Friday, 27 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.01.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date :  27 January 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचं, कामाचं योग्य नियोजन, एकाग्रता महत्वाची भुमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं तालकटोरा स्टेडियम वर परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि त्यांच्या शंकांचं निरसन केलं.

कोणतंही काम करताना त्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक असून, सूक्ष्म व्यवस्थापनाची कला आपण आपल्या आईकडून अवगत करून घ्यायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले. कोणत्याही गोष्टीचं ओझं न वाटून घेता, चांगल्या प्रकारे कसं व्यवस्थापन करता येईल ते पाहावं, असं त्यांनी सांगितलं.

परिक्षा ही आयुष्यभर सुरु राहणार आहे, त्यामुळे एका परिक्षेत नक्कल करुन पास जरी झाले, तरीही आयुष्यभर नक्कल नाही चालणार. त्याउलट मेहनत करणार्या विद्यार्थ्यांना कधीच अपयश येणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले. स्मार्टली हार्ड वर्क म्हणजेच योग्य नियोजन करुन काम केल्यास नक्कीच यश मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

पालकांनी आपल्या पाल्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, मात्र या अपेक्षा सामाजिक दबावाखाली ठेवल्या जात असतील, तर ते योग्य नाही, असं पंतप्रधान म्हणाले. पालकांच्या अपेक्षांना विद्यार्थ्यांनी आपली क्षमता आणि दृढ निश्चयाची जोड द्यावी, असं त्यांनी सांगितलं. परीक्षा हे जीवनाचं अंतिम ध्येय नाही, हे लक्षात ठेवून परीक्षेला सामोरं जावं, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर इथून परिक्षा पे चर्चा कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झाले होते.

औरंगाबाद इथं होली क्रॉस शाळेत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे उपस्थित होते.

***

मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचं उद्घाटन काल आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांच्या हस्ते झालं. एक फेब्रुवारीपर्यंत चालणार्या या प्रदर्शनात सुमारे ४० नोंदणीकृत खादी संस्था तसंच १५ राज्यांमधल्या प्रधानमंत्री रोजगार हमी योजना एककांनी भाग घेत, पारंपरिक कारागिरांनी निर्मिती केलेल्या निर्यातयोग्य ग्रामोद्योग उत्पादनं सादर केली आहेत. खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून कर्ज मर्यादेत २५ लाख रुपयांपर्यंत वाढ केल्याची माहिती मनोज कुमार यांनी दिली.

***

भगवान बुद्धाच्या अस्थिधातू कलशासह परभणी इथून निघालेल्या धम्मयात्रेचं आज सकाळी औरंगाबादमध्ये आगमन झालं. केंब्रीज चौक इथं भिक्खू संघाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी असंख्य भाविकांनी अस्थिधातू कलशाचं दर्शन घेतलं. औरंगाबादमध्ये शासकीय दुध डेअरी समोर भिक्खू संघाद्वारे महापरित्राण पाठ आणि धम्मदेसना आणि भगवान बुद्ध यांच्या अस्थीकलशाला अभिवादन करण्यात येत आहे.

***

औरंगाबाद - कोल्हापूर विशेष रेल्वे आज औरंगाबाद स्थानकाहून उशीरा सुटणार आहे. सकाळी आठ वाजता सुटणारी ही गाडी सहा तास उशीरा म्हणजेच दुपारी दोन वाजता औरंगाबादहून सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

***

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत आज भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात ब्राझीलच्या राफेल मॅटोस आणि लुईसा स्टेफनी या जोडीनं सानिया - रोहन जोडीचा सात - सहा, सहा - दोन असा पराभव केला.

दरम्यान, सानिया मिर्झाची ही शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. आपल्या कारकीर्दीची सुरूवात २००५ मध्ये याच मेलबर्नमधून केली होती, शेवटचे ग्रँडस्लॅम खेळण्यासाठी यापेक्षा चांगलं मैदान दुसरं कोणतंच असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया सानिया मिर्झानं सामना संपल्यानंतर दिली.

***

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रांची इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्यांला सुरूवात होईल.

***

एकोणीस वर्षांखालील महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा उपांत्यफेरीचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.

***

जकार्ता इथं सुरु असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लक्ष्य सेननं मलेशियाच्या एन्ग त्झे यॉन्ग याचा १९-२१, २१-८, २१-१७ असा पराभव केला. लक्ष्यचा सामना आज इंडोनेशियाच्या जोनाटन ख्रिस्टे याच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय, किदम्बी श्रीकांत आणि प्रियांशू राजवत यांचं, तर महिला एकेरीत सायना नेहवालचं पहिल्या फेरीतच या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.

//**********//

 

No comments: