली.
****
प्रवाशांच्या
मागणीनुसार मध्य रेल्वेतर्फे चार विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. या अंतर्गत मनमाड
- औरंगाबाद गाडी उद्या मनमाड इथून सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल आणि औरंगाबाद
इथं सकाळी साडे अकरा वाजता पोहोचेल. औरंगाबाद - मनमाड गाडी उद्या दुपारी बारा वाजता
निघेल. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - औरंगाबाद ही गाडी आज मध्यरात्रीनंतर बारा वाजून
पंचावन्न मिनिटांनी सुटेल आणि औरंगाबाद इथं सकाळी सव्वाआठ वाजता पोहोचेल. औरंगाबाद
- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ही गाडी उद्या रात्री आठ वाजता निघून २८ जानेवारी रोजी
पहाटे साडे तीन वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई इथं पोहोचेल. औरंगाबाद - छत्रपती
शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही गाडी ३० जानेवारी रोजी रात्री आठ वाजता सुटून छत्रपती
शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं ३१ जानेवारी रोजी पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी
पोहोचेल. औरंगाबाद कोल्हापूर या विशेष गाडीची एक फेरी घेण्यात येत आहे. ही विशेष रेल्वे
उद्या औरंगाबादहून सकाळी आठ वाजता सुटणार असून कोल्हापूरला मध्यरात्री बारा वाजून चाळीस
मिनिटांनी पोहोचणार असल्याचं रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
रिपब्लिकन
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांचं आज सकाळी नवी मुंबई इथं
निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. सुमंतराव गायकवाड यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं
१९६० ते ६७ असे सात वर्षे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलं. आज संध्याकाळी सात वाजता
मुंबई इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
भगवान
बुद्धाच्या अस्थिधातू कलशाचं उद्या औरंगाबादमध्ये आगमन होणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध
भिक्खू संघ थायलंडच्या ११० बौद्ध भिक्खूंना घेवून परभणी इथून ही धम्मयात्रा सुरु झाली
असून मुंबई चैत्यभूमीपर्यंत जाणार आहे. औरंगाबाद शहरातल्या केंब्रीज चौकात सकाळी नऊ
वाजता या धम्मयात्रेचं आगमन होणार आहे. शासकीय दुध डेअरी समोर भिक्खू संघाद्वारे महापरित्राणपाठ
आणि धम्मदेसना आणि भगवान बुद्ध यांच्या अस्थीकलशाला अभिवादन करण्यात येणार असल्याची
माहिती समन्वयक डॉ.पवन डोंगरे यांनी दिली.
****
अमरावती
जिल्ह्यातल्या भातकुली इथल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सोलापूरचा सादिक पठाण
विजेता ठरला. त्यानं महाराष्ट्र केसरी गटात विजेतेपदासह तीन किलो चांदीची गदा आणि ४१
हजार रुपये रोख रकमेचं पारितोषिक पटकवलं.
****
No comments:
Post a Comment