Tuesday, 31 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अभिभाषणानं आज होत आहे. आज दोन्ही सदनात आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. उद्या २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना, यंदाचा अर्थसंकल्प प्रत्येत क्षेत्रासाठी आशेचा किरण घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

****

खुल्या बाजारात गव्हाच्या किमती आटोक्यात राहून देशात गव्हाच्या किंमतीत चढउतार होऊ नयेत यासाठी भारतीय अन्न महामंडळाने खुल्या दराने धान्य विक्री योजना अमलात आणायचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार आणि अन्न तसंच सार्वजनिक वितरण मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी काल गुवाहाटी इथं ही माहिती दिली.

****

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. महाराष्ट्रातली साडेतीन शक्तीपीठं आणि नारी शक्ती" ही यंदाच्या चित्ररथाची संकल्पना होती. उत्तराखंडच्या चित्ररथाला प्रथम आणि उत्तर प्रदेशला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

****

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास संपला असून, या बाबतचा अहवाल संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती, केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आयनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. या प्रकरणी अधिक तपासाची गरज नसल्याचं सी बी आयनं सांगितलं आहे.

****

भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रीड यांनी २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघाला ऐतिहासिक कांस्यपदक मिळवून दिलं होतं.

****

ओमानमधे मस्कत इथं झालेल्या आय टी टी एफ जेष्ठांच्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत मुंबईचे योगेश देसाई यांनी सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या ७० वर्षाहून अधिक वयोगटात एकेरीच्या अंतिम फेरीत त्यांनी झेक रिपब्लिकच्या खेळाडूवर विजय मिळवला.

//*********//

No comments: